आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चंद्रपूरच्या आयसीएमआर केंद्राने सिकलसेल आणि थॅलेसेमिया या आजारांवरील संशोधनात मिळवलेल्या यशाची राष्ट्रीय माध्यम प्रतिनिधीमंडळाने केली प्रशंसा


2047 सालापर्यंत सिकलसेल या आजाराचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट असलेल्या राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन मिशन अंतर्गत एक प्रमुख उपक्रम म्हणून,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2022 मध्ये आयसीएमआर-सीआरएमसीएचचे झाले होते उद्घाटन

आरोग्य संशोधन विभागाच्या (DHR) नेतृत्वाखालील आरोग्य तंत्रज्ञान मूल्यांकनांमुळे सिकलसेल निदान चाचणी किटची किंमत प्रति चाचणी 350 रुपयांवरून 50 वर,सरकारची  सुमारे  1,857 कोटी रुपयांची बचत

प्रविष्टि तिथि: 20 JUN 2025 4:30PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अतिरिक्त महासंचालक (माध्यम) डॉ. मनीषा वर्मा यांच्या नेतृत्वाखालील 10 सदस्यीय राष्ट्रीय माध्यम प्रतिनिधीमंडळाने आज महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यातील, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर), अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सेंटर फॉर रिसर्च, मॅनेजमेंट अँड कंट्रोल ऑफ हिमोग्लोबिनोपॅथीज (सीआरएमसीएच) येथे भेट दिली. आठवड्याच्या सुरुवातीला या शिष्टमंडळाने पुण्यातील आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था) येथेही भेट दिली.

आयसीएमआर-सीआरएमसीएच येथे, प्रतिनिधीमंडळाचे स्वागत संचालक डॉ. मनीषा मडकईकर यांनी केले. त्यांनी विदर्भात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या हिमोग्लोबिनोपॅथी, विशेषतः सिकलसेल (एससीडी) आणि थॅलेसेमिया या आजारांवरील उपचारात केंद्राने केलेल्या पथदर्शी कामाची सखोल माहिती दिली.

डॉ. मडकईकर यांनी केंद्राच्या समग्र दृष्टिकोनावर प्रकाश टाकला, ज्यामध्ये जनुकीय संशोधन, रुग्ण समुपदेशन, निदान आणि मोफत वैद्यकीय सेवा यांचा समावेश आहे. आमचे प्रयत्न केवळ उपचारच नव्हेत, तर विशेषतः आदिवासी लोकसंख्येमध्ये रोगाचे लवकर निदान आणि प्रतिबंध हे देखील आहेत,” त्या म्हणाल्या. हे केंद्र मासिक दवाखाने आणि जनजागृती शिबिरे आयोजित करण्यासाठी स्थानिक सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्थांबरोबर समन्वय देखील साधते.

प्रतिनिधीमंडळाने रक्त तपासणी, आण्विक निदान आणि जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सीआरएमसीएचच्या अत्याधुनिक प्रयोगशाळांना भेट दिली. त्यांनी केंद्रात सेवा घेणाऱ्या रुग्णांशी आणि कुटुंबांशी संवाद साधला आणि अत्याधुनिक वैद्यकीय विज्ञानाचा प्रभाव तळागाळापर्यंत कसा पोहोचतो, हे प्रत्यक्ष पहिले.

राष्ट्रीय मिशनची कामगिरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन मिशन अंतर्गत एक प्रमुख उपक्रम म्हणून, आयसीएमआर-सीआरएमसीएचचे उद्घाटन केले होते. 2047 साला पर्यंत या आजाराचे उच्चाटन करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. हे केंद्र सध्या अनेक महत्त्वाच्या संशोधन प्रकल्पांमध्ये गुंतलेले आहे, ज्यामध्ये एससीडी चे लवकर निदान करण्यासाठी किफायतशीर स्वदेशी निदान किटचे प्रमाणीकरण समाविष्ट आहे.

आयसीएमआर-एनआयआयएचमधील अग्रगण्य उपाय

सीआरएमसीएच चे प्रशासन पाहणाऱ्या मुंबईमधील आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमॅटोलॉजी (एनआयआयएच) या संस्थेच्या महत्वाच्या कामगिरीची देखील या भेटीत माहिती देण्यात आली. बॉम्बे ब्लड ग्रुपचा शोध आणि भारतातील पहिली मॉलिक्युलर इम्युनोहेमॅटोलॉजी लॅब स्थापन करण्यासाठी ओळखली जाणारी आयसीएमआर-एनआयआयएच, आयसीएमआर-एनआयआयएच, रक्त आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या विकारांमधील नवोन्मेशाचे नेतृत्व करत आहे.

संस्थेचे काही महत्वाचे उपक्रम:

हिमोफिलिया ए आणि व्हॉन विलेब्रँड या रोगासाठीचे पॉईंट-ऑफ-केअर (पीओसी) डायग्नोस्टिक किट्स, चाचणीचा खर्च प्रति रुग्ण 2,086 रुपयांवरून 582 रुपयांपर्यंत कमी करते, ज्यामध्ये रोगाचे निदान न झालेल्या 83,000 पेक्षा जास्त प्रकरणांचा शोध घेण्याची क्षमता आहे आणि यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेच्या खर्चात 42 कोटी रुपयांची बचत होऊ शकते.

एचटीए च्या सहाय्याने खर्च कमी झाला

आरोग्य संशोधन विभागाच्या (डीएचआर) नेतृत्वाखालील आरोग्य तंत्रज्ञान मूल्यांकनांमुळे सिकलसेल डायग्नोस्टिक किटची किंमत प्रति चाचणी 350 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत कमी झाली, ज्यामुळे सरकारची  जवळजवळ 1,857 कोटी रुपयांची बचत झाली.

रेअर डोनर रजिस्ट्री ऑफ इंडिया (आरडीआरआय): अत्यंत दुर्मिळ रक्तगटांसाठीचा राष्ट्रीय डेटाबेस, आता देशभरात आपत्कालीन रक्त संक्रमणासाठी सहाय्य करत आहे आणि असंख्य प्राण वाचवत आहे.

अनुवांशिक रोगप्रतिकारकशक्तीविषयक  विकारांसाठी उत्कृष्टता केंद्र: प्रगत चाचणी, जनुकीय समुपदेशन, प्रसूतीपूर्व तपासणी आणि प्रशिक्षण या सेवा देते, ज्याचा लाभ भारत आणि दक्षिण आशियातील रुग्णालयांना होत आहे.

नवोन्मेष, सहकार्य आणि लक्ष्यित पोहोच यांच्या माध्यमातून, आयसीएमआर-एनआयआयएच आणि सीआरएमसीएच रक्त आणि रोगप्रतिकारकशक्तीविषयक अनुवांशिक विकारांविरोधातील भारताच्या लढ्यात  एक नवीन अध्याय लिहित आहेत, आणि विज्ञान सर्वात असुरक्षित समुदायांना सेवा देईल आणि कोणताही रुग्ण मागे राहणार नाही याची खात्री देत आहे.

***

N.Chitale/R.Agahe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2138101) आगंतुक पटल : 46
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English