विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारताने सिमेंट उद्योगासाठी शैक्षणिक-उद्योग क्षेत्राच्या सहकार्याद्वारे केला सीसीयू टेस्टबेड्सच्या पहिल्या क्लस्टरचा प्रारंभ
Posted On:
14 MAY 2025 7:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मे 2025
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने अलीकडेच एका अग्रणी राष्ट्रीय उपक्रमाचा प्रारंभ केला: सिमेंट क्षेत्रातील पाच कार्बन कॅप्चर अँड युटिलायझेशन (सीसीयू) टेस्टबेड्स हे अशा प्रकारचे पहिले संशोधन आणि नवोन्मेष क्लस्टर आहे जे औद्योगिक कार्बन उत्सर्जनाचा सामना करते.
2070 पर्यंत कार्बन-न्यूट्रल अर्थव्यवस्था साध्य करण्याचे सरकारचे ध्येय गाठण्यासाठी राष्ट्रीय निर्धारित योगदान (एनडीसी ) लक्ष्यांना चालना देण्यासाठी आणि उद्योग संक्रमणासाठी निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन -मुक्त मार्ग साध्य करण्यासाठी भारताच्या हवामान कृतीच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
औद्योगिक प्रक्रियांमधून कार्बन डायऑक्साइड कॅप्चर करून त्याचे कृत्रिम इंधन, युरिया, सोडा, राख, रसायने, फूड ग्रेड CO2 किंवा रेती,माती सारख्या मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये रूपांतर करून उत्सर्जन कमी करण्यासाठी सिमेंट, पोलाद , वीज, तेल आणि नैसर्गिक वायू, रसायने आणि खते यासारख्या आव्हानात्मक क्षेत्रांमध्ये कार्बन कॅप्चर युटिलायझेशनला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे आव्हानात्मक असलेल्या अशा कठीण उद्योगांना सीसीयू त्यांचे कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी आणि त्यांचे कामकाज कार्यक्षमतेने सुरू ठेवत निव्वळ शून्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक व्यवहार्य मार्ग उपलब्ध करून देतो. सीसीयू क्षेत्रात संशोधन आणि विकासाला चालना देण्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने मोठी प्रगती केली आहे.
सिमेंट क्षेत्राला कार्बन-मुक्त करण्याची महत्त्वाची गरज ओळखून, ऊर्जा आणि शाश्वत तंत्रज्ञान विभागाने सिमेंट क्षेत्रात कार्बन कॅप्चर युटिलायझेशनच्या तैनातीसाठी शैक्षणिक -उद्योग सहकार्य प्रस्तावांना गती देण्यासाठी एक अनोखे आवाहन केले आहे. या विशेष आवाहनात सिमेंट क्षेत्रात अभिनव सीसीयू टेस्ट बेड विकसित करणे आणि तैनात करणे समाविष्ट असून नाविन्यपूर्ण सार्वजनिक खाजगी भागीदारी निधीपुरवठा मॉडेलद्वारे औद्योगिक व्यवस्थेत CO2 कॅप्चर + CO2 वापर एकात्मिक युनिट विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.
भारतातील अशा प्रकारचा पहिला आणि अनोखा उपक्रम म्हणून, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने पीपीपी मोडमधील या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत शैक्षणिक -उद्योग सहकार्यद्वारे संशोधन आणि विकासासाठी पाच सीसीयू टेस्ट बेड स्थापित करण्यास मंजुरी दिली असून ज्ञान भागीदार म्हणून प्रमुख संशोधन प्रयोगशाळा आणि उद्योग भागीदार म्हणून आघाडीच्या सिमेंट कंपन्या सहभागी होतील.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या निमित्ताने 11 मे 2025 रोजी 5 सीसीयू सिमेंट टेस्ट बेड्सची घोषणा करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); भूविज्ञान आणि पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी डीएसटी सचिव प्रा. अभय करंदीकर यांच्या उपस्थितीत टेस्ट बेड चमूंना अनुदान सुपूर्द केले.
हे पाच चाचणी प्रकल्प केवळ शैक्षणिक प्रयोग नाहीत, तर हे एक आगळेवेगळे सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) प्रतिमाना अंतर्गत भारतातील प्रमुख संशोधन संस्था आणि आघाडीच्या सीमेंट उत्पादक कंपन्यांना एकत्र आणणारे औद्योगिक पथदर्शी उपक्रम आहेत. प्रत्येक चाचणी प्रकल्प सीसीयू (कार्बन कॅप्चर अँड युटिलायझेशन) तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करतो. उदाहरणार्थ अत्याधुनिक उत्प्रेरक (कॅटालिसिस) तंत्रज्ञान ते व्हॅक्यूम आधारित वायू विलगीकरण हे घेता येईल.
या अभिनव उपक्रमांचे निष्कर्ष केवळ सिमेंट क्षेत्रातील सीसीयू मार्गातून "नेट झिरो" उद्दिष्टांकडे वाटचाल दर्शवणार नाहीत, तर भविष्यातील भागधारकांना या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर व व्यावसायिकरणासाठी आत्मविश्वास निर्माण करणारे ठरणार आहेत.
पाच चाचणी प्रकल्पांचा थोडक्यात आढावा:

टेस्टबेड-1: बल्लभगड, हरियाणा:
नॅशनल कौन्सिल फॉर सिमेंट अँड बिल्डिंग मटेरियल्स येथे दररोज 2 टन CO2 शोषून घेणारा पथदर्शी प्रकल्प तयार केला जात आहे. यामध्ये ऑक्सिजन-वर्धित कॅल्सिनेशन वापरून CO2 चे हलक्या वजनाचे काँक्रीट ब्लॉक्स आणि ओलेफिन्समध्ये रूपांतरित केले जाणार आहे.
भागीदार संस्था: जेके सिमेंट लिमिटेड

टेस्टबेड-2: आयआयटी कानपूर + जेएसडब्ल्यू सिमेंट:
या प्रकल्पात कार्बन-निगेटिव्ह मिनरलायझेशन दाखवले जाणार आहे.एक अशी प्रक्रिया जी CO2 ला खनिज रूपात कायमस्वरूपी रूपांतरित करते.म्हणजेच प्रदूषणाचे थेट खडकात रूपांतर करते.

टेस्टबेड-3: आयआयटी मुंबई + दालमिया सिमेंट:
उत्प्रेरक-आधारित CO2 शोषून घेण्याची प्रक्रिया विकसित करणारा हा प्रकल्प प्रत्यक्ष सिमेंट प्रकल्पात बसवण्यात येणार आहे. स्वदेशी स्वच्छ तंत्रज्ञानाच्या प्रमाणवाढीकडे हे एक धाडसी पाऊल आहे.

टेस्टबेड-4: सीएसआयआर-आयआयपी, आयआयटी तिरुपती, आयआयएससी + जेएसडब्ल्यू सिमेंट:
व्हॅक्यूम स्विंग अॅडसॉर्प्शन प्रक्रियेचा वापर करून सिमेंट भट्ट्यांच्या वायूंपासून CO2 वेगळा केला जाणार असून, तो पुन्हा बांधकाम साहित्यामध्ये समाविष्ट केला जाईल. हा उपक्रम"क्लोज द लूप" संकल्पना प्रत्यक्षात आणणारा असेल.

टेस्टबेड-5: आयआयटी मद्रास आणि बिट्स पिलानी, गोवा + अल्ट्राटेक सिमेंट:
कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या नवोन्मेषी उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करणारा हा प्रकल्प संशोधन आणि प्रत्यक्ष औद्योगिक परिणाम यांचा संगम साधतो.
S.Patil/S.Kane/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2128727)