संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

युरोपियन युनियन नेव्हल फोर्सच्या (EUNAVFOR) जहाजांचा भारतातील पहिला दौरा


स्पॅनिश नौदल आणि इटालियन नौदलाची EUNAVFOR अंतर्गत कार्यरत जहाजे मुंबईत  सैद्धांतिक सरावात (टेबल टॉप ) सहभागी

भारतीय नौदल आणि इयूएनएव्हीएफओआर यांच्यात सागरी संयुक्त सरावही नियोजित

Posted On: 01 JUN 2025 6:08PM by PIB Mumbai

 

कमांडर साल्व्हाडोर मारेनो रेगील यांच्याकडे धुरा असलेले स्पॅनिश नौदलाचे इएसपीएस रिना सोफिया हे जहाज आणि कमांडर आल्बर्टो बार्टोलोमीओ यांच्याकडे धुरा असलेले इटालियन नौदलाचे आयटीएस अंतोनियो मार्सेग्लीया, ही दोन जहाजे 26 मे ते 01 जून  2025 दरम्यान मुंबईत कार्यात्मक विश्रांती आणि तयारीसाठी आली आहेत. ही दोन्ही जहाजे सध्या युरोपियन युनियन नेव्हल फोर्स EUNAVFOR अंतर्गत कार्यरत आहेत. ` EUNAVFOR` अंतर्गत भारतात या जहाजांचे झालेले आगमन ही पहिलीच अधिकृत भेट असल्याने याला विशेष महत्त्व आहे. ही भेट भारताचे  पंतप्रधान  नरेंद्र मोदी आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डेर लेयेन यांच्यात झालेल्या चर्चेचा पुढील टप्पा आहे. या उपक्रमाद्वारे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी दोन्ही नेत्यांची सामूहिक बांधिलकी अधोरेखित झाली होती. ऑपरेशन अटलांटा मोहिमेचे सैन्यप्रमुख रिअर अॅडमिरल डेव्हीड डा पोझ्झो यांच्या नेतृत्वाखालील ` EUNAVFOR ` शिष्टमंडळाने भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडमधील रिअर अॅडमिरल विद्याधऱ हर्के, व्हीएसएम, चीफ स्टाफ ऑफिसर(ऑपरेशन) यांची मुख्यालयात भेट घेऊन दोन्ही बाजूंमधील सागरी सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा केली. दोन्ही पक्षांनी लष्करी क्षेत्रात विस्तृत सहकार्याची गरज यावेळी मान्य केली आणि ही बैठक भारतीय नौदल व ` EUNAVFOR `  यांच्यातील सहकार्याच्या नव्या संधींसाठी एक महत्त्वपूर्ण पायरी ठरली.

जहाजांच्या मुंबईत असलेल्या काळात, विषय तज्ज्ञांमधील अनुभवाची देवाण घेवाण (एसएमइइएस) आणि टेबल टॉप एक्सरसाईझ (टीटीएक्स) अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. समुद्रावरील तांत्रिक पातळीवरील सहकार्य सुधारण्याच्या उद्देशाने हा उपक्रम झाला. दोन्ही बाजूंनी चाचेगिरी विरोधी आणि तस्करी विरोधी मोहिमांदरम्यान मिळालेल्या अनुभवांची देवाण घेवाण यावेळी केली आणि या संवादाचा मोठा लाभ घेतला. हे सर्व बंदरातील उपक्रम हे संयुक्त सागरी सरावाच्या तयारीचा पाया ठरले असून ही जहाजे 01 जून  2025 रोजी मुंबईहून निघाल्यानंतर त्याचा लाभ होणार आहे.

समुद्रातील या संयुक्त सरावात ` EUNAVFOR ` कडून इएसपीएस रिना सोफिया आणि आयटीएस अंतोनियो मार्सेग्लीया या जहाजांचा सहभाग असेल, भारतीय नौदलाची जहाजे व विमानेदेखील यात सहभागी होतील. या गुंतागुंतीच्या तांत्रिक सरावाचा उद्देश दोन्ही पक्षांमधील ताळमेळ वाढवणे आणि भारतीय महासागर क्षेत्रात अपारंपरिक धोक्यांचा सामना करताना एकत्रित आंतरपरिचालन क्षमतेत वाढ करणे हा आहे.

***

S.Patil/N.Gaikwad/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2133206)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil