विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबईत आयोजित स्टार्टअप कॉन्क्लेव्हमध्ये केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी सागरी क्षेत्र विषयक स्टार्टअप्स क्षेत्रात दडलेल्या अगणित शक्यता केल्या अधोरेखित


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून डीप सी मिशन या अभियानाची घोषणा केली, आणि त्यानंतरच देशाने या क्षेत्राकडे गांभीर्याने आणि धोरणात्मक हेतूने लक्ष द्यायला सुरुवात केली : केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

देशभरातील प्रतिभांना समोर आणणे हाच स्टार्टअप कॉन्क्लेव्हचा उद्देश : देशातली 49% स्टार्टअप ही टियर 2 आणि टियर 3 शहरांमधली : केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

केवळ विज्ञान क्षेत्रांतील पदव्यांमुळे नाही, तर नैसर्गिक क्षमता आणि तीव्र इच्छाशक्ती असेल तरच स्टार्टअप्समधील यश मिळते : डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 20 MAY 2025 7:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मे 2025

सागरी किनाऱ्यालगतच्या राज्यांमध्ये सागरी क्षेत्राशी संबंधित स्टार्टअप्सना (Marine Startups) प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान आणि भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), तसेच पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक विभाग, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) वतीने मुंबईत आयोजित स्टार्टअप कॉन्क्लेव्ह 2025 या परिषदेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते. भारताच्या विस्तारत असलेल्या अर्थव्यवस्थेतील मूल्यवर्धनात योगदान देण्याच्या दृष्टीने  सागरी क्षेत्राशी संबंधित स्टार्टअप्स हे तुलनेने एक दुर्लक्षित पण प्रचंड क्षमता असलेले क्षेत्र असल्याची बाबही त्यांनी नमूद केली.

भारताची प्रत्यक्ष विकसित भारताच्या दिशेने होत असलेली वाटचाल ही प्रामुख्यानं आजवर दुर्लक्षित राहिलेल्या क्षेत्रांना चालना देण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल असे ते म्हणाले. भारताला अनेक प्रमुख राज्यांनी व्यापलेला 7,500 किमी पेक्षा जास्त लांबीचा मोठा किनारा लाभला आहे, आणि त्यात विशेष करून धोरणात्मक किनारी प्रदेशालगत वसलेले मुंबई शहर हे सागरी अर्थव्यवस्थेची प्रचंड क्षमता अधोरेखित करण्यासाठी आदर्श ठिकाण असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून डीप सी मिशन या अभियानाची घोषणा केली, आणि त्यानंतरच देशाने या क्षेत्राकडे गांभीर्याने आणि धोरणात्मक हेतूने लक्ष द्यायला सुरुवात केली असे ते म्हणाले. यावेळी डॉ. जितेंद्र सिंह यांनी या स्टार्टअप कॉन्क्लेव्हच्या आयोजनामागच्या व्यापक दृष्टीकोनाबद्दलही यांनी उपस्थितांना सांगितले. देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभावान व्यक्ती आणि उद्योजकीय कल्पनांशी जोडून घेणे हा या परिषदेचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. आजच्या घडीला देशभरातील 49% स्टार्टअप्स  टियर 2 आणि 'टियर 3 स्तरातल्या छोट्या  शहरांमधले आहेत, आणि या क्षेत्राच्या दृष्टीने ही उत्साह वाढवणारी बाब आहे असे ते म्हणाले.

यशस्वीपणे स्टार्टअप सुरू करण्यासाठी विज्ञान शाखेची पदवी असणे गरजेचे आहे हा गैरसमजही डॉ. जितेंद्र सिंह यांनी आपल्या संबोधनातून दूर केला. त्याउलट नैसर्गिक क्षमता (Aptitude) आणि आवड (Passion) हेच खऱ्या अर्थाने महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या संबोधनात डॉ. जितेंद्र सिंह यांनी धोरणात्मक उद्दिष्टे आणि राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांविषयीच्या मुद्यांचाही उल्लेख केला.  यावेळी डॉ. जितेंद्र सिंह यांनी टुवर्ड्स विकसित भारत — सीएसआयआर टेक्नॉलॉजीज एम्पॉवरिंग द नेशन" (Towards Viksit Bharat — CSIR Technologies Empowering the Nation) या शिर्षकाअंतर्गतचे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या संकलानेचेही प्रकाशन केले.  याअंतर्गत विविध उद्योग क्षेत्राला हस्तांतरित केल्या गेलेल्या 400 पेक्षा जास्त तंत्रज्ञानांचे  आणि अलिकडच्या वर्षांत विकसित केलेल्या 125 पेक्षा जास्त  स्टार्टअप्स विषयीची माहितीचे संकलन मांडले आहे. या संकलनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने विज्ञान, स्टार्टअप्स आणि सामाजिक विकास क्षेत्रात समांतरपणे साध्य केलेल्या वैज्ञानिक प्रगतीचे प्रतिबिंब दिसते असे ते म्हणाले.

