नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘इरेडा’ला डीपीईकडून 'उत्कृष्ट' दर्जा; देशातील चार सर्वोत्कृष्ट सीपीएसईंमध्ये लागली वर्णी, वीज व एनबीएफसी क्षेत्रात पहिला क्रमांक

Posted On: 21 MAY 2025 3:57PM by PIB Mumbai

 

इरेडा अर्थात ‘इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड’ या देशातील सर्वात मोठ्या हरित वित्तपुरवठा करणाऱ्या ‘एनबीएफसी’ला डीपीई अर्थात सार्वजनिक उद्यम विभागाकडून 2023-24 या आर्थिक वर्षासाठी कंपनीने केलेल्या वार्षिक सामंजस्य करार कामगिरीच्या आधारे 'उत्कृष्ट' दर्जा प्राप्त झाला आहे. तसेच इरेडाने वीज व एनबीएफसी (नॉन-बँकिंग फायनान्शिअल कंपनी) क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट सीपीएसई (सेंट्रल पब्लिक सेक्टर एन्टरप्राईझ) म्हणून स्थान निर्माण केले आहे.
डीपीईने जाहीर केलेल्या 2023-24 या आर्थिक वर्षातील अहवालात एकूण 84 सीपीएसईंचा समावेश आहे. यामध्ये इरेडाला 98 किंवा त्याहून अधिक गुण मिळाले असून देशातील चार सर्वोत्कृष्ट सीपीएसईंमध्ये तिचा क्रमांक आला आहे. इरेडाला 7 जानेवारी 2025 रोजी सलग चौथ्या वर्षी 'उत्कृष्ट' सामंजस्य करार मानांकन प्राप्त झाले.
या उल्लेखनीय यशाबद्दल इरेडाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास म्हणाले, “एनबीएफसी आणि वीज क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी करणारी सीपीएसई म्हणून इरेडाची ओळख निर्माण झाली याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. तसेच, देशातील पहिल्या चार सीपीएसईमध्ये समावेश हा आमच्या संघाच्या सामूहिक समर्पणाचे आणि भारतातील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राला गती देण्याच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे. ही मानांकने हरित वित्तपुरवठा क्षेत्रात इरेडाच्या नेतृत्वाला आणि शाश्वत ऊर्जा उपायांद्वारे राष्ट्रनिर्माणात योगदान देण्याच्या आमच्या बांधिलकीला अधोरेखित करतात."
दास यांनी इरेडाच्या चमूचे चमकदार कामगिरीबद्दल अभिनंदन केले आणि नूतन व नवीकरणीय ऊर्जा, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी, वीज व नूतन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, नूतन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोषकुमार सारंगी, तसेच खाते व मंडळातील वरिष्ठ अधिकारी आणि संचालक मंडळाचे आभार मानले, त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

***


S.Patil/R.Bedekar/P.Kor


(Release ID: 2130385)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil