ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुणे येथील मेळाव्यात अर्थव्यवस्था आणि समावेशकतेला चालना देण्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या भूमिकेवर टाकला प्रकाश

प्रविष्टि तिथि: 03 JUN 2025 8:56PM by PIB Mumbai

मुंबई, 3 जून 2025

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज पुण्यातील बालेवाडी येथे 'प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय ग्रामीण) लाभार्थी मेळावा' आणि 'महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ' इथे आपला सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी संयुक्तपणे पीएमएवाय ग्रामीण योजनेच्या विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान केले.

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक नागरिकासाठी घर सुनिश्चित करण्याच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला आणि या योजनेअंतर्गत शाश्वत घरांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने सौर पॅनेल बसवण्यासाठी राज्य सरकार अतिरिक्त ₹50,000 इतका निधी देईल, अशी घोषणा केली.

उपस्थितांना संबोधित करताना शिवराज सिंह चौहान यांनी पीएमएवाय ग्रामीण योजनेच्या परिवर्तनीय क्षमतेवर भर देत सांगितले की, "प्रधानमंत्री आवास योजना ही केवळ घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याबद्दल नाही, तर ती भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा एक शक्तिशाली उत्प्रेरक आहे. घर बांधल्याने गवंडी, सुतार तसेच सिमेंट, लोखंड, नळ, पाणी जोडणी आणि वीज क्षेत्रातील कामगारांना उत्पन्न मिळते.”

चौहान यांनी पीएमएवाय (ग्रामीण) च्या पात्रता निकषांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणांची घोषणा केली, ज्याचा उद्देश समावेशकता वाढवणे असा आहे. त्यांनी अधोरेखित केले की दुचाकी वाहन बाळगणाऱ्या अर्जदारांना वगळण्याची पूर्वीची अट आता रद्द करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, ₹15,000 पर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या व्यक्ती आता या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. कोणताही पात्र लाभार्थी मागे राहणार नाही याची खात्री करण्यासाठी मंजूर केलेल्या नवीन सर्वेक्षणात या सुधारित निकषांचा समावेश करून ही योजना अधिकाधिक ग्रामीण कुटुंबांपर्यंत पोहोचवली जाईल.

केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ‘विकसित कृषी संकल्प अभियाना’त  सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. गावोगावी भेट देणाऱ्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी संवाद साधून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शिकण्याचे आणि आपापल्या समस्या आणि  गरजा त्यांच्यासमोर मांडण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. “कृषी संशोधन केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी शेती क्षेत्राला पुढे नेणे हा या संशोधकांचा उद्देश आहे,” असे ते म्हणाले.

यावेळी अमृत महाआवास अभियान पुरस्कार वितरण सोहळा झाला. त्यात महाराष्ट्रात पीएमएवाय (ग्रामीण) अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना गौरविण्यात आले. पुरस्कारप्राप्त विभाग, जिल्हे, तालुके, ग्रामपंचायती आणि इमारती पुढीलप्रमाणे आहेत.

अमृत महाआवास अभियान पुरस्कार – सर्वोत्तम विभाग (महाराष्ट्र राज्य):

  • 1ले स्थान: कोकण विभाग
  • 2रे स्थान: नाशिक विभाग
  • 3रे स्थान: नागपूर विभाग

अमृत महाआवास अभियान पुरस्कार – सर्वोत्तम जिल्हा (महाराष्ट्र राज्य):

  • 1ले स्थान: अहिल्यानगर
  • 2रे स्थान: सिंधुदुर्ग
  • 3रे स्थान: गोंदिया

अमृत महाआवास अभियान पुरस्कार – सर्वोत्तम तालुका (महाराष्ट्र राज्य):

  • 1ले स्थान: पाथर्डी, अहिल्यानगर
  • 2रे स्थान: देवगड, सिंधुदुर्ग
  • 3रे स्थान: जावळी, सातारा

अमृत महाआवास अभियान पुरस्कार – सर्वोत्तम ग्रामपंचायत (महाराष्ट्र राज्य):

  • 1ले स्थान: येळगाव, कराड, सातारा
  • 2रे स्थान: भुडकेवाडी, पाटण, सातारा
  • 3रे स्थान: चोंढी, मानोरा, वाशीम

अमृत महाआवास अभियान पुरस्कार – सर्वोत्तम बहुमजली इमारत (महाराष्ट्र राज्य):

  • 1ले स्थान: हनुमंत खेडे, धारंगाव, जळगाव
  • 2रे स्थान: भोसा (टाकळी), मोहाडी, भंडारा
  • 3रे स्थान: मोहगव्हाण, मानोरा, वाशीम

अमृत महाआवास अभियान पुरस्कार – सर्वोत्तम गृहसंकुल (Maharashtra State):  

  • 1ले स्थान: वांगदरी, श्रीगोंदा, अहिल्यानगर
  • 2रे स्थान: मानोरी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर
  • 3रे स्थान: लक्ष्मी दहिवडी, मंगळवेढा, सोलापूर

या कार्यक्रमाला  राज्याचे ग्रामविकास आणि  पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भारतातील आर्थिक विकास आणि शाश्वत प्रगतीला चालना देत ‘सर्वांसाठी निवारा’ ही केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका साकारण्यासाठी असलेली कटिबद्धता या कार्यक्रमाने अधोरेखित केली.

 

* * *

PIB Mumbai | S.Bedekar/Nandini/Reshma/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2133660) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu