संरक्षण मंत्रालय
आयएनएस कवरत्ती वरून घेण्यात आल्या विस्तारित पल्ल्याच्या पाणबुडीविरोधी रॉकेटच्या यशस्वी वापरकर्ता चाचण्या
Posted On:
08 JUL 2025 9:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2025
भारतीय नौदलाच्या आयएनएस कवरत्ती या युद्धनौकेवर 23 जून ते 07 जुलै 2025 या कालावधीत एक्सटेंडेड रेंज अँटी सबमरीन रॉकेट (ईआरएएसआर), अर्थात विस्तारित पल्ल्याच्या पाणबुडीविरोधी रॉकेटच्या यशस्वी युजर ट्रायल (वापरकर्ता चाचण्या) घेण्यात आल्या. डीआरडीओच्या आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (एआरडीई), पुणे ने हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी आणि नेव्हल सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरी यांच्या सहयोगाने भारतीय नौदलाच्या जहाजांच्या स्वदेशी रॉकेट लाँचरसाठी (आयआरएल) एक्सटेंडेड रेंज अँटी सबमरीन रॉकेट (ईआरएएसआर) डिझाइन आणि विकसित केले आहे.
ईआरएएसआर हे पूर्णपणे स्वदेशी पाणबुडीविरोधी रॉकेट आहे, जे पाणबुडी विरोधात वापरले जाते आणि भारतीय नौदलाच्या जहाजांच्या आयआरएल (IRL) वरून डागले जाते. अधिक अचूकता आणि सुसंगतता, यासह विस्तृत श्रेणीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी यामध्ये ट्विन-रॉकेट मोटर कॉन्फिगरेशन आहे. ईआरएएसआरमध्ये स्वदेशी बनावटीच्या इलेक्ट्रॉनिक टाइम फ्यूजचा वापर करण्यात आला आहे.

एकूण 17 ईआरएसआरची विविध श्रेणींमध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली. चाचण्यांमध्ये रेंज परफॉर्मन्स, इलेक्ट्रॉनिक टाइम फ्यूज फंक्शनिंग आणि वॉरहेड फंक्शनिंग यासारख्या सर्व विशिष्ट उद्दिष्टांच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या.
भारत डायनॅमिक्स लिमिटेड, हैदराबाद आणि सोलर डिफेन्स अँड एअरोस्पेस लिमिटेड, नागपूर हे ईआरएएसआर रॉकेट्सचे उत्पादन भागीदार आहेत. युजर ट्रायल यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर भारतीय नौदलामध्ये लवकरच ईआरएएसआर प्रणालीचा समावेश होण्याची शक्यता आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय नौदल आणि या प्रणालीचा विकास आणि चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या उद्योगांचे अभिनंदन केले आहे. भारतीय नौदलात ही यंत्रणा दाखल झाल्याने नौदलाची मारक शक्ती वाढेल, असे ते म्हणाले.
संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनीही ईआरएएसआरचे डिझाइन आणि विकासामध्ये सहभागी झालेल्या पथकांची प्रशंसा केली.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2143265)