आदिवासी विकास मंत्रालय
आदिवासी व्यवहार मंत्रालय 'आदि वाणी' ची बीटा आवृत्ती प्रकाशित करणार
आदिवासी भाषांसाठी भारताचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता-संचालित अनुवादक
Posted On:
30 AUG 2025 6:03PM by PIB Mumbai
समावेशक आदिवासी सक्षमीकरण आणि भारताच्या समृद्ध भाषिक विविधतेच्या संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, केंद्र सरकारचे आदिवासी व्यवहार मंत्रालय आदिवासी भाषांसाठी भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता-संचालित अनुवादक “आदि वाणी” ची बीटा आवृत्ती प्रकाशित करत आहे. जनजाती गौरव वर्ष बॅनरखाली विकसित हा अग्रगण्य उपक्रम आदिवासी प्रदेशांमधील भाषिक आणि शैक्षणिक परिदृश्य बदलण्यासाठी सज्ज आहे.
प्ले स्टोअरवर (लवकरच iOS सह) आणि एका समर्पित वेब प्लॅटफॉर्मद्वारे उपलब्ध असलेले “आदि वाणी” हे आदिवासी आणि बिगर-आदिवासी समुदायांमधील संवादातील दरी कमी करण्यासाठी तयार केले आहे; तसेच प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरून लुप्तप्राय आदिवासी भाषांचे रक्षण देखील केले जात आहे.
आदि वाणी बद्दल
“आदि वाणी” हा एक एआय-आधारित भाषांतर साधन आहे, जो आदिवासी भाषांना समर्पित भविष्यातील मोठ्या भाषा मॉडेलचा पाया म्हणून काम करतो. हा प्रकल्प संपूर्ण भारतातील आदिवासी भाषा आणि संस्कृतींचे संरक्षण, संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी समुदाय-चालित दृष्टिकोनाशी प्रगत एआय तंत्रज्ञानाची सांगड घालतो.
भारताचे भाषिक परिदृश्य
भारतात अनुसूचित जमातींद्वारे बोलल्या जाणाऱ्या 461 आदिवासी भाषा आणि 71 विशिष्ट आदिवासी मातृभाषा (भारतीय जनगणना, 2011) आहेत. त्यापैकी 81 भाषा असुरक्षित आहेत आणि 42 नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मर्यादित दस्तऐवजीकरण आणि पिढ्यांमधील संवादाच्या अभावामुळे अनेक भाषा नामशेष होण्याचा धोका आहे.
आदि वाणी आदिवासी भाषांचे पद्धतशीर डिजिटायझेशन, जतन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी एआयचा वापर करून या आव्हानाला सामोरी जाते. आयआयटी दिल्लीच्या नेतृत्वाखालील प्रमुख संस्थांच्या राष्ट्रीय संघाद्वारे विकसित, ज्यात बिट्स पिलानी, आयआयआयटी हैदराबाद आणि आयआयआयटी नवा रायपूर यांचा समावेश आहे, तसेच झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मेघालय येथील आदिवासी संशोधन संस्थांच्या सहकार्याने विकसित झालेला हा प्रकल्प पुढील उद्दिष्टांसाठी कार्यरत आहे:
- हिंदी/इंग्रजी आणि आदिवासी भाषांमध्ये वास्तविक वेळेत भाषांतर (मजकूर आणि बोलणे) सक्षम बनवणे.
- विद्यार्थी आणि नव्याने शिकणाऱ्यांसाठी परस्परसंवादी भाषा शिक्षण प्रदान करणे.
- लोककथा, मौखिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा डिजिटल पद्धतीने जतन करणे.
- आदिवासी समुदायांमध्ये डिजिटल साक्षरता, आरोग्य सेवा संप्रेषण आणि नागरी समावेशन ला समर्थन देणे.
- सरकारी योजना आणि महत्त्वाच्या भाषणांबद्दल जागरूकता निर्माण करणे.
व्याप्ती आणि भाषा
आदि वाणी त्याच्या बीटा आवृत्तीत पुढील भाषांना समर्थन पुरवते:
- संताली (ओडिशा), भिली (मध्य प्रदेश), मुंडारी (झारखंड), गोंडी (छत्तीसगड)
पुढील टप्प्यात कुई आणि गारो सह अतिरिक्त भाषा विकसित केल्या जात आहेत.
कार्यपद्धती आणि वैशिष्ट्ये
एआय भाषा मॉडेल्स: कमी संसाधन असलेल्या आदिवासी भाषांसाठी नो लँग्वेज लेफ्ट बिहाइंड (एनएलएलबी) आणि इंडिकट्रान्स2 सारख्या मॉडेल्सचा अचूक वापर.
समुदाय सहभाग: डेटा संकलन, प्रमाणीकरण आणि पुनरावृत्ती विकासात टीआरआय, तज्ञ आणि समुदाय यांचा सहभाग.
कार्यात्मक टूलकिट:
- टेक्स्ट-टू-टेक्स्ट, टेक्स्ट-टू-स्पीच, स्पीच-टू-टेक्स्ट, स्पीच-टू-स्पीच भाषांतरे.
- हस्तलिखिते आणि प्राइमर्स डिजिटायझेशनसाठी ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन (ओसीआर)
- द्विभाषिक शब्दकोश आणि क्युरेटेड रिपॉझिटरीज.
- पंतप्रधानांची भाषणे, आरोग्य विषयक सल्ला (उदा. सिकल सेल रोग जागरूकता), आणि आदिवासी भाषांमध्ये सरकारी योजना आणि उपक्रमांची माहिती यासाठी सबटायटल्स.
प्रभाव आणि भविष्याचा मार्ग
“आदि वाणी” हे केवळ भाषांतराचे साधन नाही तर ते एक राष्ट्रीय अभियान आहे:
- आदिवासी ज्ञान आणि सांस्कृतिक अभिव्यक्तींचे डिजिटलायझेशन आणि संरक्षण करणे.
- आदिवासी समुदायांना त्यांच्या मूळ भाषांमध्ये शिक्षण, आरोग्यसेवा आणि सार्वजनिक सेवा वितरणासह सक्षम बनवणे.
- सरकारी योजना शेवटच्या टोकापर्यंत पोहचतील हे सुनिश्चित करून समावेशक प्रशासनाला प्रोत्साहन देणे.
- लुप्तप्राय भाषांच्या एआय-संचालित संरक्षणात भारताला एक जागतिक नेतृत्व म्हणून स्थापित करणे.
हा उपक्रम डिजिटल इंडिया, एक भारत श्रेष्ठ भारत, आदि कर्मयोगी अभियान, धरती आबा जनजातिय ग्राम उत्कर्ष अभियान आणि पंतप्रधान जनमन यासारख्या प्रमुख राष्ट्रीय अभियानांना चालना देत सांस्कृतिक विविधता आणि समानतेची भारताची संवैधानिक मूल्ये मजबूत करतो.
आदिवासी व्यवहार मंत्रालय नागरिक, शिक्षक, सांस्कृतिक कार्यकर्ते आणि समुदायांना भारताच्या आदिवासी भाषिक वारशाचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि त्याचे जतन करण्याच्या या परिवर्तनकारी प्रयत्नात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करते.




***
यश राणे / सुषमा काणे / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2162995)
Visitor Counter : 10