कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विविध योजना तसेच उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी केंद्राचा महाराष्ट्राला संपूर्ण पाठींबा – केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे प्रतिपादन


हवामानाला अनुकूल असणारी पिकांची वाणे विकसित करा - केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सूचना

कृषीसंबंधित योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अभियानाला गती देण्याच्या सूचना

महाराष्ट्रात राबवण्यात येत असलेल्या कृषी तसेच ग्रामीण विकास योजनांची आढावा बैठक संपन्न

Posted On: 18 MAY 2025 10:08PM by PIB Mumbai

नागपूर/मुंबई,18 मे 2025

 

शेतकऱ्यांना तग धरुन राहता यावे यासाठी सुधारित बियाणे, सेंद्रिय खते, हवामानाला अनुकूल अशा पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान, स्मार्ट सिंचन पद्धती तसेच बाजारपेठेशी जोडणारे दुवे या घटकांमध्ये सुयोग्य समन्वय राखण्याची गरज आहे असे प्रतिपादन केंद्रीय कृषी,शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे. महाराष्ट्रात राबवण्यात येत असलेल्या कृषी तसेच ग्रामविकास योजनांचा आढावा घेण्यासाठी नागपूर येथे आयोजित  बैठकीत ते आज बोलत होते. नागपूर येथील अमरावती मार्गावर स्थित राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण तसेच भूमी वापर नियोजन मंडळाच्या (एनबीएसएस आणि एलयुपी) सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते.

देशाच्या विविध भागांमधील हवामानाच्या स्थितीला अनुकूल ठरतील अशी पिकांची वाणे विकसित करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री चौहान यांनी कृषी विभाग अधिकाऱ्यांना दिले. देशातील प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आयडी म्हणजेचे विशिष्ट कृषक ओळखपत्र मिळवून देण्यासाठी विशेष व्यवस्था करावी आणि ज्यांच्याकडे असे ओळखपत्र नाही त्या शेतकऱ्यांना कृषी योजनांचे लाभ दिले जाणार नाहीत याची सुनिश्चिती करून घ्यावी अशा सूचना देखील त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

येत्या काळात, विविध योजना तसेच उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून संपूर्ण पाठींबा मिळेल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री चौहान यांनी यावेळी बोलताना दिली. कापसाच्या अधिकाधिक जाती विकसित करण्याच्या गरजेवर, विशेषतः महाराष्ट्रात हवामान बदल आणि पावसाचे कल यांना अनुकूल ठरणाऱ्या जाती विकसित करण्याच्या गरजेवर त्यांनी अधिक भर दिला. कमी पर्जन्यमान असलेल्या भागांमध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करण्याची देखील गरज आहे असे ते म्हणाले. महाराष्ट्रासाठी ‘सर्वोत्कृष्ट शेती पद्धती’ विकसित करण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीदरम्यान संबंधितांना दिले.

महाराष्ट्र राज्य सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल,कृषी विभागाचे मुख्य सचिव विकास रस्तोगी, ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारचे विविध ज्येष्ठ अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.

कृषी विभागाचे मुख्य सचिव विकास रस्तोगी यांनी महाराष्ट्रातील हवामान, पर्जन्यमान, कृषी विषयक आव्हाने, 2025 चा खरीप हंगाम, खते तसेच बी-बियाण्यांची उपलब्धता, विकसित कृषी संकल्प अभियान, ॲग्रीस्टॅक अभियान आणि कृषी क्षेत्रासाठी पुढील वर्षाचे नियोजन यावर आधारित सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थितांना माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा

महाराष्ट्र राज्य सरकारने कृषी आणि ग्रामविकास विभागांच्या अखत्यारीत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल सदर बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री चौहान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा केली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (ग्रामीण) सुरु असलेले उपक्रम तसेच सँडबँक प्रकल्प यांच्या अंमलबजावणीबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष कौतुक केले.

महाराष्ट्रातील ‘यशोगाथा’ देशभर पोहोचवा

बैठकीतील सादरीकरणादरम्यान राज्याच्या विविध भागात शेतक-यांनी हाती घेतलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देण्यात आली. संभाजीनगर जिल्ह्यातील टापरगाव येथील रावसाहेब मोहिते, बीड जिल्ह्यात रूई (धानोरा) येथे रेशमाची शेती करणारे एकनाथ टाळेकर आणि यवतमाळ जिल्ह्यात जवळा येथे ऑर्किडची शेती करणा-या वंदना राठोड यांच्यासारख्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा विविध मंचांच्या माध्यमातून देशभरात पोहोचविण्याचे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी केले.

केंद्र सरकार पुरस्कृत योजनांचा आढावा

या बैठकीदरम्यान, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील विविध केंद्र सरकारतर्फे पुरस्कृत योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांनी पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान जनमन योजना, पंतप्रधान ग्राम रस्ते योजना तसेच स्वयंसहाय्यता बचत गटांतर्फे सुरू असलेल्या उपक्रमांची तपशीलवार माहिती दिली. एमजीएनआरईजीए योजनेचा देखील आढावा घेण्यात आल्यावर, केंद्रीय मंत्री चौहान यांनी सदर योजनेची उद्दिष्टे पूर्ण करण्यात मिळालेल्या यशाची प्रशंसा केली.

एक कोटी लखपती दीदी तयार करण्याचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माझी लाडकी बहिण या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या 1500 रुपयांमुळे महिलांना फार मोठा आधार मिळाला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिली. महिलांना विविध व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच आवश्यक खर्च भागवण्यासाठी या रकमेचा उपयोग होत आहे असे ते म्हणाले. तसेच, महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी लखपती दीदी योजना राबविण्यात येत असून येत्या काळात राज्यात 1 कोटी लखपती दिदी तयार करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने निश्चित केले आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना दिली.


S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2129639)
Read this release in: English , Urdu , Hindi