ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिला बचत गटांना बँकांकडून 11 लाख कोटी रुपयांहून अधिक कर्जांचे वाटप – शिवराज सिंह


"पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, बचत गटांना भक्कम आर्थिक पाठबळ मिळत असल्याने ग्रामीण सशक्तीकरणाला चालना" - शिवराज सिंह

Posted On: 30 JUL 2025 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जुलै 2025

 

दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-LM) अंतर्गत वित्तीय संस्थांद्वारे महिला बचत गटांना (SHGs) आतापर्यंत  11 लाख कोटी रु.हून अधिक रकमेच्या कर्जांचे वाटप करण्यात आले असल्याचे केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज सांगितले. हा महत्वाचा टप्पा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या समावेशक ग्रामीण विकास, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि गावपातळीवर स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्याबद्दलच्या दृढ वचनबद्धतेचेही दर्शन घडवतो.

केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले की ग्रामीण विकास मंत्रालयाच्या दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियाना अंतर्गत, देशभरातील ग्रामीण गरीब महिला भक्कम सामुदायिक संस्थांच्या माध्यमातून आपल्या  उपजीविकेला अधिक बळ देत आहेत. बचत गटांमार्फत, त्यांना तारण-मुक्त कर्ज, व्याज अनुदान आणि इतर आर्थिक सहाय्य दिले जाते, ज्यामुळे त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्यांचे उत्पन्न वाढवू शकतात. कर्जफेडीचे प्रमाण 98% हून अधिक असल्याने त्यातून उपक्रमाची विश्वासार्हता, शिस्त आणि व्यवस्थापन कार्यक्षमता स्पष्टपणे प्रकट होते.

या संदर्भात बँकिंग समुदायाने दिलेल्या पाठिंब्याची प्रशंसा करताना शिवराज सिंह म्हणाले की, बँकिंग भागीदारांनी लाखो ग्रामीण महिलांची स्वप्ने सत्यात उतरवण्यात उल्लेखनीय भूमिका बजावली आहे. 'बँक सखीं'च्या अथक प्रयत्नांमुळे बचत गटांना बँकांशी जोडणे सोपे झाले असून कर्जाची वेळच्या वेळी परतफेड केली जाईल याची खात्री झाली आहे.

मंत्री पुढे म्हणाले की, देशातील कर्जफेड प्रणाली बळकट केली जात आहे. 'बँक सखीची' आर्थिक व्यवहार, कर्जासाठीचे अर्ज आणि कागदपत्रे तसेच विमा, निवृत्तीवेतन आणि इतर आर्थिक योजनांबाबत जागरूकता निर्माण करण्यास मदत होत आहे. शिवाय, या महत्त्वाच्या कार्यक्रमांतर्गत कर्जाची वेळेवर वसुली सुनिश्चित करण्यासाठी समुदाय आधारित परतफेड यंत्रणा बळकट केली जात आहे.

दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान आणि 'लखपती दीदी' सारखे केंद्र सरकारचे उपक्रम ग्रामीण भारतातील लाखो महिलांची आर्थिक स्थिती पालटत आहेत. हे यश केवळ आकडेवारीपुरतेच नसून सामूहिक शक्तीचे तसेच महिलांना संधी, आत्मविश्वास आणि संसाधने उपलब्ध करून दिल्यास त्या देशाला स्वयंपूर्णतेत नव्या उंचीवर नेऊ शकतात याचे द्योतक असल्याचे ते म्हणाले.

 

* * *

निलिमा चितळे/मंजिरी गानू/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2150345)
Read this release in: Kannada , English , Urdu , Hindi