लोकसभा सचिवालय
लोकसभा अध्यक्ष गुरुग्राममधील मानेसर येथे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षांच्या पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे करणार उद्घाटन
Posted On:
02 JUL 2025 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जुलै 2025
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला गुरुवार, 03 जुलै 2025 रोजी हरियाणाच्या गुरुग्राममधील मानेसर येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी येथे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षांच्या पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे उद्घाटन करतील.
वेगाने शहरीकरण होत असलेल्या भारतातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची महत्त्वाची भूमिका मांडण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. लोकशाही संस्थांना बळकटी देणे, सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे तसेच समकालीन युगात शहरी प्रशासनासाठी नाविन्यपूर्ण दृष्टिकोनांचा शोध घेणे आणि त्यांना प्रकाशमान करणे हे याचे उद्दिष्ट आहे.
या परिषदेचा विषय आहे: "संवैधानिक लोकशाही आणि राष्ट्र उभारणी बळकट करण्यात शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका”
दोन दिवसांच्या परिषदेत संपूर्ण भारतातील प्रतिनिधी खालीलप्रमाणे महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील:
i. लोकशाहीचे पायाभूत आधारस्तंभ म्हणून शहरी स्थानिक स्वराज्य संस्था: सर्वसाधारण परिषदेच्या बैठकींच्या आदर्श पद्धती तसेच कार्यपद्धती आणि आचारसंहिता विकसित करणे;
ii. समावेशक वाढ आणि विकासाचे इंजिन म्हणून शहरी स्थानिक स्वराज्य संस्था: संवैधानिक आदेश अंमलात करण्यासाठी नगरपालिका प्रशासन अधिक प्रभावी बनवणे;
iii. 21 व्या शतकातील भारताचे शिल्पकार म्हणून शहरी स्थानिक स्वराज्य संस्था: 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यात योगदान;
iv. महिला सक्षमीकरणाचे साधन म्हणून शहरी स्थानिक स्वराज्य संस्था - समाज आणि राजकारणातील नेतृत्व पदांसाठी महिलांना तयार करण्याची भूमिका; आणि
v. नवोन्मेष आणि सर्वोत्तम पद्धतींच्या मुशी म्हणून शहरी स्थानिक स्वराज्य संस्था: सार्वजनिक वितरण आणि नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा.
4 जुलै 2025 रोजी परिषदेच्या कामकाजाची सुरुवात पाच गटांनी त्यांच्याशी संबंधित उप-विषयांवर केलेल्या सादरीकरणांनी होईल. 4 जुलै रोजी होणाऱ्या समारोप सत्राला हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय उपस्थित राहतील आणि ते मान्यवरांना संबोधित करतील. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश; हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण आणि इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित राहतील.
परिषदेच्या समारोपाच्या दिवशी प्रतिनिधींसाठी प्रेरणा स्थळ, संविधान सदन आणि संसद भवनाची झलक फेरीदेखील आयोजित केली जाईल.
S.Patil/N.Mathure/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2141666)