खाण मंत्रालय
जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम संशोधन विकास आणि डिझाइन केंद्राने हैदराबादमध्ये नॉन-फेरस रिसायकलिंग भागधारकांसोबत विशेष संवादात्मक बैठक केली आयोजित
प्रविष्टि तिथि:
02 JUN 2025 4:11PM by PIB Mumbai
भारताच्या पुनर्वापर परिसंस्थेला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम संशोधन विकास आणि डिझाइन केंद्र (जेएनएआरडीडीसी) च्या पुनर्वापर प्रोत्साहन विभागाने हैदराबादमध्ये नॉन-फेरस पुनर्वापर भागधारक आणि व्यापाऱ्यांसोबत एक केंद्रित संवादात्मक बैठक आयोजित केली होती.
या कार्यशाळेचा उद्देश पुनर्वापरकर्ते, व्यापारी, सेवा प्रदाते यासारख्या नॉन-फेरस पुनर्वापर भागधारकांशी थेट संवाद साधून प्रत्यक्ष आव्हाने समजून घेणे तसेच पुनर्वापर क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण करण्यासाठी प्रत्यक्ष सहकार्य करणे असा होता. सत्राचे प्रमुख आकर्षण म्हणजे पुनर्वापर उद्योगाची परिवर्तनीय क्षमता, जी प्राथमिक धातू उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या उर्जेचा फक्त काही अंश वापरते. यामुळे हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यातील तसेच भारताच्या हवामान कृती उद्दिष्टांना पुढे नेण्यातील त्याची महत्त्वाची भूमिका अधोरेखित होते.
भारतातील धातू पुनर्वापरासाठी नोडल सरकारी एजन्सी म्हणून नियुक्त केलेली जेएनएआरडीडीसी, या क्षेत्रात सक्रियपणे नवोन्मेषाचा अवलंब करत आहे. त्यांच्या पुनर्वापर प्रोत्साहन विभागांतर्गत एक समर्पित पथक स्थापन करण्यात आले आहे, जे प्रगत आणि कार्यक्षम पुनर्वापर तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी एक अत्याधुनिक प्रात्यक्षिक संयंत्र स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहे.
सहभागींना संबोधित करताना जेएनएआरडीडीसीचे संचालक डॉ. अनुपम अग्निहोत्री यांनी अनौपचारिक, विखंडित कामकाजापासून औपचारिक, गुणवत्ता-जागरूक आणि तंत्रज्ञान-चालित उद्योगांकडील संक्रमणाचे महत्त्व अधोरेखित केले. "या क्षेत्रात जेएनएआरडीडीसी हा अंमलबजावणी करणारा म्हणून नव्हे, तर उद्योगांचा मित्र आणि भागीदार आहे," अशी पुष्टी त्यांनी केली आणि पुनर्वापरकर्त्यांना तांत्रिक सहाय्य आणि नियामक मार्गदर्शनापासून ते सामान्य सुविधा केंद्रे (सीएफसी) स्थापन करण्यात मदत करण्यासाठी व्यापक पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

हे संमेलन म्हणजे शाश्वत संसाधन वापरात भारताला जागतिक स्तरावर अग्रणी म्हणून स्थान देण्याच्या मंत्रालयाच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. अशा उपक्रमांद्वारे कार्बन तटस्थता, आत्मनिर्भर भारत आणि 5 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था यासारखी राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्व भागधारकांना महत्त्वपूर्ण भागधारक म्हणून सक्षम केले जात आहे.
या कार्यक्रमात तेलंगणा ॲल्युमिनियम युटेन्सिल्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (टीएयुएमए), ॲल्युमिनियम एक्सट्रूडर्स अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एएलईएमएआय) आणि मटेरियल रिसायकलिंग असोसिएशन ऑफ इंडिया (एमआरएआय) यासारख्या प्रमुख उद्योग संघटनांचा उत्साही सहभाग दिसून आला. जेएनएआरडीडीसीने ॲल्युमिनियम रिसायकलिंग तंत्रज्ञान आणि घरगुती गरजांसाठी तयार केलेल्या मिश्रधातू विकासातील अलीकडील संशोधनाचे प्रदर्शन केले.
एका ओपन हाऊस सत्रामुळे पुनर्वापरकर्त्यांना त्यांच्या तांत्रिक, प्रशासकीय आणि नियामक आव्हानांवर मोकळेपणाने चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले. भारतीय मानक ब्युरो (बी आय एस) च्या प्रतिनिधींनी उपस्थितांना या क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या संबंधित गुणवत्ता नियंत्रण आदेशांची (क्युसीओ) माहिती दिली.
केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सहयोगी दृष्टिकोन भारताच्या धातू पुनर्वापर उद्योगाची दीर्घकालीन लवचिकता, शाश्वतता आणि जागतिक स्पर्धात्मकता सुनिश्चित करेल अशी अपेक्षा आहे.
***
ShaileshP/NandiniM/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2133474)
आगंतुक पटल : 5