दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ट्रायच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या फसव्या कारवायांविरोधात ट्रायकडून मार्गदर्शक सूचना जारी

Posted On: 06 AUG 2025 5:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2025

ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ट्रायच्या नावाचा गैरवापर करून सायबर फसवणूक आणि आर्थिक घोटाळ्यांच्या वाढत्या प्रकरणांबाबत जनतेला सावध करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये कॉल, मेसेज, बनावट कागदपत्रांद्वारे ट्रायचे अधिकारी असल्याचे भासवणे, आणि फसवे लेटरहेड वापरून एखाद्या व्यक्तीला धमकावणे अथवा त्याची दिशाभूल करणे, तसेच आपली वैयक्तिक माहिती देण्यासाठी अथवा पैसे हस्तांतरित करण्यासाठी भाग पाडणे, याचा समावेश आहे. ट्रायच्या नावाखाली होत असलेला असा कोणताही संपर्क अनधिकृत असून, तो ट्रायशी संबंधित नाही.

ट्रायच्या नावाचा गैरवापर करून होणारे घोटाळे

याचे ठळक उदाहरण म्हणजे तथाकथित 'डिजिटल अरेस्ट' घोटाळा, जिथे कॉलर्स ट्राय किंवा कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी असल्याचे भासवून एखाद्या व्यक्तीवर दूरसंचार अथवा आर्थिक उल्लंघन किंवा गुन्हेगारी कृत्याचा खोटा आरोप करतात. बनावट कायदेशीर कागदपत्रे, बनावट ओळखपत्रे आणि अटक किंवा खाते गोठवण्याच्या धमक्या देऊन पीडितांना फसवले जाते आणि जामीन, दंड किंवा पडताळणीच्या नावाखाली पैसे हस्तांतरित करण्यासाठी भाग पाडले जाते.

ट्रायने स्पष्ट केले आहे की, ते ग्राहकांशी मेसेजद्वारे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे मोबाईल नंबर खंडित करण्याबाबत संवाद सुरू करत नाही. या उद्देशाने ग्राहकांशी संपर्क साधण्याच्या उद्देशाने ट्रायने कोणत्याही अन्य संस्थेला अधिकृत मान्यता दिलेली नाही. कोणतीही नियामक संस्था फोन कॉल, मेसेजिंग अॅप्स किंवा व्हिडिओ प्लॅटफॉर्मद्वारे तपासणी करत नाही अथवा पेमेंट घेत  नाही.

ट्रायच्या नावाचा गैरवापर करून होणारी इतर फसवणूक:

• सिम निष्क्रिय करण्याच्या धमक्या: केवायसी समस्यांवर त्वरित कृती न केल्यास मोबाईल नंबर खंडित केला जाईल असा खोटा दावा करणारे कॉल किंवा संदेश.

• मोबाईल टॉवर बसवण्याचे प्रस्ताव: आगाऊ नोंदणी शुल्काच्या बदल्यात उच्च भाडे उत्पन्न देणाऱ्या फसव्या प्रस्तावांमध्ये बहुतेकदा ट्रायची बनावट मान्यता दाखवलेली असते.
• बनावट पत्रे किंवा ईमेल: पैशांच्या मागण्या, गुंतवणूक प्रस्ताव किंवा अनुपालन कृतींना वैध ठरवण्यासाठी ट्रायच्या लोगोचा वापर करून बनावट कागदपत्रे किंवा ईमेल प्रसारित करणे.

ट्रायचे स्पष्टीकरण

ट्राय हे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण कायदा, 1997 अंतर्गत स्थापन एक स्वतंत्र वैधानिक प्राधिकरण आहे. ते दूरसंचार आणि प्रसारण सेवांचे नियमन करते, सरकारला धोरणात्मक उपाययोजनांची शिफारस करते आणि सेवा गुणवत्तेचे निरीक्षण करते.

ट्राय असे करत नाही:

• वैयक्तिक ग्राहकांविरुद्ध चौकशी करणे

• आधार, बँक खाते, ओटीपी किंवा इतर वैयक्तिक माहितीची विनंती करणे

• डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे अटक धमक्या किंवा इशारे देणे

सार्वजनिक सूचना

नागरिकांना सल्ला देण्यात येतो की:

• धमकी देणारे किंवा संशयास्पद कॉल आल्यास ते तात्काळ खंडित करा

• कॉल किंवा व्हिडिओ चॅटवर वैयक्तिक, बँकिंग किंवा ओळखीबाबतची माहिती सामायिक करणे टाळा.

• अनपेक्षित मागण्यांना प्रतिसाद म्हणून कधीही पैसे पाठवू नका

• अधिकृत वेबसाइट किंवा सरकारी हेल्पलाइनद्वारे स्वतंत्रपणे पडताळणी करा

• फसवणुकीची तक्रार राष्ट्रीय सायबर क्राइम हेल्पलाइन (1930) किंवा www.cybercrime.gov.in वर करा

• संचार साथी किंवा ट्राय डीएनडी ॲपवरील चक्षू सुविधेद्वारे संशयास्पद क्रमांक ध्वजांकित करा

ट्राय सर्व नागरिकांना - विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि डिजिटली कमी अनुभवी वापरकर्त्यांना - सतर्क राहण्याचे आणि ही माहिती व्यापकपणे सामायिक करण्याचे आवाहन करीत आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी सुरुवातीलाच  जनजागृती  आणि वेळेवर तक्रार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

सुषमा काणे/राजश्री आगाशे/नंदिनी मथुरे /प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2153257)
Read this release in: English , Urdu , Hindi , Malayalam