वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-युरोपीय युनियन संतुलित मुक्त व्यापार करार अंतिम करण्यासाठी प्रामाणिकपणे आणि बांधिलकीने काम करत आहेत: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल
Posted On:
12 SEP 2025 8:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2025
भारत आणि युरोपियन युनियन एक व्यापक आणि संतुलित मुक्त व्यापार करार अंतिम करण्यासाठी प्रामाणिकपणे आणि वचनबद्धतेने काम करत आहेत, ज्यामुळे दोन्हीकडील व्यवसाय आणि ग्राहकांना फायदा होईल, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले आहे. ते आज ऑटोमोटिव्ह कंपोनेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ACMA) च्या 65 व्या वार्षिक अधिवेशनाला संबोधित करत होते. असा करार एकतर्फी असू शकत नाही, कारण प्रत्येक वाटाघाटीत समानता आणि संतुलन राखण्यासाठी काही प्रमाणात ‘देणे-घेणे’ (give and take) असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
'उत्तम' कराराच्या शोधात प्रगती थांबवणे महत्त्वाचे नाही आणि सध्या वाटाघाटी अत्यंत सकारात्मक दिशेने जात आहेत यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, या प्रक्रियेतून खुल्या होणाऱ्या संधी अमर्याद आहेत आणि त्या व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि अधिक सखोल आर्थिक संबंधांसाठी नवीन मार्ग खुले करतील,असे ते म्हणाले.
गोयल यांनी विश्वास व्यक्त केला की, ऑटोमोटिव्ह कंपोनेंट क्षेत्रासारखा एक धाडसी आणि दूरदृष्टी असलेला उद्योग,ज्याने यापूर्वीच्या मुक्त व्यापार करारांच्या वाटाघाटींमध्ये सातत्याने आपली ताकद दाखवली आहे, त्याला भारत-युरोपियन युनियन भागीदारीतून तयार होत असलेले नियम आकर्षक आणि संभाव्यतेने परिपूर्ण वाटतील.
हा मुक्त व्यापार करार भारतीय उत्पादकांना त्यांच्या युरोपियन समकक्षांबरोबर आणि जगातील इतर भागांतील कंपन्यांबरोबर भागीदारी करण्यासाठी नवीन मार्ग उघडेल, ज्यामुळे संयुक्त उपक्रम, तंत्रज्ञान भागीदारी आणि सहयोगी नवोन्मेष यांना प्रोत्साहन मिळेल. अशा भागीदारीमुळे खर्च कमी होण्यास, उत्पादकता वाढण्यास, भारतीय तरुणांसाठी रोजगार निर्माण होण्यास आणि भारताला उच्च-गुणवत्तेच्या ऑटोमोटिव्ह कंपोनेंट उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून स्थान मिळण्यास मदत होईल, यावर त्यांनी भर दिला.
सुषमा काणे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2166129)
Visitor Counter : 2