यावेळी डॉ. जितेंद्र सिंह जागतिक नवोन्मेषाच्या क्षेत्रात भारताने कशारितीने वेगाने प्रगती केली आहे याबद्दलही उपस्थितांना सांगितले. केवळ गेल्या नऊ वर्षांत भारत जागतिक नवोन्मेष निर्देशांकात 81 व्या स्थानावरून 40 व्या स्थानावर पोहोचला आहे,  2014 मध्ये देशात केवळ 350 स्टार्टअप्स होते मात्र आता भारतात 1.25 लाखांपेक्षा जास्त मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आणि 110 पेक्षा जास्त युनिकॉर्न्स आहेत ही बाब त्यांनी अधोरेखित केली. सक्रियपणे केलेल्या धोरणात्मक सुधारणा, व्यवसाय सुलभता आणि सातत्याने विस्तारत असलेल्या वैज्ञानिक सहकार्यामुळेच हे शक्य झाल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

विद्यमान सरकारने कालबाह्य  नियम रद्द केले , अंतराळ आणि अणुऊर्जा क्षेत्रे खाजगी सहभागासाठी खुली केली तसेच समावेशक, आकांक्षी आणि प्रभावी स्टार्टअप परिसंस्था निर्माण केली यावर  केंद्रीय मंत्र्यांनी  भर दिला. अभिनव तंत्रज्ञान आधारित  उपक्रम, संशोधनाचा व्यवहार्य वापर आणि शाश्वत तंत्रज्ञानाला चालना देण्यात  महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे श्रेय त्यांनी देशभरातील सीएसआयआर प्रयोगशाळांना दिले.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी मुंबईत सीएसआयआर इनोव्हेशन कॉम्प्लेक्समध्ये अलिकडेच विकसित केलेल्या अत्याधुनिक सुविधेचाही उल्लेख केला ,  जी स्टार्ट-अप्स, एमएसएमई आणि उद्योग क्षेत्रातील हितधारकांना इनक्युबेशन आणि व्यवसायासाठी जागा प्रदान करण्याच्या दृष्टीने तयार  केली आहे. ही सुविधा उच्च दर्जाच्या वैज्ञानिक पायाभूत सुविधा, नियामक सहाय्य  आणि तज्ज्ञांच्या  सहकार्याच्या संधी प्रदान करते आणि संशोधन आणि वास्तविक-जगातील अनुप्रयोगांमधील तफावत प्रभावीपणे भरून काढते. त्यांनी शार्क टँक सारख्या गुंतवणूक मंचांचे  विज्ञान कार्यक्रमांमध्ये एकीकरण  करण्याकडे लक्ष वेधतानाच युवा नवोन्मेषकांना संभाव्य गुंतवणूकदारांशी जोडण्यात आणि लॅब-टू-मार्केट संक्रमणांना गती देण्यामधील त्यांची भूमिका अधोरेखित केली. समावेशक विकासाप्रति  मंत्रालयाच्या वचनबद्धतेला दुजोरा देत  डॉ. जितेंद्र सिंह यांनी NIDHI, TIDE आणि टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्यूबेटर्स (TBIs) सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रदान केलेल्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केला, ज्यात एक मजबूत स्टार्ट-अप परिसंस्था विकसित करण्यासाठी मार्गदर्शन आणि पायाभूत सुविधांना आर्थिक सहाय्यची जोड देण्यात आली आहे.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत एका प्रदर्शनाचे उद्घाटन केले.  या प्रदर्शनात हरित हायड्रोजन आणि स्वच्छ ऊर्जा तसेच किफायतशीर आरोग्यसेवा आणि एआय-संचालित उपाय अशा विविध क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व नवोन्मेषी उपक्रम  सादर केले आहेत. स्टार्ट-अप संस्थापक आणि संशोधकांशी संवाद साधताना, या नेत्यांनी  वैज्ञानिक प्रगतीला राष्ट्रीय प्राधान्यांशी संरेखित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले की स्टार्ट-अप चळवळ आता केवळ महानगरांपुरती मर्यादित राहिलेली नाही. "द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील  शहरांमधील युवा नवोन्मेषक, ज्यात महिला आणि कमी प्रतिनिधित्व असलेल्या समुदायांचा समावेश आहे, ते आता भारताच्या तंत्रज्ञान परिवर्तनात आघाडीवर आहेत. आत्मनिर्भर भारताचा हाच खरा आत्मा  आहे," असे ते म्हणाले.

उद्या ही परिषद सुरू राहणार असून या परिषदेच्या निमित्ताने 100 हून अधिक सीएसआयआर वैज्ञानिक , संशोधक आणि तंत्रज्ञान विकासक तसेच  उद्योजक, गुंतवणूकदार, उद्योग धुरिण  आणि धोरणकर्ते एकत्र आले आहेत. या कार्यक्रमाचा उद्देश सहकार्याला चालना देणे आणि सीएसआयआर तंत्रज्ञानाचे जलद गतीने व्यापारीकरण करणे हा आहे.

उद्घाटनाच्या दिवशी अनेक प्रमुख मान्यवर देखील सहभागी झाले होते ज्यांनी परिषदेचा दृष्टिकोन निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सीएसआयआर-एनआयओचे संचालक प्रा. सुनील कुमार सिंह  यांनी स्वागतपर  भाषण केले, त्यानंतर सीएसआयआर-एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले आणि सीएसआयआर-नीरीचे संचालक डॉ. एस. वेंकट मोहन यांची  भाषणे झाली.

विशेष म्हणजे, औपचारिक उद्घाटनापूर्वी, शार्क टँक-शैलीतील सत्रात स्टार्ट-अप्सना त्यांचे विचार गुंतवणूकदारांसमोर मांडण्याची संधी मिळाली.विज्ञान आणि उद्योजकतेमधील दरी भरून काढण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

2047 मध्ये  स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे भारत वाटचाल करत असताना,खऱ्या अर्थाने विकसित आणि आत्मनिर्भर  राष्ट्र घडवण्यात विज्ञान आणि  नवोन्मेषाची  भूमिका उत्प्रेरित करण्यासाठी सीएसआयआर स्टार्ट-अप परिषद एक योग्य  व्यासपीठ आहे.


S.Tupe/S.Kakade/T.Pawar/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2130048)
Read this release in: Tamil , English , Hindi