नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बिम्स्टेक( BIMSTEC) सागरी वाहतूक करार म्हणजे बंगालच्या उपसागराला जागतिक व्यापार आणि पर्यटन केंद्रामध्ये रूपांतरित करण्याची ब्लूप्रिंट: सर्बानंद सोनोवाल


केंद्रीय मंत्र्यांनी विशाखापट्टणम येथे दोन दिवसीय दुसऱ्या BIMSTEC बंदरे परिषदेचे केले उद्घाटन; बंगालच्या उपसागरात कनेक्टिव्हिटी आणि शाश्वत विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट

"बिम्स्टेक शाश्वत सागरी वाहतूक केंद्र मुंबईतील पवई येथे उभारले जाणार आहे AMTC कराराची अंमलबजावणी करण्याचा उद्देश": सर्बानंद सोनोवाल

Posted On: 14 JUL 2025 10:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 जुलै 2025

 

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री, सर्बानंद सोनोवाल यांनी आज दुसऱ्या बिम्स्टेक बंदरे परिषदेचे उद्घाटन केले. या दोन दिवसीय कार्यक्रमाने बंगालच्या उपसागर क्षेत्रातील प्रादेशिक सागरी संपर्कव्यवस्था, बंदरांमधील सहकार्य आणि शाश्वत विकास मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कार्यक्रमाला सातही बिम्स्टेक राष्ट्रांतील (बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड) धोरणकर्ते, उच्च पदस्थ अधिकारी, सागरी तज्ज्ञ, बंदर अधिकारी, खाजगी क्षेत्रातील भागधारक आणि शैक्षणिक विद्वान उपस्थित आहेत.

बंदर आधारित औद्योगिक समूहांच्या शाश्वत विकासासाठी बिम्स्टेक बंदरे परिषदेची भूमिका विचारात घेऊन, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी त्यांचे विचार मांडले. ते म्हणाले, “बिम्स्टेक बंदरे परिषद ही बंगालच्या उपसागर प्रदेशातील नील अर्थव्यवस्थेच्या अफाट क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी  एक महत्त्वाचे माध्यम आहे. बंदरांचे एक अखंड आणि कार्यक्षम जाळे तयार करणे, जे विकासाचे इंजिन म्हणून काम करू शकेल. संयुक्त व्यवहार्यता अभ्यास, सार्वजनिक-खाजगी भागीदारी  आणि आमच्या सागरी कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासाद्वारे, आम्ही आमच्या प्रदेशाला जागतिक व्यापार, पर्यटन आणि शाश्वत आर्थिक प्रगतीचे एक भरभराटीचे केंद्र बनवू शकतो.”

“पहिल्या बिम्स्टेक बंदरे परिषदेच्या यशाच्या आधारे, नवीनच स्वाक्षरी झालेल्या बिम्स्टेक सागरी वाहतूक सहकार्य कराराची (AMTC) अंमलबजावणी करणे, बंदरांच्या नेतृत्वाखालील विकासावर संवाद साधणे आणि सागरी व्यापार, लॉजिस्टिक्स, क्रूझ पर्यटन व कौशल्य विकासामध्ये सखोल एकीकरण वाढवणे हा या परिषदेचा उद्देश आहे. ही परिषद बंगालच्या उपसागरासाठी शाश्वत, लवचिक आणि एकात्मिक सागरी भविष्याकडे एक सामाईक मार्ग तयार करण्याच्या उद्देशाने आयोजित केली आहे, ज्यामुळे मजबूत आर्थिक वाढीला प्रोत्साहन मिळेल आणि पर्यावरणाचेही संरक्षण सुनिश्चित होईल. भारताने या कराराला सर्वप्रथम मान्यता दिली होती. केंद्रीय मंत्र्यांनी सागरी वाहतूक सहकार्य कराराच्या (AMTC) जलद मान्यतेसाठी आणि अंमलबजावणीसाठी आवाहन केले. 

सर्बानंद सोनोवाल यांनी घोषणा केली की, मुंबईतील पवई येथील मेरीटाईम  ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये इंडियन ओशन सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर सस्टेनेबल मेरीटाईम ट्रान्सपोर्ट (IOCE-SMarT) अंतर्गत एक बिम्स्टेक शाश्वत सागरी वाहतूक केंद्र स्थापन केले जाईल. बिम्स्टेक सागरी वाहतूक सहकार्य कराराच्या (AMTC) अंमलबजावणीसाठी या केंद्राच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत, सर्बानंद सोनोवाल म्हणाले, “हे केंद्र बिम्स्टेक सागरी वाहतूक सहकार्य कराराच्या (AMTC) अंमलबजावणीमध्ये एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे केंद्र सागरी धोरणांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी, डिजिटल आणि हरित परिवर्तनाला गती देण्यासाठी आणि आपल्या सागरी कर्मचाऱ्यांचे कौशल्य व क्षमता वाढवण्यासाठी उत्प्रेरक म्हणून कार्य करेल. सहकार्य आणि नवोन्मेषाला चालना देऊन, ते व्यापार खर्च कमी करण्यास, कनेक्टिव्हिटी वाढवण्यास आणि बंगालच्या उपसागराला प्रादेशिक व जागतिक व्यापाराचे एक सातत्याने क्रियाशील, शाश्वत केंद्र म्हणून स्थापित करण्यास मदत करेल.”

 

* * *

S.Kakade/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2144723)
Read this release in: English , Hindi