संरक्षण मंत्रालय
श्रीलंकेच्या लष्कराचे कमांडर, लेफ्टनंट जनरल बीकेजीएम लसांथा रॉड्रीगो यांचे भारतभेटीसाठी आगमन
Posted On:
11 JUN 2025 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2025
श्रीलंकेच्या लष्कराचे कमांडर, लेफ्टनंट जनरल बीकेजीएम लसांथा रॉड्रीगो 11 ते 14 जून 2025 या कालावधीसाठी भारतभेटीवर आले आहेत. द्विपक्षीय लष्करी सहकार्य वाढवण्यासाठी तसेच सहयोगाच्या, विशेषतः प्रशिक्षण आणि क्षमतेत सुधारणा करण्यासाठीच्या नव्या मार्गांचा शोध घेण्याच्या उद्देशाने ही भेट आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात दीर्घकाळापासून सुरु असलेली संरक्षण विषयक भागीदारी आणखी बळकट आणि दृढ करण्यासाठी दोन्ही देशांतर्फे सुरु असलेल्या प्रयत्नांना ही भेट अधोरेखित करते.
लसांथा यांच्या भारत भेटीचा पहिला दिवस, नवी दिल्लीतील राष्ट्रीय युध्द स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून सुरु झाला. देशाची सेवा करताना सर्वोच्च बलिदान दिलेल्या शूर सैनिकांना त्यांनी आदरांजली वाहिली.

यानंतर लेफ्टनंट जनरल बीकेजीएम लसांथा रॉड्रीगो यांना साऊथ ब्लॉक पटांगणावर औपचारिक मानवंदना देण्यात आली. भारतीय लष्करातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेला हा समारंभ दोन्ही देशांदरम्यान असलेल्या आदराचे आणि चिरस्थायी मैत्रीचे प्रतीक होता.
मानवंदनेनंतर, लेफ्टनंट जनरल बीकेजीएम लसांथा रॉड्रीगो यांच्या अनेक उच्चस्तरीय बैठका झाल्या, त्यापैकी पहिल्या बैठकीत भारतीय लष्कराचे उप प्रमुख लेफ्टनंट जनरल एनएस राजा यांनी लसांथा यांच्याशी व्यापक संवाद साधला.यावेळी दोन्ही लष्करी नेत्यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणि क्षेत्रीय संरक्षणविषयक समस्या यांच्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली.त्यानंतर ऑपरेशन सिंदूर आणि भारताचा सुरक्षाविषयक दृष्टीकोन याबाबत लेफ्टनंट जनरल बीकेजीएम लसांथा रॉड्रीगो यांना माहिती देण्यात आली. भारतीय लष्करातील इतर काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी परस्पर स्वारस्याच्या काही मुद्द्यांबाबत देखील त्यांना माहिती दिली.
लेफ्टनंट जनरल बीकेजीएम लसांथा रॉड्रीगो यांनी त्यानंतर नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के.त्रिपाठी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग तसेच संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांची भेट घेतली. या बैठकींनी उपस्थित अधिकाऱ्यांना परस्पर हिताच्या मुद्यांवर अधिक लक्ष केंद्रित करुन सीमा सुरक्षा आणि संरक्षण विषयक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध करून दिली.

दिनांक 12 जून 2025 रोजी लेफ्टनंट जनरल बीकेजीएम लसांथा रॉड्रीगो जयपूरला जातील आणि तेथे नैऋत्य कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन चीफ लेफ्टनंट जनरल मनजिंदर सिंग यांची भेट घेतील.
दिनांक 14 जून 2025 रोजी जनरल ऑफिसर डेहराडून येथील भारतीय लष्करी अकादमीच्या (आयएमए) पासिंग आउट परेडसाठी रिव्ह्यू ऑफिसर म्हणून उपस्थित राहतील.
लेफ्टनंट जनरल बीकेजीएम लसांथा रॉड्रीगो यांची ही भारतभेट विविध फलदायी कार्यक्रमांच्या माध्यमातून भारत आणि श्रीलंका यांच्यातील संरक्षणविषयक नाते आणखी दृढ करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही देशांतील लष्करी संबंध बळकट करण्याप्रती कटिबद्धता अधोरेखित करण्यासोबतच ही भेट क्षेत्रीय सुरक्षा आणि शांततेवर असलेले त्यांचे सामायिक लक्ष देखील अधोरेखित करते.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2135793)