इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वेकरिता अत्याधुनिक बहुभाषिक एआय साधने तयार करण्यासाठी भाषिणी आणि सीआरआयएस यांच्यात सामंजस्य करार

Posted On: 09 JUN 2025 8:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जून 2025

 

भारतीय रेल्वे सेवेत भाषिक समावेशन आणि एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता संचालित डिजिटल परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, डिजिटल इंडिया  भाषिणी विभाग (डीआयबीडी) आणि रेल्वे माहिती यंत्रणा केंद्र (सीआरआयएस) यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला.महत्त्वाच्या लोकाभिमुख रेल्वे मंचांवर  बहुभाषिक कृत्रिम बुद्धीमत्ता साधनांचा विकास आणि वापर सुरु करण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे.

भाषिणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग आणि सीआरआयएसचे व्यवस्थापकीय संचालक जी.व्ही.एल. सत्य कुमार यांनी नवी दिल्लीत  या करारावर औपचारिकरीत्या स्वाक्षऱ्या केल्या.

स्पीच रेकग्निशन (एएसआर), मजकूर-ते-मजकूर भाषांतर, मजकूर-ते-भाषा (टीटीएस) आणि ऑप्टीकल कॅरॅक्टर रेकग्निशन (ओसीआर) यांचा समावेश असलेल्या भाषिणीच्या अत्याधुनिक स्वयंचलित तंत्रज्ञान यंत्रणेचे राष्ट्रीय रेल्वे चौकशी यंत्रणा (एनटीईएस) आणि रेलमदद यांसारख्या सीआरआयएस तर्फे व्यवस्थापित यंत्रणांमध्ये एकत्रीकरण करण्याच्या उद्देशाने ही धोरणात्मक भागीदारी करण्यात आलेली आहे. यामुळे नागरिकांना महत्त्वाच्या रेल्वे सेवांविषयी एकूण 22 भारतीय भाषांमध्ये माहिती मिळवणे शक्य होईल.

याप्रसंगी बोलताना भाषिणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग म्हणाले, “या सहयोगामुळे रेल्वे सेवांविषयी दररोज लाखो प्रवाशांतर्फे होणाऱ्या संवादात परिवर्तन घडून येईल. या महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा मिळवण्यात प्रवाशांना भाषेचा कोणताही अडथळा येणार नाही याची भाषिणीच्या एआय क्षमतांच्या माध्यमातून आम्ही सुनिश्चिती करून घेत आहोत.”

ही भागीदारी बहुभाषिक प्रवासी पाठबळ पुरवणे, रेल्वे चौकशी संरचनेसाठी बहुभाषिक काउंटर्स विकसित करणे, क्लाऊड आणि स्थानक परिसरातील पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भाषिणीप्रेरित सेवांचे प्रमाण वाढवणे, संकेतस्थळे, मोबाईल अॅप्स, किऑस्क आणि कॉल सेंटर्स यांच्यामार्फत या क्षमतांचा वापर करणे आणि विविध भारतीय भाषांमध्ये वास्तविक वेळेत, बोलण्यावर आधारित संवाद शक्य करणे यांसाठी चॅट-बॉट तसेच आवाजी सहाय्यक विकसित करण्यावर देखील लक्ष केंद्रित करत आहे. यासाठी येत्या काही महिन्यांमध्ये संयुक्त तांत्रिक कार्यशाळांच्या आणि प्रायोगिक तत्वावरील वापराच्या मालिका घेण्यात येणार आहेत.

हा सामंजस्य करार म्हणजे डिजिटल भारत संकल्पनेअंतर्गत महत्त्वाचा टप्पा ठरणार असून तो सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी भाषाविषयक एआय वापराच्या क्षेत्रात भारताचे जागतिक स्तरावरचे आघाडीचे स्थान आणखी बळकट करेल.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2135244)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil