पंचायती राज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“माहिती आणि सेवा मिळवण्यात भाषेचा कोणताही अडथळा नसावा” केंद्रीय पंचायती राज मंत्रालय आणि भाषिणी यांच्यातील सामंजस्य कराराच्या वेळी केंद्रीय मंत्री प्रा.एस.पी.सिंह बघेल यांचे प्रतिपादन

Posted On: 19 JUN 2025 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जून 2025

नागरिक-केंद्रित डिजिटल प्रशासनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत केंद्रीय पंचायती राज मंत्रालय (एमओपीआर) आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (एमईआयटीवाय)अखत्यारीतील भाषिणी हे राष्ट्रीय भाषा अनुवाद  अभियान यांच्यात आज नवी दिल्ली येथे सामंजस्य करार करण्यात आला.ई-ग्रामस्वराज मंचाचा रिअल टाईम  बहुभाषिक वापर करता यावा आणि त्यायोगे समावेशकता आणखी दृढ करत तसेच देशभरातील ग्रामीण भागधारकांसाठी उपलब्धतेतील सुलभता सुधारावी या उद्देशाने ही भागीदारी करण्यात आली आहे.  

केंद्रीय पंचायती राज विभागाचे राज्यमंत्री प्रा.एस.पी.सिंह बघेल यांच्या सन्माननीय उपस्थितीत पंचायती राज मंत्रालयाचे संयुक्त सचिव आलोक प्रेम नागर आणि भाषिणी उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग यांनी या धोरणात्मक सहयोगाची सुरुवात करत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

सामंजस्य करारावरील स्वाक्षऱ्यांच्या कार्यक्रमात बोलताना बघेल यांनी या सहयोगाचे वर्णन भारताच्या समृद्ध भाषिक वैविध्याचा सन्मान करणारे आणि तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक नागरिकाला सक्षम करण्यासाठी करणारे  परिवर्तनकारी पाऊल असे केले. भाषिणीच्या आधुनिक कृत्रिम तंत्रज्ञानाधारित भाषांतर तंत्रज्ञानाचे ई ग्राम स्वराज मंचाशी एकत्रीकरण  विविध भारतीय भाषांमध्ये संवाद साधणे शक्य करुन, विशेषतः मुलभूत स्तरावर सेवा वितरण तसेच प्रशासनात लक्षणीय सुधारणा घडवून आणेल यावर त्यांनी अधिक भर दिला. यामुळे राज्यकारभार अधिक सहभागात्मक, स्थानिकीकृत तसेच नागरिक-केंद्री होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 11 वर्षांत थेट लाभ हस्तांतरणाच्या (डीबीटी) धोरणात्मक तसेच अर्थपूर्ण अंमलबजावणीमुळे  लाखो ग्रामीण नागरिकांचे जीवन कशा प्रकारे बदलून गेले आहे हे केंद्रीय मंत्री बघेल यांनी अधोरेखित केले. डिजिटल पायाभूत सुविधांमुळे सेवा वितरण आणि विश्वासार्हता लक्षणीयरित्या बळकट झाली असून त्यांनी ग्रामीण भागातील जीवनमानात अधिक सुलभता आणण्यात योगदान दिले आहे. ई ग्रामस्वराज सारख्या मंचांनी कोट्यवधी रुपयांचे वितरण पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने होणे शक्य केले आहे.हा सामंजस्य करार म्हणजे केवळ तांत्रिक एकत्रीकरण नसून लोकशाही समावेशकतेचे प्रतीक असून हा करार भारताला डिजिटली सक्षम, स्वावलंबी गावांच्या संकल्पनेच्या आणखी जवळ घेऊन जात आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

सुप्रसिद्ध भारतीय कलाकारांनी प्रस्तुत केलेले आणि समावेशकतेच्या भावनेने ओथंबणारे, भारताच्या भाषिक एकात्मतेचे शक्तिशाली प्रतीक असलेले भाषिणी गीत देखील या कार्यक्रमात सादर करण्यात आले.

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 
 

 


(Release ID: 2137857)
Read this release in: English , Urdu , Hindi