अल्पसंख्यांक मंत्रालय
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठात वारसा भाषा आणि सांस्कृतिक अभ्यास केंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन आणि पायाभरणी
वारसा भाषा आणि परंपरांचे संशोधन आणि जतन करण्यासाठी केंद्राची उभारणी
Posted On:
15 SEP 2025 9:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2025
15 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरात केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ झाला आणि अभ्यासाला चालना देण्यासाठी तसेच वारसा परंपरांचे जतन करण्यासाठी वारसा भाषा आणि सांस्कृतिक अभ्यास केंद्राच्या बांधकामाची पायाभरणी झाली.

या कार्यक्रमाला अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार; या मंत्रालयाचे सहसचिव राम सिंह; मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) रवींद्र कुलकर्णी; मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू (डॉ.) अजय भामरे आणि इतर अधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
समारंभात बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, "हा कार्यक्रम म्हणजे केवळ मुंबई विद्यापीठातील अभ्यासक्रमांची सुरुवातच नव्हे तर याद्वारे समृद्ध सांस्कृतिक आणि भाषिक वारसा घेऊन भारताच्या उज्ज्वल भविष्याचा मजबूत पाया रचला जात आहे.”
भारताच्या विकासात मुंबई विद्यापीठाने अद्वितीय योगदान दिले आहे यावरही मंत्र्यांनी प्रकाश टाकला. त्यांनी मंत्रालयाच्या योजनांचा उल्लेख केला, यात जियो पारसी योजनेचा समावेश असल्याचे सांगून ते म्हणाले, "पारशी समुदायाची लोकसंख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे आमचे जगातील एकमेव सरकार आहे.” भारत ज्याप्रमाणे अल्पसंख्याकांची काळजी घेतो तशी काळजी इतर कोणताही देश घेत नाही, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार यांनी अधोरेखित केले की मंत्रालय भाषा अभ्यासाला प्रोत्साहन देत आहे आणि देशातील विविध भाषांचे जतन करण्यासाठी विविध पावले उचलत आहे.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) रवींद्र कुलकर्णी यांनी या प्रकल्पाची पार्श्वभूमी आणि महत्त्व स्पष्ट केले आणि या प्रकल्पामुळे सांस्कृतिक मूल्य प्रणाली आणि वारसा कसा वाढेल, यावर प्रकाश टाकला.
वारसा भाषा आणि सांस्कृतिक अभ्यास उत्कृष्टता केंद्रातर्फे पर्यावरणीय नीतिमत्ता, तुलनात्मक जागतिक तत्त्वज्ञान आणि दुर्मिळ हस्तलिखितांचे डिजिटायझेशन या विषयांमधील आंतरविद्याशाखीय संशोधनाच्या आधारे पाली आणि अवेस्ता-पहलवीवर शैक्षणिक आणि सांस्कृतिक भर दिला जाणार आहे. हे संशोधन धार्मिक हस्तलिखिते, मौखिक परंपरा आणि धर्मशास्त्रीय साहित्य जतन करून, व्याकरण मार्गदर्शक आणि शब्दकोश तयार करून तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्वानांसह सहकार्य वृद्धिंगत करून साध्य केले जाईल.
अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय शिक्षणाला प्रोत्साहन देऊन,सांस्कृतिक वारसा जपून तसेच समावेशक विकास सुनिश्चित करून अल्पसंख्याक समुदायांना सक्षम बनवण्यासाठी वचनबद्ध आहे.
निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2166994)
Visitor Counter : 2