विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) अन्न व पोषणविषयक विशेष प्रयोग करणार - केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची घोषणा
Posted On:
31 MAY 2025 5:47PM by PIB Mumbai
भारताचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आगामी `अॅक्सिअम मिशन 4` (एएक्स-4) अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) अन्न आणि पोषणविषयक विशेष प्रयोग करतील, अशी माहिती, अंतराळ विभागाचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
हे प्रयोग भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) आणि जैवतंत्रज्ञान विभाग (डीबीटी) यांच्या संयुक्त सहकार्याने राबवण्यात येत आहेत. नासाच्या (एनएएसए) पाठबळासह हे प्रयोग विकसित करण्यात आले असून, अंतराळातील पोषणशास्त्र आणि दीर्घकालीन मानवी मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या स्वयंपूर्ण जीवन समर्थन प्रणालींच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की `अॅक्सिअम-4` मोहिमेत ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे `मिशन पायलट` म्हणून काम पाहतील. त्यांच्या सोबत `मिशन कमांडर` म्हणून पेगी व्हिटसन (यूएसए, एनएएसएचे माजी अंतराळवीर), तसेच `मिशन स्पेशालिस्ट` म्हणून स्लावोश उज्नान्स्की-विश्न्येफ्स्की (पोलंण्ड/इएसए) आणि टिबोर कापू (हंगेरी/इएसए) सहभागी असतील.
ग्रुप कॅप्टन शुक्ला हे मानवी अंतराळ मोहिमेसाठी प्रशिक्षित झालेल्या भारतीय अंतराळवीरांच्या पहिल्या पथकातले सदस्य असून, ग्रुप कॅप्टन प्रसांत बालकृष्णन नायर हे त्यांच्यासाठी राखीव पर्यायी अंतराळवीर आहेत. `अॅक्स-4` मोहिमेचे व्यवस्थापन अॅक्सिअम स्पेसकडे असून, स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण होणार आहे. ही मोहिम `आयएसएस`वरील भारताच्या पहिल्या वैज्ञानिक-अंतराळवीराच्या नेतृत्वाखालील जीवशास्त्रीय प्रयोगांची ऐतिहासिक सुरुवात ठरेल.
या उपक्रमांद्वारे भारत केवळ अंतराळात पोहोचत नाही, तर तिथे मानवी जीवन कसे टिकवायचे, मानवाने कसे सेवन करायचे आणि कसे जगायचे याचे भविष्य घडवत आहे. या प्रयोगांच्या यशामुळे अंतराळातील मानवी पोषणात क्रांती येऊ शकते आणि बंद वातावरणातील जैव-पुनर्वापर प्रणाली शक्य होऊ शकते.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले की ही मोहिम भारताचा जागतिक अंतराळ क्षेत्रातील वाढता प्रभाव अधोरेखित करते, तसेच प्रक्षेपण सेवा पुरवठादार या भूमिकेतून अंतराळ संशोधन, शाश्वतता आणि वैज्ञानिक नेतृत्व याकडे होणारी वाटचाल दर्शवते.
***
M.Pange/N.Gaikwad/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2133071)