संरक्षण मंत्रालय
व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला
Posted On:
31 JUL 2025 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जुलै 2025
अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक प्राप्त व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज दि. 31 जुलै 2025 रोजी पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, नौदल पदक प्राप्त व्हाइस ॲडमिरल संजय जे सिंग यांच्याकडून पदभार स्विकारला. व्हाइस ॲडमिरल संजय जे सिंग भारतीय नौदलातील चार दशकांच्या गौरवशाली सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. पदभार स्वीकारल्यानंतर, व्हाइस ॲडमिरल स्वामीनाथन यांनी मुंबईतील नौदल गोदीमधील गौरवस्तंभावर देशाच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहिली.
संदेशवहन आणि इलेक्ट्रॉनिक युद्धातील तज्ज्ञ फ्लॅग ऑफिसर व्हाइस ॲडमिरल स्वामीनाथन 1 जुलै 1987 रोजी भारतीय नौदलाच्या सेवेत रुजु झाले. त्यांनी खडकवासला इथली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, युनायटेड किंगडममधील श्रीव्हेनहॅम इथले जॉइंट सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेज, करंजा इथले नौदल युद्ध महाविद्यालयआणि अमेरिकेतील न्यूपोर्ट ऱ्होड आयलंड मधील युनायटेड स्टेट्स नेव्हल वॉर कॉलेज या शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेतले आहे.
फ्लॅग ऑफिसर व्हाइस ॲडमिरल स्वामीनाथन यांनी आपल्या नौदलच्या आजवरच्या कारकिर्दीत विद्युत आणि विनाश या क्षेपणास्त्र नौका, क्षेपणास्त्रसज्ज कुलिश ही गस्त युद्धनौका, म्हैसूर ही गाईडेड क्षेपणास्त्र विनाशिका आणि विक्रमादित्य या विमानवाहू जहाजाच्या नेतृत्वासह, अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
यासोबतच फ्लॅग ऑफिसर व्हाइस ॲडमिरल स्वामीनाथन यांनी कोची इथल्या दक्षिण नौदल कमांडच्या मुख्यालयात चीफ स्टाफ ऑफिसर (प्रशिक्षण) म्हणून जबाबदारी सांभाळली होती. भारतीय नौदलाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या अंमलबजावणीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. नौदलाच्या सुरक्षा संघटनेच्या उभारणीतही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. याशिवाय सागरी प्रशिक्षणाचे फ्लॅग ऑफिसर या नात्याने त्यांनी नौदलाच्या वर्क-अप संघटनेचे प्रमुखपदही भूषवले होते. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी पश्चिम नौदलाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, अपतटीय संरक्षण सल्लागार गटाचे फ्लॅग ऑफिसर आणि भारत सरकारचे अपतटीय सुरक्षा आणि संरक्षण सल्लागार, मुंबईतील पश्चिम नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ आणि नवी दिल्लीतील नौदल मुख्यालयात कार्मिक सेवा नियंत्रक तसेच कार्मिक प्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. आत्ताच्या पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी, ते नौदल मुख्यालयात व्हाइस चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ म्हणून कार्यरत होते.
PDT6.jpeg)
6LQB.jpeg)
(1)WMPC.jpeg)
सोनाली काकडे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2151127)