संरक्षण मंत्रालय
‘समुद्र प्रदक्षिणा’ या तिन्ही सेनादलांतील महिलांच्या मुंबईतून सुरु होणाऱ्या पहिल्याच पृथ्वीप्रदक्षिणा नौकानयन मोहिमेला संरक्षणमंत्र्यांनी आभासी पद्धतीने झेंडा दाखवून रवाना केले
सेनादलांतील 10 महिला अधिकारी त्रिवेणी या भारतीय लष्कराच्या नौकानयन नौकेतून पुढील 9 महिन्यांत सुमारे 26,000 सागरी मैलांचा प्रवास पूर्ण करतील
हा सागरप्रवास म्हणजे नारी शक्ती, सशस्त्र दलांचे ऐक्य, आत्मनिर्भर भारत आणि देशाच्या लष्करी मुत्सद्देगिरीचे तसेच जागतिक दूरदृष्टीचे झळाळते प्रतीक आहे: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
Posted On:
11 SEP 2025 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2025
नारी शक्ती आणि विकसित भारताची संकल्पना यांचे स्मरण करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज, 11 सप्टेंबर 2025 रोजी ‘समुद्र प्रदक्षिणा’ या तिन्ही सेनादलांतील महिलांच्या ऐतिहासिक पृथ्वीप्रदक्षिणा नौकानयन मोहिमेला आभासी पद्धतीने झेंडा दाखवून रवाना केले. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथून सुरु होणारी ही जगातील अशा प्रकारची पहिलीच नाविक पृथ्वीप्रदक्षिणा मोहीम आहे. यासंदर्भात, साऊथ ब्लॉक येथे केलेल्या भाषणात, संरक्षणमंत्र्यांनी या सागरप्रवासाला नारी शक्ती, सामुहिक सामर्थ्य, तिन्ही सेनादलांतील ऐक्य आणि संयुक्तता, आत्मनिर्भर भारत आणि देशाच्या लष्करी मुत्सद्देगिरीचे तसेच जागतिक दूरदृष्टीचे झळाळते प्रतीक म्हटले.

येत्या 9 महिन्यांच्या कालावधीत, या 10 महिला अधिकारी भारतीय लष्कराच्या त्रिवेणी या स्वदेशी पद्धतीने निर्मित नौकानयन नौकेतून (आयएएसव्ही) सुमारे 26,000 सागरी मैलांचे अंतर पार करतील.या प्रवासादरम्यान त्या दोनदा विषुववृत्त ओलांडतील तसेच केप लीयुविन, केप हॉर्न आणि केप ऑफ गुड होप अश्या तीन महत्त्वपूर्ण केप्सना फेरी घालतील. सर्व महत्त्वाचे महासागर तसेच दक्षिणी महासागर आणि ड्रेक पसाजसह पृथ्वीवरील सर्वात धोकादायक जलमार्गांवरून त्यांचा हा प्रवास होणार आहे. मे 2026 मध्ये मुंबईला परतण्यापूर्वी हे पथक चार आंतरराष्ट्रीय बंदरांना देखील भेट देईल.

संरक्षणमंत्र्यांनी यावेळी बोलताना, लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रुप ए या दोन भारतीय महिला नौदल अधिकाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या असामान्य कामगिरीची आठवण काढली. या दोन अधिकारी महिलांनी आयएनएस तारिणी या दुसऱ्या एका स्वदेशी नौकेतून डबल-हँडेड पद्धतीने पृथ्वीला प्रदक्षिणा घालताना अनेक आव्हानांवर धाडसाने आणि निष्ठेने विजय मिळवला. आयएएसव्ही त्रिवेणी देखील सागरी साहसांच्या क्षेत्रात आणखी एक जागतिक टप्पा गाठून भारताच्या सागरी वाटचालीत आणखी एक सोनेरी अध्याय जोडेल असा विश्वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.

