WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

‘वेव्हज’ हा ओटीटी मंच कुटुंबातील सर्वांसाठी मनोरंजनपर योग्य आशय देणारा : सुनील भाटिया, उपमहासंचालक, दूरदर्शन केंद्र, पणजी

 Posted On: 08 MAY 2025 8:47PM |   Location: PIB Mumbai

मुंबई, 8 मे 2025

 

वेव्हज एक असा ओटीटी मंच आहे, ज्यावर एकाच डिजिटल छताखाली कुटुंबातील सर्वांसाठी मनोरंजन आणि बरीच काही आशय सामग्री आहे, असे पणजी दूरदर्शन केंद्राचे उपमहासंचालक सुनील भाटिया म्हणाले. ते गुरुवार, 8 मे  2025 रोजी पणजी येथील दूरदर्शन केंद्रात पत्रकार परिषदेत बोलत होते.

“वेव्हज वर  एकाच डिजिटल छताखाली लाइव्ह टीव्ही, ऑन-डिमांड व्हिडिओ, डिजिटल रेडिओ, गेमिंग आणि इ-कॉमर्सची वैविध्यपूर्ण श्रेणी  उपलब्ध आहे. अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही डिव्हाइसवर उपलब्ध असलेला हा प्लॅटफॉर्म कुटुंबातील प्रत्येकासाठी मनोरंजन, शिक्षण आणि ऑनलाइन शॉपिंगसाठी वन स्टॉप डिजिटल हब आहे. स्वच्छ आणि समावेशक आशयावर  लक्ष केंद्रित करून तयार केलेल्या या मंचाचे उद्दिष्ट भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवतानाच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल, असा आशय पुरवणे हे आहे,” असे भाटिया म्हणाले.

नोव्हेंबर 2024 मध्ये प्रसार भारतीने सुरू केलेल्या या मंचावर 12 भाषांमध्ये आशय सामग्री उपलब्ध आहे. मात्र आता लवकरच कोकणीसह भारतातील सर्व प्रमुख भाषांमध्ये आशय सामग्री उपलब्ध होईल असे ते म्हणाले.

प्लॅटफॉर्मवरील गोव्याच्या अस्तित्वाबाबत  बोलताना ते म्हणाले की, डीडी पणजीचा कोंकणी भाषेतील आशय वेव्हजवर उपलब्ध आहे. तसेच डीडी पणजीने गोव्याचे माजी फुटबॉलपटू आणि भारताच्या  राष्ट्रीय संघाचे कर्णधार ब्रह्मानंद सांखवलकर यांच्या जीवनावर बनवलेला "फेमसली फाउंड @15" नावाचा एक माहितीपट देखील या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे,  असे ते म्हणाले. 40 मिनिटांच्या या माहितीपटात  सांखवलकर यांचा 15 व्या वर्षी खेळायला सुरुवात केल्यापासूनच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे.

वेव्हज 70 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्स उपलब्ध करून देते, ज्यामध्ये दूरदर्शन आणि आकाशवाणी चॅनेल्स आणि B4U, SAB ग्रुप आणि 9X मीडिया सारखे प्रमुख मनोरंजन नेटवर्क्स आहेत, त्याव्यतिरिक्त 10  लोकप्रिय शैलींमध्ये मागणीनुसार आशय सामग्री उपलब्ध आहे. ओएनडीसी  सोबत एकत्रीकरणामुळे वेव्हज अॅपद्वारे थेट ऑनलाइन शॉपिंग देखील शक्य झाले आहे.

रेडिओ स्ट्रीमिंग, व्हिडिओ-ऑन-डिमांड, प्ले-टू-प्ले गेमिंग, युवकांसाठी समर्पित आशय आणि चित्रपटांसाठी क्युरेटेड विभाग, लाईव्ह इव्हेंट्स आणि बरेच काही आहे जे या प्लॅटफॉर्मला वैशिष्ट्यपूर्ण आणि संपूर्ण कुटुंबासाठी अनुकूल पॅकेज बनवते.

वेव्हजवरील बहुतांश आशय सामग्री मोफत उपलब्ध आहे, तर प्रीमियम फीचर्स किफायतशीर सबस्क्रिप्शन प्लॅनद्वारे पाहता येऊ शकतील.

डीडी पणजीचे उपसंचालक (वृत्त) शशिन राय आणि डीडी पणजीचे कार्यक्रम प्रमुख सॅव्हियो डी नोरोन्हा हे देखील पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

 

* * *

PIB Mumbai | S.Bedekar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


Release ID: (Release ID: 2127818)   |   Visitor Counter: 2

Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu