सांस्कृतिक मंत्रालय
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्यावतीने मध्य प्रदेशात लोकनृत्य कार्यशाळा सुरू
Posted On:
29 JUL 2025 10:02PM by PIB Mumbai
नागपूर, 29 जुलै 2025
- मध्य प्रदेशातील जबलपूर येथे 26 जुलै 2025 रोजी राय आणि पंथी लोकनृत्य प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन
- मध्य प्रदेशातील दिंडोरी येथे 1 ते 6 ऑगस्ट 2025 दरम्यान बैगा कर्मा आदिवासी नृत्य कार्यशाळेचे आयोजन.
- भविष्यात इतर सहभागी राज्यांमध्येही अशाच प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करण्याचे नियोजन.
सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र (एससीझेडसीसी), नागपूरने, महाराष्ट्र शिक्षण मंडळ, जबलपूर यांच्या सहकार्याने, भारताच्या विविध लोकनृत्य परंपरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी मध्य प्रदेशात वैविध्यपूर्ण लोकनृत्य कार्यशाळांची मालिका सुरू केली आहे.

जबलपूर येथे 26 जुलै, 2025 रोजी 'राय आणि पंथी लोकनृत्य प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एससीझेडसीसी नागपूरचे सहाय्यक संचालक (कार्यक्रम) दीपक कुलकर्णी; महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव प्रमोद पाठक; शताब्दी वर्ष समिती, महाराष्ट्र शिक्षण मंडळ, जबलपूरचे सदस्य अनिल राजूरकर; शताब्दी वर्ष समिती, महाराष्ट्र शिक्षण मंडळ, जबलपूरचे सदस्य दीपक उबाळे; आणि महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप सिंह हजारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. जयंत तनखीवाले यांनी केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक प्रद्युम्न कायंदे यांनी केले.
'राय लोकनृत्य कार्यशाळेचे' संचालन मध्य प्रदेशातील सागर येथील राय लोकनृत्य कलाकार श्री. संतोष पांडे करत आहेत, जे विद्यार्थ्यांना राय लोकनृत्य परंपरेच्या गुंतागुंतीच्या तंत्रांचे प्रशिक्षण देत आहेत. दरम्यान, 'पंथी लोकनृत्य कार्यशाळा' छत्तीसगडमधील भिलाई येथील पंथी लोकनृत्य कलाकार दिलीप बंजारे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली जात आहे. सहभागी विद्यार्थ्यांकडून या कार्यशाळांना उत्साही प्रतिसाद मिळत आहे. 31जुलै, 2025 रोजी संपणाऱ्या या सहा दिवसांच्या कार्यशाळांमध्ये 150 हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

मध्य प्रदेशातील दिंडोरी येथील चाडा गावात 1 ते 6 ऑगस्ट 2025 दरम्यान, आदिवासी कलेसाठी आयुष्य वेचणारे आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त बैगा कर्मा आदिवासी नृत्य कलाकार अर्जुन सिंग धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली बैगा कर्मा आदिवासी नृत्य कार्यशाळा आयोजित केली जात आहे.
सर्व कार्यशाळा ‘स्कूल कनेक्ट प्रोग्राम’ चा भाग म्हणून आयोजित केल्या जात आहेत. त्यामागे लोकनृत्य कला प्रकाराकडे नवीन पिढीला आकर्षित करणे आणि भारतातील स्थानिक कला प्रकारांना प्रोत्साहन देणे असा आहे. येत्या काही महिन्यांत इतर सहभागी राज्यांमध्ये अशाच कार्यशाळा आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे.

* * *
पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/सुवर्णा बेडेकर/ दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2149991)
अभ्यागत कक्ष : 8