संरक्षण मंत्रालय
भारत आणि मोरोक्को यांनी संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारावर केली स्वाक्षरी
प्रविष्टि तिथि:
22 SEP 2025 8:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2025
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मोरोक्कोचे संरक्षण मंत्री अब्देलतिफ लोदी यांची आज - 22 सप्टेंबर, 2025 रोजी रबात येथे द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी उभय मंत्र्यांनी संरक्षण सहकार्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. हा सामंजस्य करार दोन्ही देशांमध्ये संरक्षणविषयक वाढत्या भागीदारीसाठी एक मजबूत संस्थात्मक चौकट प्रदान करणारा असून संरक्षण उद्योग, संयुक्त सराव, लष्करी प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीमध्ये सहकार्याचा मार्ग प्रशस्त करणारा आहे.
दोन्ही नेत्यांनी संरक्षण उद्योग सहकार्य अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर दहशतवादविरोधी, सागरी सुरक्षा, सायबर संरक्षण, शांतता मोहिमा, लष्करी औषध आणि तज्ञांच्या देवाणघेवाणीचा समावेश असलेल्या व्यापक पथदर्शी कार्यक्रमावर सहमती दर्शवण्यात आली. दोन्ही मंत्र्यांमधील चर्चेतून भारत आणि मोरोक्कोमधील दीर्घकालीन मैत्री आणखी मजबूत करण्याचा सामायिक संकल्प दिसून आला.
या उपक्रमांना गती देण्यासाठी, संरक्षणमंत्र्यांनी रबात येथील भारतीय दूतावासात एक नवीन संरक्षण विभाग उघडण्याची घोषणा केली. त्यांनी भारताच्या संरक्षण उद्योगाने केलेली प्रगती आणि ड्रोन आणि ड्रोन विरोधी तंत्रज्ञानासह त्याच्या अत्याधुनिक क्षमतांवरही प्रकाश टाकला आणि मोरोक्कोच्या संरक्षण दलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय कंपन्या उत्तमप्रकारे कार्यरत आहेत, याची हमी मोरोक्कोच्या संरक्षण दलाला देण्यात आली.
उभय मंत्र्यांनी सशस्त्र दलांमधील देवाणघेवाण वाढवणे, प्रशिक्षण कार्यक्रम सुलभ करणे आणि संरक्षण क्षेत्रात सह-विकास आणि सह-उत्पादनासाठी संधी शोधण्याचे महत्त्व अधोरेखित केले. जागतिक आणि प्रादेशिक सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी बहुपक्षीय सहकार्याची आवश्यकता देखील त्यांनी अधोरेखित केली आणि हिंद महासागर आणि अटलांटिक कॉरिडॉरचे धोरणात्मक महत्त्व पाहता सागरी सुरक्षेत होत असलेल्या समन्वयाचे स्वागत केले.
संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण सहकार्य वाढविण्याबाबत पुढील चर्चेसाठी मोरोक्कोचे संरक्षण मंत्री लोदी यांना भारत भेटीसाठी औपचारिक निमंत्रणही दिले. ही बैठक म्हणजे द्विपक्षीय संरक्षण संबंधातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तसेच भारत आणि मोरोक्कोमधील धोरणात्मक हितसंबंधांच्या वाढत्या अभिसरणाचे प्रतिबिंब यामध्ये दिसून आले.
* * *
सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2169821)
आगंतुक पटल : 33