ग्रामीण विकास मंत्रालय
केंद्रीय मंत्री कमलेश पासवान यांच्या हस्ते चेन्नई इथे गरुड एअरोस्पेसच्या स्वदेशी कृषी ड्रोन प्रणालीचे आणि 300 सर्वोत्कृष्टता केंद्रांचे उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
14 JUN 2025 2:42PM by PIB Mumbai
केंद्रीय ग्राम विकास मंत्री कमलेश पासवान यांच्या हस्ते आज चेन्नई इथे गरुड एअरोस्पेसच्या स्वदेशी कृषी ड्रोन निर्मिती केंद्राचे उद्घाटन झाले. पासवान यांच्या हस्ते 300 सर्वोत्कृष्टता केंद्रांचेही उद्घाटन करण्यात आले. गरुड एअरोस्पेसच्या डीजीसीए मान्यताप्राप्त प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण (टीटीटी) उपक्रमाचा प्रारंभदेखील पासवान यांच्या हस्ते झाला. भारत ड्रोन संघटनेच्या (बीडीए) प्रमुख सदस्यांनी या महत्त्वाच्या उपक्रमासाठी सहाय्य केले आहे. उद्घाटनप्रसंगी प्रशिक्षित ड्रोन दीदींनी कृषी ड्रोनची उत्कृष्ट प्रात्यक्षिके सादर केली. वाढत्या ड्रोन क्षेत्रातील नवोन्मेष व आत्मनिर्भरतेप्रति गरुड एअरोस्पेसची वचनबद्धता या प्रात्यक्षिकांमधून दिसून आली.
ड्रोन तंत्रज्ञानात भारताला आत्मनिर्भर बनविण्यामधील गरुड एअरोस्पेस कंपनी व तिचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी अग्नीश्वर जयप्रकाश यांच्या योगदानाची कमलेश पासवान यांनी यावेळी प्रशंसा केली. ते म्हणाले की, भारताला ड्रोन तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. अग्नीश्वर यांच्यासारखे तरुण उद्योजक आणि गरुड एअरोस्पेससारख्या नवोन्मेषी कंपन्या यांच्या समर्पित प्रयत्नांनी हे स्वप्न सत्यात येईल. स्वदेशी कारखान्यात सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या स्थानिक उत्पादकांना एकाच छताखाली आणून, भारत ड्रोन संघटनेने येत्या दोन वर्षांत 1 लाखापेक्षा जास्त ड्रोन निर्मितीची क्षमता असलेली अनोखी सुविधा उभी केल्याबद्दल पासवान यांनी भारत ड्रोन संघटनेचीही प्रशंसा केली. मी कधीही एकाच ठिकाणी 2000 कृषी ड्रोनचे प्रात्यक्षिक पाहिले नाही असे त्यांनी नमूद केले. गरुड स्वदेशी ड्रोन उत्पादन केंद्रासारख्या ड्रोन क्षेत्राचे आणि त्यातील नवसंशोधनाचे नेतृत्व करण्याची भारताची क्षमता दर्शवणाऱ्या केंद्राला भेट देऊन अचंबित झाल्याचे ते म्हणाले.
गरुड एअरोस्पेस हे स्वदेशी कृषी ड्रोन निर्मितीतील अत्याधुनिक केंद्र अशा प्रकारचे देशातील पहिलेच केंद्र आहे. संकल्पना, निर्मिती व आधुनिक मानवरहित हवाई प्रणालीच्या काटेकोर तपासणीची सुविधा इथे आहे. गरुड एरोस्पेसच्या सध्या अस्तित्वात असलेल्या कारखान्याचा विस्तार असलेले नवे केंद्र भारतातील ड्रोन उत्पादन व कौशल्य विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. प्रशिक्षकांचे प्रशिक्षण हा गरुड एअरोस्पेसचा कौशल्य विकासाचा पथदर्शी प्रकल्प असून व्यावसायिक व शिक्षक यांना प्रमाणित ड्रोन प्रशिक्षक होण्यासाठीचे प्रशिक्षण याद्वारे दिले जाते. शैक्षणिक संस्था व उद्योजकांच्या सहकार्याने देशभरात सुरू करण्यात आलेल्या 300 सर्वोत्कृष्टता केंद्रांमुळे ड्रोनमधील नवोन्मेष, संशोधन आणि कौशल्य विकास यामध्येही प्रगती होईल.
***
S.Patil/S.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2136362)
आगंतुक पटल : 7