सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी वॅम्निकॉम आणि सीआयसीटीएबी या संस्थांनी 'नवोन्मेष आणि कृषीव्यवसाय व्यवस्थापन' प्रशिक्षण कार्यक्रमाचा केला प्रारंभ

Posted On: 27 MAY 2025 7:29PM by PIB Mumbai

पुणे, 27 मे 2025

ग्रामीण विकास व उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि कृषीआधारित व्यवसायात आत्मनिर्भरता आणण्यासाठी पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेने कृषी बँकिंगमधील आंतरराष्ट्रीय सहकार व प्रशिक्षण केंद्राच्या सहकार्याने 'नवोन्मेष व कृषी व्यवसाय व्यवस्थापन' हा दोन महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.

लष्कर,नौदल आणि हवाई दलातील 40 अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर कृषी व्यवसाय क्षेत्रातील संधींसाठी तयार करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाची विशेष आखणी करण्यात आली आहे. लष्कराचे 25, नौदलाचे 7 आणि हवाई दलाचे 8 अधिकारी या प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत.

26 मे 2025 ते 18 जुलै 2025 या कालावधीत होणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन वॅम्निकॉमचे निबंधक डॉ. शंतनू घोष आणि वॅम्निकॉमचे सहायक प्राध्यापक डॉ. अमित बोरकर व डॉ. धनंजय गायकवाड यांच्या उपस्थितीत झाले. उद्घाटनाच्या सत्राला माजी सैनिक कल्याण विभागाचे (दक्षिण) संयुक्त संचालक कमांडर राहील राय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांचे या सत्रात विशेष व्याख्यान झाले.  

डॉ. शंतनू घोष यांनी कमांडर राहील राय यांचे स्वागत करुन उद्घाटनाला उपस्थित राहिल्याबद्दल आणि त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार व्यक्त केले. त्यानंतर डॉ. धनंजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी प्रशिक्षणातील अभ्यासक्रम, उद्दीष्टे आणि अपेक्षित परिणाम याविषयीची माहिती दिली. डॉ. घोष आपल्या भाषणात म्हणाले की, कृषी आधारित व्यवसायांसाठी लष्करी अधिकाऱ्यांमधील नवोन्मेषाला व उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी बारकाईने या अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेतील आत्मनिर्भर भागधारक होण्यासाठीचे ज्ञान आणि प्रशिक्षण लष्करी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे आहेत असे त्यांनी अधोरेखित केले.  

आपल्या प्रमुख भाषणात कमांडर राहील राय यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली.  निवृत्त होणाऱ्या लष्करी कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षणातून करिअरचे नवे मार्ग मिळण्यासोबतच कृषी व्यवसायांद्वारे देशाच्या विकासातही योगदान देता येईल.

या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रात्यक्षिक कार्यशाळा, नमुना अभ्यास, शिवार  भेटी आणि उद्योग व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत संवादात्मक सत्रांचा व्यापक समावेश असेल.  


S.Kane/S.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2131743) अभ्यागत कक्ष : 15
Read this releasein: English