नौवहन मंत्रालय
‘टुरिझम एव्हेन्यु - वॉटरवेज टू वंडर : अनलॉकिंग क्रूझ टुरिझम ’ परिषदेचे मुंबईत आयोजन
Posted On:
18 AUG 2025 10:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2025
‘टुरिझम एव्हेन्यु - वॉटरवेज टू वंडर : अनलॉकिंग क्रूझ टुरिझम’ परिषद आज मुंबईत यशस्वीरित्या पार पडली. मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण (आयडब्ल्यूएआय) यांनी संयुक्तरित्या ही परिषद आयोजित केली होती. या परिषदेत भारतातील क्रूझ पर्यटनाच्या क्षमतेवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि ही पर्यटन क्षमता पूर्णपणे उपयोगात आणण्याचे मार्ग शोधण्यासाठी उद्योग तज्ञ, धोरणकर्ते आणि भागधारक एकत्र आले होते.
NAVIC सेल 4 अंतर्गत पर्यटन आणि फेरींचे नोडल अधिकारी विजय कुमार यांनी क्रूझ पर्यटन क्षेत्राच्या प्रगतीसाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच, त्यांनी नदी क्रूझ पर्यटनाचा विकसित करण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरणाने घेतलेल्या पुढाकारांची रूपरेषा देखील मांडली. यामध्ये स्थानिक अर्थव्यवस्थांना चालना देण्याची आणि भागधारकांसाठी नवीन संधी निर्माण करण्याची क्षमता असून जेट्टी आणि टर्मिनल्ससारख्या पायाभूत सुविधांचा विकास तसेच शाश्वत पर्यटन पद्धतींचा प्रचार यांचाही समावेश आहे.
या परिषदेत नियामक चौकट, सरकारी उपक्रम आणि पर्यटन दृष्टिकोन या विषयांवर पॅनेल चर्चा झाली, ज्यात उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी आपले विचार आणि अनुभव मांडले. अलकनंदा क्रूझलाइन आणि हेरिटेज क्रूझेसचे प्रतिनिधी तसेच पर्यटन मंत्रालय, बंदरे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि इतर संस्थांचे अधिकारी यात सहभागी झाले. परिषदेत कार्यप्रणालीतील उत्कृष्टता प्रवासी अनुभव तसेच भारतातील नदी पर्यटनाची क्षमता यावरील सादरीकरणे देखील समाविष्ट होती. यावेळी नदी क्रूझ पर्यटनावरील एक लघुपटही प्रदर्शित करण्यात आला. या लघुपटात या क्षेत्रातील संधी आणि आव्हाने अधोरेखित करण्यात आली.
परिषदेचा समारोप ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या इंडिया मेरीटाईम वीक आणि सहभागाच्या संधींवरील सादरीकरणाने झाला.
मुंबई बंदर प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आदेश तितरमारे यांच्या स्वागतपर भाषणाने परिषदेची सुरुवात झाली, त्यानंतर भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष विजय कुमार यांनी मुख्य भाषण केले. कुमार यांनी आपल्या भाषणात, देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्याचा उल्लेख करून भारतातील क्रूझ पर्यटनाच्या अफाट क्षमतेवर प्रकाश टाकला.


निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2157753)