आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना'चा राज्यस्तरीय शुभारंभ


केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोगमुक्त भारत दृष्टिकोन केला अधोरेखित

Posted On: 17 SEP 2025 9:05PM by PIB Mumbai

मुंबई, 17 सप्‍टेंबर 2025

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना'चा राज्यस्तरीय शुभारंभ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथून या अभियानाचे राष्ट्रीय स्तरावर उद्घाटन केले. पंतप्रधानांच्या 75 व्या वाढदिवसाच्या औचित्याने  17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत, महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरणासाठी समर्पित असलेली ही देशव्यापी मोहीम आयोजित करण्यात आली आहे.केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यावेळी उपस्थित होते. मध्य प्रदेशातील धार  इथे पंतप्रधानांनी विविध विकास कार्यक्रमांची पायाभरणी आणि  उद्घाटन केले, या कार्यक्रमात मान्यवर दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

उपस्थितांना संबोधित करण्यापूर्वी, पंतप्रधान धार भोजशाळेची पूज्य माता, ज्ञानदेवता, वागदेवीच्या चरणी नतमस्तक झाले. आज कौशल्य आणि निर्मितीचे दैवत भगवान विश्वकर्मा यांची आज जयंती आहे असे सांगून मोदी यांनी भगवान विश्वकर्मा यांना अभिवादन केले. आपली कारागिरी आणि समर्पणातून राष्ट्र उभारणीच्या कामात योगदान देणाऱ्या कोट्यवधी बंधू-भगिनींप्रति त्यांनी आदर व्यक्त केला.

ही मोहीम केवळ पंधरवड्यापुरती मर्यादित न ठेवता, त्याचा जास्तीत जास्त परिणाम  साधण्यासाठी ती वर्षभर सुरू ठेवावी, अशी सूचना शिंदे यांनी यावेळी केली. महिला अनेकदा कुटुंबाची काळजी घेण्यासाठी स्वतःला समर्पित करतात आणि आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.या अभियानाद्वारे, लाखो महिलांना वेळेवर आरोग्य तपासणी आणि प्रतिबंधात्मक काळजीची सुविधा उपलब्ध होईल. आजारांचे लवकर निदान होणे महत्त्वाचे आहे, तसेच आरोग्य सेवा बळकट करणे ही एक निरंतर प्रक्रिया असून, तो अल्पकालीन उपक्रम नसल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त, राज्यात रक्तदान शिबिरे, रोजगार हमी उपक्रम आणि शाळा आणि वस्ती पातळीवरील जनजागृती कार्यक्रमांसह अनेक उपक्रम सुरू करण्यात आले. शिंदे यांनी सांगितले की, आदर्श शाळा विकसित करणे, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नमो उद्याने  निर्माण करणे आणि पाणीपुरवठा योजना आणि शेतकरी सहाय्य कार्यक्रम राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऑटोमोबाईल, कृषी आणि संबंधित उद्योगांसारख्या क्षेत्रात नवीन कौशल्य केंद्रे स्थापन केली जात आहेत, तर मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्रसार उपक्रम हाती घेण्यात येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी, पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रचलेल्या 'तू भारत माता की शान है' या गाण्याचे प्रकाशन करण्यात आले. तसेच खासदार श्रीकांत शिंदे आणि डॉ. अमोल शिंदे यांनी लिहिलेल्या द रायझिंग भारत :विरासत टू विकास या  कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही करण्यात आले.

कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोगमुक्त भारत निर्मितीचा दृष्टीकोन अधोरेखित केला. पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे प्राचीन भारतीय योग साधनेला जागतिक मान्यता मिळाली, आणि दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो, असे ते म्हणाले. 2014 मध्ये आयुष मंत्रालयाच्या स्थापनेमुळे पारंपरिक औषधांना मोठी चालना मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

देशभरात नवीन एम्सची स्थापना, एमबीबीएस आणि पदव्युत्तर वैद्यकीय जागांचा विस्तार, आणि लाखो वंचित कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा प्रदान करणारी 2018 मध्ये सुरू करण्यात आलेली आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, यासह आरोग्य क्षेत्रातील प्रमुख सुधारणांवर केंद्रीय मंत्र्यांनी प्रकाश टाकला. 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना उपचारांसाठी 5 लाख रुपयांचे अतिरिक्त सहाय्य देखील दिले जात आहे.

जाधव यांनी कोविड-19 साथ रोगाच्या काळातील भारताच्या नेतृत्वाचा उल्लेख केला, जेव्हा देशाने केवळ आपल्या नागरिकांचे लसीकरण केले नाही, तर लस-मैत्री उपक्रमांतर्गत अनेक देशांना लसींचा पुरवठा केला. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र केंद्र सरकारच्या सहकार्याने आरोग्य सेवेत महत्वाचे योगदान देत असून, यामध्ये आयसीएमआर संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या योजनेचाही समावेश आहे. या अभियानांतर्गत जास्तीत जास्त महिलांची आरोग्य तपासणी करण्यात महाराष्ट्र आघाडीवर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केले. केंद्र आणि राज्य सरकारांचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2167842)
Read this release in: English