सांस्कृतिक मंत्रालय
20व्या मेटल आयन्स 2025 आंतरराष्ट्रीय परिसंवादाचा मुंबईमध्ये समारोप; परिसंवादामध्ये शाश्वत, आंतरविद्याशाखीय विज्ञानाला चालना देण्याचे आवाहन
Posted On:
22 SEP 2025 6:05PM by PIB Mumbai
मुंबई, 22 सप्टेंबर 2025
20 व्या मेटल आयन्स 2025 या आंतरराष्ट्रीय परिसंवादात जीवशास्त्र आणि वैद्यकशास्त्रातील— मुखावाटे दिली जाणारी औषध आणि रेडिओलॉजी, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यातील अलीकडील प्रगति याविषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. 20 आणि 21सप्टेंबर, 2025 रोजी नेहरू विज्ञान केंद्र (एनएससी), वरळी, मुंबई येथे हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वैज्ञानिक विषयांवर विचारांची देवाणघेवाण, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि नैतिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत संशोधनावर सर्वाधिक भर देण्यात आला.

आंतरविद्याशाखीय संवादाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या परिसंवादात आघाडीच्या भारतीय संशोधक आणि चिकित्सकांसह अमेरिका आणि रशियासह देशांतील 240 हून अधिक प्रतिनिधी एकत्र आले. या कार्यक्रमात मेटल आयन संशोधनाची वाढती आंतरराष्ट्रीय प्रासंगिकता आणि आरोग्य, पर्यावरण आणि सार्वजनिक धोरणात त्याचे उपयोग अधोरेखित झाले.
उद्घाटन भाषण देताना, परिसंवादाच्या अध्यक्ष डॉ. सुनाली खन्ना यांनी सहभागींना नवोपक्रम आणि जबाबदारीमधील तफावत कमी करण्याचे आवाहन केले. "आपल्याला विज्ञान आणि आत्मा यांची सांगड घालायची आहे आणि या परिसंवादाने हे सिद्ध केले आहे की, असे विज्ञान शक्य आहे," असेही त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमात विस्तृत वैज्ञानिक सत्रे, संभाषणाव्दारे आणि पोस्टरव्दारे सादरीकरणे झाली तसेच खालील विषयांवर व्यापक चर्चा करण्यात आली :
- कर्करोग निदान आणि उपचारपद्धती
- नॅनोटेक्नॉलॉजी आणि इंजिनिअर्ड नॅनोमटेरियल्स
- मुखाच्या आरोग्याविषयी आव्हाने आणि रेडिओलॉजिकल प्रगती
- पर्यावरणीय सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य धोरणे
- संशोधनात कायदेशीर सुधारणा आणि तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपाचा प्रतिकार
भविष्यातील संशोधकांना विविध प्रकारे पूरक मदत देण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे शालेय विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक सादरीकरण तंत्रांवर एक विशेष सत्र देखील आयोजित करण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय प्राध्यापकांमध्ये प्राध्यापक (डॉ.) पॉल बी. त्चौनवो (अमेरिका) आणि प्राध्यापक (डॉ.) अनातोली स्काल्नी (रशिया) सारखे प्रख्यात तज्ञ उपस्थित होते, जे प्रमुख संस्था आणि रुग्णालयांमधील प्रतिष्ठित भारतीय शास्त्रज्ञांमध्ये सामील झाले होते.
"भविष्य आंतरविद्याशाखीय संशोधन तसेच आरोग्य आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठी वचनबद्धता असल्याचे समारोपाच्या भाषणामध्येमध्ये , डॉ. खन्ना यांनी सांगितले.
या परिसंवादाने वैज्ञानिक संवाद आणि नवोपक्रमाचे जागतिक केंद्र म्हणून मुंबईचे स्थान पुन्हा अधोरेखित केले. केवळ अत्याधुनिकच नाही तर नैतिकदृष्ट्या पायाभूत आणि पर्यावरणीयदृष्ट्या जागरूक संशोधन करण्यासाठी नवीन प्रेरणा या परिसंवादाला उपस्थित राहिलेल्या प्रतिनिधींना मिळाली.

* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2169731)
अभ्यागत कक्ष : 23