संरक्षण मंत्रालय
इंडियन आर्मी टेरियर सायबर क्वेस्ट 2025 : कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्र शिक्षण, क्वांटम आणि ड्रोन तंत्रज्ञानावर भर असलेली राष्ट्रीय सायबर स्पर्धा
Posted On:
27 AUG 2025 5:18PM by PIB Mumbai
परिवर्तनाचे दशक (Decade of Transformation) या उपक्रमाचा एक भाग म्हणून, भारतीय लष्कराच्या क्षेत्रीय लष्कर विभागाने (Indian Army Territorial Army) इंडिअन आर्मी टेरियर सायबर क्वेस्ट 2025 या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. आयआयटी मद्रास अर्थात चेन्नईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था, भारतीय लष्कराचा संशोधन विभाग (इंडियन आर्मी रिसर्च सेल - IARC) आणि सायबरपीस यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. संरक्षण आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातील वास्तविक धोक्यांचा सामना करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. नवी दिल्ली इथे ही स्पर्धा पार पडेल.
भारतीय लष्कराच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.indianarmy.nic.in/terriercyberquest/2025.pdf) या उपक्रमाविषयीची जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे. सुरक्षा आणि संरक्षण विषयक आधुनिक आव्हानांचा तंत्रज्ञानाच्या मदतीने सामना करण्यासाठी शिक्षण, उद्योग आणि सरकारी क्षेत्रातील भारतातील प्रतिभावान व्यक्तीमत्वांना एकत्र आणणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सायबर स्पर्धा कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्र शिक्षण (ML), क्वांटम कॉम्प्युटिंग आणि ड्रोन तंत्रज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमधील नवोन्मेषाला आणि परस्पर सहकार्याला चालना मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून लष्कराने एका मजबूत डिजिटल संरक्षण धोरणाच्या महत्त्वावर भर दिला असून, डिजिटल युद्धभूमीवरील योद्धा बनण्यासाठी कौशल्याधारित व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहनही केले आहे.
यादृष्टीने भारतासाठी अधिक मजबूत प्रणाली तयार करण्याच्या उद्देशाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्र शिक्षण तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दोन प्रमुख आव्हानात्मक स्पर्धा या उपक्रमाअंतर्गत होणार आहेत. त्याविषयीची माहिती खाली दिली आहे.
ट्रॅक वन (Track One) : बग हंटिंग चॅलेंज - ही एक अत्यंत महत्त्वाची सायबर सुरक्षा हॅकाथॉन असेल. याअंतर्गत बॉस लिनक्स (BOSS Linux) प्रणालीवर 36 तासांची थेट बग हंट स्पर्धा होईल. या स्पर्धेअंतर्गत अंतिम फेरीतील स्पर्धक एका भारतीय लष्करी व्यवस्थासदृष निर्माण केलेल्या वातावरणात (simulated) परिचालन प्रणाली (OS) स्तरावरील धोक्याच्या दृष्टीने संवेदनशील त्रुटींचा (vulnerabilities) शोध घेतील. स्पर्धेच्या या स्वरुपाची देशासाठी अधिक मजबूत प्रणाली तयार करण्यात मोठी मदत होणार आहे.
ट्रॅक टू (Track Two): डाटाथॉन - ही एक डेटा अर्थात माहितीसाठ्याशी संबंधित आव्हानात्मक स्पर्धा असेल. या स्पर्धेअंतर्गत संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी मजबूत तंत्रज्ञानाधारित उपाययोजना आणि संबंधित साधने तयार करण्याच्या बाबतीत सहभागींच्या क्षमतेची चाचणी घेतली जाईल. 2025 या वर्षातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेअंतर्गत मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या माहितीसाठा संचांचा वापर करून त्यांमधील अनोमली डिटेक्शन (anomaly detection) अर्थात असामान्य किंवा अनपेक्षित कल शोधण्यावर तसेच, 'प्रेडिक्टिव्ह थ्रेट इंटेलिजन्स अर्थात संभाव्य धोक्यांविषयीची माहिती मिळवण्यावर भर दिला गेला आहे.
या उपक्रमाचे वेळापत्रक
नोंदणी : 23 जुलै ते 07 सप्टेंबर 2025
प्राथमिक फेरी : 08 ते 17 सप्टेंबर 2025
महाअंतिम फेरी : 24 ते 26 सप्टेंबर 2025
पुरस्कार सोहळा : 07 ऑक्टोबर 2025
क्वांटम यंत्र शिक्षणात स्वदेशी नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे, अत्यावश्यक तत्वज्ञान (critical thinking) विकसित करणे तसेच राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण तंत्रज्ञान पायाभूत सुविधा बळकट करू शकतील अशा कार्यरत प्रारुप (प्रोटोटाइप) उपाययोजनांची निर्मिती करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत, ट्रॅक वन स्पर्धेतील अंतिम स्पर्धक अतिमहत्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करतील आणि तसेच त्या हल्ल्यांपासून या पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यावर भर देतील. तर ट्रॅक टू मधील अंतिम स्पर्धक 36 तासांच्या कालावधीत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्र शिक्षण तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्णपणे कार्यक्षम अशी डीपफेक डिटेक्शन प्रणाली (deepfake detection system) विकसित करतील.
या स्पर्धेच्या विजेत्यांचा लष्करप्रमुख, जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते गौरव केला जाईल आणि त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक त्यांच्या नवोन्मेषी उपाययोजना आणि योगदानाची दखल म्हणून आकर्षक बक्षिसे देखील दिली जातील.
या स्पर्धेसाठी इच्छुक असलेल्यांनी भारतीय लष्कराच्या www.indianarmy.nic.in/terriercyberquest/2025.pdf या अधिकृत संकेस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी 07 सप्टेंबर 2025 पर्यंत खुली असणार आहे.
***
शैलेश पाटील/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2161388)