युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पुण्यात ‘एबीसी प्रो बास्केटबॉल लीग’ च्या चौथ्‍या आवृत्तीचा केला प्रारंभ



Posted On: 07 JUL 2025 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जुलै 2025


केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत काल, 6 जुलै 2025 रोजी पुण्यातील खराडी येथील राजाराम भिकू पठारे स्टेडियममध्ये एबीसी प्रो बास्केटबॉल लीगच्या चौथ्‍या हंगामाचे उद्घाटन झाले. सक्षम युवक आणि चैतन्यशील क्रीडा संस्कृती वर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकसित भारत' दृष्टीकोनाला आणि  'खेलो भारत धोरण  2025' च्या उद्दिष्टाना अनुलक्षून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लीगचे उद्दिष्ट समाजाचा तळागाळामध्‍ये असलेल्या, परंतु आत्तापर्यंत दिसून  न आलेल्या  बास्केटबॉलमधील  प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेणे, युवा खेळाडूंना व्यावसायिक व्यासपीठ प्रदान करणे आणि देशभरात एक मजबूत क्रीडा परिसंस्थेला प्रोत्साहन देणे आहे.

कार्यक्रमाचा  प्रारंभ सायंकाळी 4:00 वाजता पहिल्या सामन्याने झाला. या सामन्यामुळे  नव्या हंगामामध्‍ये एक उत्साही वातावरण निर्माण झाले. त्यानंतर 5.15  वाजता  उद्घाटन समारंभ झाला. यावेळी  राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे भाषण झाले आणि याचवेळी त्यांच्या हस्ते  चषक अनावरण करण्‍यात आले.खेळाडू आणि उत्साही प्रेक्षकांना त्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी  राष्ट्रगीत आणि सहभागी संघांनी संचलन  केले. यावेळी रक्षा खडसे यांनी सहभागी संघ आणि आयोजकांशी संवाद साधला,  खेळ हा प्रत्येक मुलाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवण्यासाठी आणि लहानपणापासूनच क्रीडा उत्कृष्टतेचा ध्‍यास घेतला गेला पाहिजे.क्रीडा  मंत्रालयामार्फत विविध क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यासाठी  विशेष प्रयत्‍न केले जात आहेत, मुलांना क्रीडा विषयक सुविधा उपलब्ध करून देण्‍यासाठी मंत्रालय वचनबध्‍द असल्याचे  त्यांनी सांगितले. त्यांनी ‘एबीसी फिटनेस फर्म, बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया (बीएफआय) आणि सर्व संबंधित भागीदारांच्या ज्या ध्‍येयासाठी कार्य करीत आहेत, ते उद्दिष्‍ट साध्‍य करण्‍यासाठी, प्रत्यक्षात आणण्यासाठी समर्पित कार्याबद्दल केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, “एबीसी प्रो बास्केटबॉल लीग आपल्या देशातील तरुणांच्या भावनेचे आणि क्रीडा महासत्ता बनण्याच्या आपल्या सामूहिक आकांक्षेचे प्रतीक आहे. आज येथे उत्साह आणि क्रीडा  प्रतिभा पाहणे खरोखरच प्रेरणादायी आहे. ही गोष्‍ट  आपल्या सरकारच्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमाशी पूर्णपणे सुसंगत आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “अशाप्रकारच्या तळातील प्रतिभावंत खेळाडूंमध्‍ये  गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे  आहे. मिळवलेला प्रत्येक गुण, प्रत्येक धोरणात्मक पास, एक निरोगी, अधिक स्पर्धात्मक आणि अधिक एकात्म भारत निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.  ही गोष्‍टच  पंतप्रधान मोदींच्या विकसित राष्ट्राच्या दृष्टिकोनाच्या जवळ घेऊन जात आहे जिथे  प्रत्येकामध्‍ये असलेल्या प्रतिभेला योग्य स्थान आहे.”

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार या लीगमध्ये महाराष्ट्रातून 5,000 हून अधिक तरुणांच्या  कठोर निवड प्रक्रियेनंतर,स्पर्धात्मक लिलाव प्रक्रियेद्वारे 1,000 प्रतिभावंत खेळाडूंची निवड करण्यात आली आणि शेवटी 14 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील 310 खेळाडूंची निवड लीगसाठीच्या 19 संघांसाठी  करण्‍यात आली. 


N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2142939)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil