सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने मधूर क्रांती उत्सवाअंतर्गत जागतिक मधमाशी दिन 2025 चा सोहळा साजरा
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मध अभियानांतर्गत 20,000 मेट्रिक टनहून अधिक मधाचे उत्पादन; मधमाशी पालकांना मिळाले 325 कोटी रुपयांचे उत्पन्न
मध अभियानाअंतर्गत देशभरात 2 लाखांपेक्षा जास्त मधमाशा पेट्या आणि मधमाशा पोळ्यांच्या पेट्यांचे वाटप
मधूर क्रांतीमुळे मधमाशी पालक आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडून आला : खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार
Posted On:
20 MAY 2025 9:12PM by PIB Mumbai
मुंबई, 20 मे 2025
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारितील खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने (KVIC) आज आयोगाच्या मुंबईतील विलेपार्ले इथल्या मध्यवर्ती कार्यालयात मधूर क्रांती उत्सव अर्थात स्वीट रिव्होल्यूशन उत्सवाअंतर्गत आज जागतिक मधमाशी दिन 2025 चा भव्य सोहळा साजरा केला गेला. Bee inspired by nature to nourish us all ही यंदाच्या मधमाशी दिन सोहळ्याची संकल्पना होती. महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्वेत क्रांतीला मधुर क्रांतीमध्ये परावर्तीत करण्याचा दृष्टिकोन मांडला होता. त्याला अनुसरुनच यंदाच्या मधमाशी दिनाची संकल्पना आखली गेली होती.

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांच्या हस्ते या भव्य सोहळ्याचे उद्घाटन झाले. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूप राशी यादेखील यावेळी उपस्थित होत्या. या सोहळ्यात आयोगाचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील लाभार्थी मधमाशी पालक, प्रशिक्षणार्थी, शास्त्रज्ञ, यशस्वी मधमाशी उद्योग व्यावसायिक, विद्यार्थी आणि विषय तज्ज्ञ मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. या विविधांगी सहभागामुळे या सोहळ्याला भारताच्या ग्रामीण भागातील नवोन्मेष, प्रेरणादायी उदाहरणे आणि आत्मनिर्भरतेच्या अनुषंगाने एक तांत्रिक व्यासपीठ आणि बहुआयामी प्रदर्शनाचे स्वरुप प्राप्त झाले होते.
यावेळी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या उद्घाटन भाषणातून त्यांनी मधमाशांचे पर्यावरणीय आणि आर्थिक महत्त्व ठळकपणे अधोरेखित केले. मधमाशा या पर्यावरणीय परिसंस्थेचा कणा आहेत. त्या केवळ मध तयार करत नाहीत, तर त्या परागीकरणाच्या माध्यमातून शेतीलाही समृद्ध करत असतात आणि याद्वारे पर्यावरण संवर्धनातही महत्वाचे योगदान देत असतात ही बाब त्यांनी नमूद केली
LUKY.jpeg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, मध अभियान ग्रामीण भारतातील उपजीविकेचे एक प्रमुख साधन बनले आहे असे ते म्हणाले. केव्हीआयसीच्या अध्यक्षांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या 'मधुर क्रांती'च्या आवाहनाने एक नवीन मार्ग प्रशस्त केला जिथे मध उत्पादन हे आर्थिक आणि आरोग्य विषयक समृद्धीचे स्रोत बनले. केव्हीआयसीचे या दिशेने काम हे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
मध अभियानांतर्गत झालेली उल्लेखनीय कामगिरी केव्हीआयसी अध्यक्षांनी अधोरेखित केली. आजपर्यंत, केव्हीआयसीने देशभरात 2,29,409 हून अधिक मधमाशी पेट्या आणि मधमाशी वसाहतींचे वितरण केले आहे, ज्यामुळे अंदाजे 20,000 मेट्रिक टन मधाचे उत्पादन झाले आहे आणि ज्यातून मधमाशीपालकांना 325 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मनोज कुमार यांनी नमूद केले की आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये केव्हीआयसीशी संलग्न मधमाशीपालकांनी 25 कोटी रुपयांचा मध निर्यात केला.

केव्हीआयसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूप राशी म्हणाल्या, “मध अभियान ही केवळ एक योजना नाही; तर ती एक समग्र उपजीविकेचे मॉडेल आहे. आज, या अभियानाद्वारे ग्रामीण भागातील हजारो तरुण, महिला आणि शेतकरी रोजगार मिळवत आहेत. केव्हीआयसीने विकसित केलेले मध प्रक्रिया प्रकल्प, प्रशिक्षण केंद्रे आणि विपणन नेटवर्कमुळे मधमाशी पालन हा आत्मनिर्भरतेचा एक व्यवहार्य मार्ग बनला आहे.”

1962 मध्ये पुणे इथे स्थापन झालेल्या केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (सीबीआरटीआय) ऐतिहासिक योगदानाचा या कार्यक्रमात विशेष उल्लेख करण्यात आला. या संस्थेने 50,000 हून अधिक मधमाशीपालकांना आधुनिक मधमाशीपालन तंत्रांमध्ये प्रशिक्षण दिले आहे. सीबीआरटीआयची भूमिका मध उत्पादनापलीकडे जाऊन परागीकरणाद्वारे कृषी आणि बागायती उत्पादकता वाढवणे, मधमाशी-संबंधित संशोधनाला चालना देणे आणि ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यापर्यंत विस्तारली आहे.
***
S.Kakade/T.Pawar/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2130095)