दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दूरध्वनीद्वारे होणारी फसवणूक रोखण्यासाठी नागरिकांच्या प्रतिक्रियांनुसार 1 कोटी 36 लाखांहून अधिक मोबाइल क्रमांकांची सेवा खंडित – केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांचे संसदेत प्रतिपादन

Posted On: 30 JUL 2025 8:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जुलै 2025

 

केंद्रिय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांनी आज लोकसभेत दूरध्वनीद्वारे होणाऱ्या फसवणुकीशी संबंधित मुद्दे आणि बीएसएनएल व एमटीएनएल या सार्वजनिक क्षेत्रातील दूरध्वनी सेवा पुरवठादार कंपन्यांच्या सद्यस्थितीबाबतच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची रुपरेषा केंद्रिय मंत्र्यांनी सभागृहात सांगितली.  सायबर गुन्हेगारी रोखणे व डिजिटल धोक्यांपासून नागरिकांचे रक्षण करणे यासाठी भारत सरकारने एक देशव्यापी मोहीम सुरू केली असून दूरसंवाद विभागांतर्गत गृह मंत्रालयाच्या सहकार्याने निर्णायक व तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांची साखळी राबवली असल्याचे केंद्रिय मंत्र्यांनी सांगितले.  

या उपक्रमाचा एक भाग म्हणून एक डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे. 520 बँका, 36 राज्य पोलिस दले, तपास यंत्रणा आणि दूरध्वनी सेवा पुरवठादार अशा 620 आस्थापनांना या प्लॅटफॉर्मद्वारे एकत्र आणून डिजिटल फसवणुकीविरोधात संयुक्तरित्या लगेचच कारवाई केली जात आहे. घोटाळेबाज व नागरिकांची फसवणूक करण्यासाठी दूरसंवाद यंत्रणांचा गैरवापर करणारे सायबर गुन्हेगार यांच्या विरोधात एकात्मिक कारवाई करणे या प्लॅटफॉर्ममुळे शक्य झाले आहे.

याशिवाय नागरिकांना या मोहीमेत सहभागी करुन घेण्यासाठी सरकारने 16 मे 2023 रोजी संचार साथी हे पोर्टल सुरू केले. आतापर्यंत 15.5 कोटींपेक्षा जास्त वेळा नागरिकांनी या पोर्टलचा वापर केला आहे, यावरुन नागरिकांचा वाढता सहभाग व जागरुकता दिसून येते. या यशाची दखल घेत 17 जानेवारी 2025 रोजी संचार साथी मोबाईल ऍप सुरू करण्यात आले. अँड्रॉइड व आयओएस दोन्ही प्रकारच्या मोबाइल यंत्रणांमध्ये वापरता येत असलेले हे ऍप 44 लाखांपेक्षा जास्त डाउनलोड करण्यात आले आहे.  

या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील माहितीच्या आधारे दूरसंवाद विभागाने 5.5 लाख मोबाइल बंद केले आणि मोठ्या संख्येने एकत्र एसएमएस पाठविणाऱ्या 20000 यंत्रणा निष्क्रीय केल्या. संशयास्पद कृत्ये करणारी सुमारे 24 लाख व्हॉटसऍप खातीही बंद करण्यात आली.  

मोबाइलधारकांना त्यांच्या नावे असणारे सर्व क्रमांक तपासून पाहण्याची आणि अनधिकृत क्रमांकाची तक्रार दाखल करण्याची सुविधा देणारे’ जाणून घ्या आपले मोबाईल कनेक्शन’  ही एक महत्त्वाची सेवा सुरू करण्यात आली. याचा परिणाम म्हणून असे 1.36 कोटी क्रमांक बंद करण्यात आले.  

सरकारने खोटा मोबाइल क्रमांक शोधून तो काढून टाकण्याची प्रक्रिया आपोआप व्हावी या उद्देशाने कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित साधनांचा, विशेषतः ASTR यंत्रणेचा वापर सुरू केला आहे. यामुळे आणखी 82 लाख क्रमांकांची सेवा खंडित करण्यात आली. भारतीय दूरध्वनी क्रमांक असल्याचे भासवून  फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रमांकांचा प्रश्न सोडविण्यासाठी दूरसंवाद विभागाने आंतरराष्ट्रीय इनकमिंग स्पूफ कॉल्स प्रतिबंध यंत्रणेअंतर्गत केंद्रिकृत संगणकीय प्रणालीचा पर्याय सुरू केला आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी फसवणूक करणारे 1.35 कोटी आंतरराष्ट्रीय क्रमांक बंद करण्यात आले आणि या प्रयत्नांमुळे फसवणुकीच्या घटना 97 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

याशिवाय आग्नेय  आशियाई देशांमधून केला जाणारा भारतीय सिमचा गैरवापर रोखण्यासाठीही दूरसंवाद विभागाने ठोस उपाययोजना अमलात आणल्या आहेत. अशा 26 लाखांपेक्षा जास्त रोमिंग सुविधा असलेल्या क्रमांकांची सेवा बंद करण्यात आली आणि अशा प्रकारच्या घोटाळ्यांमध्ये वापरलेली सुमारे 1.3 लाख संगणकीय साधनेदेखील बंद करण्यात आली.

भारताने यशस्वीरित्या विकसित केलेल्या स्वदेशी 4G तंत्रज्ञान प्रणालीचाही केंद्रिय मंत्र्यांनी विशेष उल्लेख केला.

 

* * *

निलिमा चितळे/सुरेखा जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2150435)