तिन्ही-सेनादलांची ही मोहीम म्हणजे देशाच्या तीन सैन्यदलांमध्ये संयुक्तता निर्माण करण्याप्रती सरकारच्या कटिबद्धतेचे झळाळते उदाहरण आहे असे वर्णन राजनाथ सिंह यांनी केले.
पुदुचेरी येथे स्वदेशी पद्धतीने निर्मित आयएएसव्ही त्रिवेणी या 50 फूट लांबीच्या नौकेला आत्मनिर्भर भारत संकल्पनेचे मूर्त रूप संबोधत संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की या नौकेद्वारे भारताचा संरक्षण नवोन्मेष आणि तंत्रज्ञानातील आत्मविश्वास दिसून येतो. सदर प्रवासात आयएएसव्ही त्रिवेणीने पार केलेला प्रत्येक सागरी मैल हा भारताच्या धोरणात्मक स्वायत्तता तसेच स्वावलंबन यांच्या दिशेने घडणारा प्रवास आहे असे ते पुढे म्हणाले.
सदर प्रवासात त्रिवेणी नौका फ्रेमेंटल (ऑस्ट्रेलिया), लिटेल्टन(न्युझीलंड), पोर्ट स्टॅनले आणि केप टाऊन (दक्षिण आफ्रिका) या बंदरांना भेट देणार आहे, त्याबद्दल बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की तेथील अधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या भारतीय पथकाच्या संवादांतून जगाला भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्यांसोबतच देशाच्या सशस्त्र दलांच्या सामर्थ्याशी देखील ओळख होईल.
संरक्षण मंत्र्यांसोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग हे या दृक्श्राव्य माध्यमाद्वारे झालेल्या समारंभादरम्यान साउथ ब्लॉकमध्ये उपस्थित होते. तर फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, नौदलाचे पश्चिम विभाग प्रमुख व्हाइस अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन आणि इतर वरिष्ठ अधिकारी गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे येथे उपस्थित होते.

पथकाविषयी माहिती -
या 10 सदस्यांच्या पथकामध्ये मोहिमेच्या प्रमुख लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर, उपप्रमुखस्क्वाड्रन लीडर श्रद्धा पी राजू, मेजर करमजीत कौर, मेजर ओमिता दळवी, कॅप्टन प्राजक्ता पी निकम, कॅप्टन डॉली बुटोला, लेफ्टनंट कमांडर प्रियंका गुसैन, विंग कमांडर विभा सिंह, स्क्वाड्रन लीडर अरुवी जयदेव आणि स्क्वाड्रन लीडर वैशाली भंडारी या महिलांचा समावेश आहे.
या पथकाने तीन वर्षांचे कठोर प्रशिक्षण घेतले आहे, ज्याची सुरुवात बी वर्ग श्रेणीतील नौकांवरील अपतटीय लहान मोहिमांपासून झाली आणि त्यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये वर्ग अ नौकेच्या आयएएसव्ही त्रिवेणीपर्यंत त्या पोहोचल्या. त्यांच्या तयारीमध्ये भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यावरील उत्तरोत्तर आव्हानात्मक होत जाणारा प्रवास आणि मुंबई ते सेशेल्स तसेच या वर्षाच्या सुरुवातीला परतणारी एक ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय मोहीम समाविष्ट होती. यातून त्यांची सागरी निपुणता, सहनशक्ती आणि स्वयंपूर्णता सिध्द करुन प्रमाणित केली होती.

समुद्र प्रदक्षिणा
जागतिक नौकानयन गती रेकॉर्ड परिषदेच्या कठोर नियमांचे पालन करून ही प्रदक्षिणा पूर्ण केली जाईल, ज्यामध्ये कालवे किंवा ऊर्जेचा वापर न करता सर्व रेखांश, विषुववृत्त ओलांडणे आणि केवळ जहाजातून 21,600 पेक्षा जास्त नॉटिकल मैलांचा प्रवास पूर्ण करणे अपेक्षित आहे. डिसेंबर 2025 - फेब्रुवारी 2026 दरम्यान दक्षिण महासागरातील केप हॉर्नला प्रदक्षिणा घालणे हा त्यातील सर्वात कठीण टप्पा असेल.
मोहिमेदरम्यान, हे पथक राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या सहकार्याने वैज्ञानिक संशोधन देखील करेल. यामध्ये सूक्ष्म प्लास्टिकचा अभ्यास, महासागरातील जीवनाचे दस्तऐवजीकरण आणि सागरी आरोग्याबद्दल जागरूकता वाढवणे समाविष्ट आहे.
पार्श्वभूमी
सर रॉबिन नॉक्स-जॉन्स्टन (यूके) यांनी 1969 मध्ये एकट्याने जराही न थांबता, सर्वप्रथम ही प्रदक्षिणा पूर्ण केली होती. भारतात, कॅप्टन दिलीप दोंदे (निवृत्त) यांनी पहिल्याप्रथम एकट्याने ही प्रदक्षिणा पूर्ण केली होती (2009–10) आणि कमांडर अभिलाष टॉमी (निवृत्त) हे 2012–13 मध्ये जराही न थांबता ही प्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले भारतीय होते. भारतीय नौदलाने आयएनएसव्ही तारिणीद्वारे केलेली नाविका सागर परिक्रमा (2017–18) आणि नाविका सागर परिक्रमा-II (2024-25) या, यापूर्वी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या परिक्रमा आहेत.
जयदेवी पुजारी-स्वामी/सोनाली काकडे/संजना चिटणीस/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
(Release ID: 2165752)
Visitor Counter : 2