महिला आणि बालविकास मंत्रालय
केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी इंदोर येथील सेठी नगर अंगणवाडी केंद्राला दिली भेट
सरकारच्या गेल्या 11 वर्षांच्या कार्यकाळात राबवण्यात आलेल्या अंगणवाडी सेवा तसेच महिला बाल कल्याण योजनांचा परिवर्तनशील प्रभाव केला अधोरेखित
या दशकाने स्त्री शक्तीच्या नेतृत्वाखालील नव्या भारतासाठीचा पाया रचला आहे: केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर
प्रविष्टि तिथि:
17 JUN 2025 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जून 2025
केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी आज मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये सेठी नगर येथील अंगणवाडी केंद्राला भेट दिली. प्रसार आणि परिक्षण कार्यक्रमाचा भाग म्हणून या भेटीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्र्यांनी आंगणवाडी केंद्रांमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेतला तसेच महिला आणि बालकांसाठी राबवण्यात येणाऱ्या पोषण, आरोग्य तसेच शिक्षणविषयक उपक्रमांचा तळापर्यंतचा परिणाम जाणून घेण्यासाठी अंगणवाडी केंद्रात उपस्थित अंगणवाडी कर्मचारी, लाभार्थी आणि जनतेशी संवाद साधला.

अंगणवाडीसंबंधित पायाभूत सुविधांमधील कायापालट, पोषण ट्रॅकरसारख्या डिजिटल साधनांचा वापर आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यामुळे अंगणवाड्यांना अत्यावश्यक सेवा वितरणात कशा प्रकारे अधिक प्रतिसादक्षम आणि कार्यक्षम केले आहे हे देखील त्यांनी अधोरेखित केले.
अंगणवाडी केंद्रे म्हणजे केवळ पोषक आहाराची वितरण केंद्रे नव्हे तर पोषण 2.0 आराखड्याच्या अंतर्गत सक्षम अंगणवाडीच्या संकल्पनेला अनुसरून बाल्यावस्थेतील काळजी आणि विकास यांची चैतन्यमय, आधुनिक केंद्रे बनत आहेत हे सांगण्यावर केंद्रीय राज्यमंत्र्यांनी अधिक भर दिला.
अंगणवाडीसंबंधित पायाभूत सुविधा बळकट करणे, अंगणवाड्यांची सेवा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल याची खात्री करून घेणे आणि भारताला कुपोषण-मुक्त करणे याप्रती सरकारची कटिबद्धता ठाकूर यांनी अधोरेखित केली. अंगणवाडी केंद्रे सामाजिक न्यायासाठी अत्यंत महत्त्वाची असून ही केंद्रे आगामी पिढ्यांचे आरोग्य आणि विकासाला पाठबळ देतात याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

याप्रसंगी बोलताना, केंद्रीय राज्यमंत्री म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या 11 वर्षांत, भारताने महिला आणि लहान बालके सुरक्षित, निरोगी, सक्षम आणि स्वावलंबी होतील यांची सुनिश्चिती करून घेण्यासाठी अभूतपूर्व पावले उचलली आहेत. निर्धोक प्रसुतीच्या खात्रीपासून ते मुलींच्या शिक्षणाच्या सुनिश्चितीपर्यंत, आर्थिक सेवांच्या उपलब्धतेपासून कायदेशीर संरक्षण देण्यापर्यंत-अशा सर्व उपक्रमांतून या दशकाने स्त्री शक्तीच्या नेतृत्वाखालील नव्या भारतासाठीचा पाया रचला आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी महिला आणि लहान बालके यांचे उत्थान, सक्षमीकरण तसेच सुरक्षिततेसाठी बहुआयामी दृष्टीकोन स्वीकारलेल्या मोदी सरकारच्या गेल्या 11 वर्षांतील ऐतिहासिक कामगिरीवर देखील अधिक भर दिला. या दिशेने देशभरात यशस्वीपणे राबवण्यात आलेल्या योजनांची त्यांनी तपशीलवार माहिती दिली.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2137010)
आगंतुक पटल : 20