संरक्षण मंत्रालय
संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षण उद्योग क्षेत्र भागीदारीविषयक दुसऱ्या परिषदेचे आयोजन
Posted On:
31 JUL 2025 9:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जुलै 2025
नवी दिल्लीमधील इंडिया हॅबिटेट सेंटरमध्ये आयोजित संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या (Joint Defence Cooperation Committee - JDCC) बैठकीच्या पार्श्वभूमीवर, आज दि. 31 जुलै 2025 रोजी, भारत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षण उद्योग क्षेत्र भागीदारीविषयक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. संरक्षण उत्पादन विभागाअंतर्गत ही परिषद आयोजित केली गेली. भारतीय संरक्षण उत्पादक संस्था (Society of Indian Defence Manufacturers - SIDM) आणि संयुक्त अरब अमिरातीच्या एज ग्रुप (EDGE Group) यांनी संयुक्तपणे या परिषदेच्या समन्वयाची जबाबदारी सांभाळली. या परिषदेत 90 हून अधिक भारतीय संरक्षण कंपन्या आणि संयुक्त अरब अमिरातीच्या 8 कंपन्यांनी सहभाग नोंदवला. संरक्षण उत्पादन सचिव संजीव कुमार आणि संयुक्त अरब अमिरातीचे संरक्षण उपसचिव लेफ्टनंट जनरल इब्राहिम नासेर अल अलावी यांनी या परिषदेचे सह-अध्यक्षपद भूषवले.
सप्टेंबर 2024 मध्ये अबू धाबी इथे आयोजित केलेली पहिली भारत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षण उद्योग क्षेत्र भागीदारीविषयक परिषद यशस्वी ठरली होती. हा उपक्रम पुढे नेण्याच्या उद्देशाने या दुसऱ्या परिषदेचे आयोजन केले गेले होते. यंदाच्या परिषदेत मानव विरहीत प्रणाली, नौदलाशी संबंधित मंच, अचूक लक्ष्यभेदी दारूगोळा (precision munitions), सायबर संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अंतराळ विज्ञानाची जोड असलेले तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये उद्योग-ते-उद्योग सहकार्य वाढवण्यावर भर दिला गेला.
संरक्षण उत्पादन सचिव संजीव कुमार यांनी या परिषदेला संबोधित केले. त्यांनी संस्थात्मक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले, तसेच भविष्यातील सहकार्याच्या अनुषंगाने काही प्रमुख क्षेत्रांची शक्यताही मांडली. लेफ्टनंट जनरल अल अलावी यांनीही या परिषदेत मनोगत व्यक्त केले. त्यांनीही संजीव कुमार यांनी मांडलेली मते आणि विचारांना दुजोरा दिला. आपल्या निवेदनातून त्यांनी भारताच्या संरक्षण उद्योगाच्या वाढत्या सामर्थ्याचीही दखल घेतली, आणि त्या अनुषंगाने प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भागीदारीच्या संधी ठळकपणे अधोरेखित केल्या.
या परिषदेत झालेल्या चर्चांमधून दोन्ही देशांनी परस्पर देवाणघेवाणीच्या सहकार्यापलीकडे जाऊन, भविष्यासाठी सज्ज, लवचिक आणि विश्वासार्ह संरक्षण भागीदारी प्रस्थापित करण्याची वचनबद्धताही पुन्हा ठामपणे व्यक्त केली. संरक्षण उत्पादन, देखभाल, दुरुस्ती आणि परिपूर्ण तपासणी (Maintenance, Repair, and Overhaul - MRO), एरोस्पेस आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान अशा क्षेत्रांमधील क्षमता समांतर पातळीवर आणण्यावर भर असलेल्या उद्योग-ते-उद्योग (B2B) चर्चा झाल्या. या चर्चांच्या माध्यमातून भारतासाठी आत्मनिर्भरता आणि निर्यातव्याप्त प्रगतीचा मार्गही प्रशस्त झाला.
या परिषदेला संयुक्त अरब अमिरातीतील भारताचे राजदूत संजय सुधीर, तवाझुन परिषदेचे संरक्षण आणि सुरक्षा औद्योगिक व्यवहार प्रमुख मतार अली अल रोमैथी,भारतीय संरक्षण उत्पादक संस्थेचे (Society of Indian Defence Manufacturers - SIDM) अध्यक्ष राजिंदर सिंग भाटिया आणि एज ग्रुपचे (EDGE Group) व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी हमाद अल मरार हे देखील उपस्थित होते.
सोनाली काकडे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2151119)