संरक्षण मंत्रालय
अति उंचीवर आकाश प्राईमची यशस्वी चाचणी
Posted On:
17 JUL 2025 9:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2025
भारताने 16 जुलै 2025 रोजी लडाख येथे आकाश प्राईम या भारतीय लष्करातील आकाश शस्त्र प्रणालीच्या आधुनिक आवृत्तीच्या मदतीने अतिउंचीवरील दोन हवाई अतिद्रुतगती मानवरहित लक्ष्यांना यशस्वीरित्या नष्ट करून एक महत्त्वाचा टप्पा साध्य केला. ही शस्त्र प्रणाली 4500 मीटरपेक्षा जास्त उंचीवर काम करण्यासाठी तयार करण्यात आली आहे आणि त्यामध्ये रेडियो फ्रिक्वेन्सीचा माग काढणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या यंत्रणेचा समावेश आहे. विविध वापरकर्त्यांकडून परिचालनविषयक वापराचे अनुभव लक्षात घेऊन, परिचालनात्मक परिणामकारकतेत सुधारणा करण्यासाठी विविध प्रकारचे अद्ययावतीकरण करण्यात येते ज्यामधून स्वदेशी बनावटीच्या शस्त्र प्रणालीसाठी तयार करण्यात आलेल्या परिसंस्थेचे फायदे प्रदर्शित होतात.

लष्कराचा हवाई संरक्षण विभाग आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था यांनी, भारत डायनामिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांसारख्या संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांच्या आणि इतर उद्योग भागीदारांच्या सहकार्याने, स्वदेशी बनावटीच्या आकाश प्राईम शस्त्र प्रणालीची यशस्वीरीत्या पडताळणी केली आहे. या चाचण्या 'फर्स्ट ऑफ प्रॉडक्शन मॉडेल फायरिंग ट्रायल' चा भाग होत्या. यामुळे या प्रणालीचा वेळेत समावेश करणे शक्य होईल आणि देशाच्या उंच पर्वतीय सीमांवरील हवाई संरक्षण क्षमता वाढेल.
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारताच्या स्वदेशी बनावटीच्या हवाई संरक्षण प्रणालींनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर हे साध्य झाल्यामुळे ही कामगिरी विशेष महत्त्वाची आहे. यामुळे देशाच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांना मोठी चालना मिळाली आहे, ज्यांच्याकडे आता जागतिक संरक्षण बाजारपेठेत जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष वेधले जात आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कर, डीआरडीओ आणि संरक्षण उद्योगाचे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे. भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेसाठी, विशेषतः उच्च-उंचीवरील (high-altitude) परिचालनात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी, एक महत्त्वपूर्ण चालना अशा शब्दात त्यांनी या कामगिरीची प्रशंसा केली आहे.
संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष, डॉ. समीर व्ही. कामत यांनी यशस्वी चाचणीशी संबंधित सर्व चमूचे अभिनंदन केले आणि सांगितले की, या क्षेपणास्त्राने देशाच्या उच्च-उंचीवरील महत्त्वाच्या हवाई संरक्षण गरजांची पूर्तता केली आहे.
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2145670)
Visitor Counter : 5