गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील पुणे येथे श्री पूना गुजराती बंधू समाजाने बांधलेल्या "जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर" चे केले उद्घाटन
Posted On:
04 JUL 2025 6:52PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रातील पुणे येथे श्री पूना गुजराती बंधू समाजाने बांधलेल्या "जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर" चे उद्घाटन केले. या प्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संपूर्ण देशातील गुजराती समुदायाची सर्वात सुंदर इमारत पूना गुजराती समाजाने उभारली आहे. त्यांनी नमूद केले की जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सर्व गुजराती समुदायाच्या इमारतींसाठी 5 कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. ते पुढे म्हणाले की, गेल्या 13 वर्षांत पूना गुजराती बंधू समाजाने एकत्रितपणे काम केले आहे तसेच एकतेने आणि कोणत्याही वादविवादांशिवाय या इमारतीच्या बांधकामात योगदान दिले आहे.
अमित शाह म्हणाले की श्री पूना गुजराती बंधू समाज 1913 पासून ११२ वर्षे पुण्यातील समुदायासोबत एकजुटीने काम करत आहे. ते म्हणाले की, गुजराती व्यक्ती कोणत्याही राज्यात कुठेही गेली तरी ती केवळ टिकूनच राहत नाही तर त्या समाजाचा अविभाज्य भाग बनते आणि त्याच्या प्रगतीत योगदान देते.
त्यांनी नमूद केले की जगात गुजराती जिथे कुठे गेले, तिथे त्यांनी गुजरातचे नाव उंचावले, आणि ते कधीच कोणत्याही प्रकारच्या वादात अडकले नाहीत. त्यामुळेच 1913 ते 2025 या 113 वर्षांच्या कालखंडातील या समाजाच्या उल्लेखनीय प्रवासाची परिणती या अद्वितीय वास्तूच्या निर्मितीत झाली, असे ते म्हणाले.
अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 11 वर्षांत देशापुढील अनेक समस्या सोडवल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, भारतात ऑलिम्पिकचे आयोजन करणे ही एकेकाळी अकल्पनीय गोष्ट होती, परंतु भारत 2036 मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवेल आणि पदकतालिकेत पहिल्या 10 देशांमध्ये स्थान मिळवेल. 11 वर्षांपूर्वी भारताची अर्थव्यवस्था जगातील 11 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती आणि आज ती चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, असे ते म्हणाले. गेल्या 11 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद, नक्षलवाद आणि ईशान्य भारतातील हिंसाचार जवळजवळ संपवला आहे, यावर त्यांनी भर दिला. 31 मार्च 2026 पर्यंत देशातून चार दशकांपासूनचा नक्षलवाद पूर्णपणे नष्ट केला जाईल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
अमित शाह म्हणाले की, नव्याने बांधलेल्या जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पाच हजार पुस्तकांचा संग्रह असलेले वाचनालय आहे. पूना गुजराती बंधू समाजाच्या सर्व सदस्यांनी ग्रंथालयासाठी प्रत्येकी दोन पुस्तके खरेदी करून हातभार लावावा, ज्यामुळे हा पुस्तक संग्रह 15,000 पर्यंत वाढेल, असे आवाहन त्यांनी केले. आपण आपल्या मुलांमध्ये इतिहासाबद्दल वाचनाची आणि अधिक जाणून घेण्याची सवय रुजवायला हवी, यावर त्यांनी भर दिला.
***
S.Kane/N.Mathure/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2142362)
Visitor Counter : 2