वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
रोजगार, निर्यात आणि राष्ट्रीय विकासाला चालना देणारा एक ऐतिहासिक आणि महत्त्वाकांक्षी करार
99% भारतीय निर्यातीला शून्य शुल्काचा फायदा होईल
कापड, सागरी उत्पादने, चामडे, पादत्राणे, क्रीडासाहित्य आणि खेळणी, रत्ने आणि दागिने यासारख्या कामगार-केंद्रित क्षेत्रांसाठी आणि अभियांत्रिकी वस्तू, ऑटो पार्ट्स आणि इंजिन आणि सेंद्रिय रसायने यासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात निर्यात संधी खुल्या होणार
आयटी/आयटीईएस, वित्तीय सेवा, व्यावसायिक सेवा, इतर व्यवसाय सेवा आणि शैक्षणिक सेवा यासारख्या सेवांमध्ये व्यापाराला लक्षणीय चालना
महत्वाकांक्षी युवा भारतीयांसाठी मजबूत धोरणात्मक पाठिंबा आणि अधिक जागतिक गतिशीलता
युकेमध्ये काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा देयकांमधून तीन वर्षांची सूट देऊन मोठा दिलासा
Posted On:
06 MAY 2025 7:12PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युकेचे पंतप्रधान सर कीर स्टार्रमर यांनी परस्पर हिताचा भारत-युके मुक्त व्यापार करार(एफटीए ) यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. हा भविष्यवेधी करार भारताच्या विकसित भारत 2047 दृष्टिकोनाशी सुसंगत आहे आणि दोन्ही देशांच्या विकास आकांक्षांना पूरक आहे.
नोव्हेंबर 2024 मध्ये ब्राझीलमधील रिओ डी जानेरो येथे झालेल्या जी -20 शिखर परिषदेच्या निमित्ताने दोन्ही पंतप्रधानांमध्ये यासंबंधी चर्चा झाली होती. दोन्ही पंतप्रधानांमध्ये झालेल्या बैठकीनंतर, फेब्रुवारी 2025 मध्ये व्यापक एफटीए वाटाघाटी पुन्हा सुरू झाल्या ज्यामध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि युकेचे परराष्ट्र मंत्री जोनाथन रेनॉल्ड्स आणि त्यांच्या प्रतिनिधींमध्ये अनेक बैठका झाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) वरील सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, "एक ऐतिहासिक टप्पा पार करत , भारत आणि युकेने दुहेरी योगदान करारासह एक महत्त्वाकांक्षी आणि परस्पर हिताचा मुक्त व्यापार करार यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. हे महत्त्वपूर्ण करार आमची व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करतील आणि आमच्या दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार, गुंतवणूक, वाढ, रोजगार निर्मिती आणि नवोन्मेषाला उत्प्रेरित करतील. "
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले ज्यामुळे व्यापार करार शक्य झाला आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताकडे "विश्व मित्र - जगाचा विश्वासू भागीदार" म्हणून पाहिले जाते.
गोयल म्हणाले की, "या कराराने दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील न्याय्य आणि महत्त्वाकांक्षी व्यापारासाठी एक नवीन मापदंड स्थापित केला आहे ."
हा मुक्त व्यापार करार भारतीय शेतकरी, मच्छीमार, कामगार, एमएसएमई, स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांसाठी फायदेशीर ठरेल. जागतिक आर्थिक महासत्ता होण्याच्या ध्येयाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
हा मुक्त व्यापार करार (एफटीए) केवळ वस्तू आणि सेवांच्या व्यापारापुरता मर्यादित नव्हे तर लोक, संधी आणि समृद्धी यांच्याशीदेखील तो संबंधित आहे. हा करार भारताच्या मूलभूत हितसंबंधांचे संरक्षण करतो आणि जागतिक मूल्य साखळ्यांमध्ये भारताच्या वाढत्या सहभागासाठी कवाडे खुली करतो. .
वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी नमूद केले की, हा एफटीए म्हणजे "गेम चेंजर" असून भारताच्या वेगवान आर्थिक वाढीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा भारताने आतापर्यंत स्वाक्षरी केलेला सर्वात व्यापक मुक्त व्यापार करार आहे आणि भविष्यातील करारांसाठी "सुवर्ण मानक" म्हणून हा करार काम करेल.
भारत आणि युके यांच्यात वाढत्या आर्थिक संबंधांच्या पार्श्वभूमीवर हा एफटीए झाला असून सद्यस्थितीत सुमारे 60 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढा असलेला द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत दुप्पट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हा व्यापक करार विविध क्षेत्रांतील – वस्तू, सेवा आणि तंत्रज्ञान तसेच व्यापार व गुंतवणूक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने झालेल्या सखोल वाटाघाटींचे फलित आहे. या कराराचे उद्दिष्ट शाश्वत आणि समावेशक आर्थिक वाढीस चालना देणे, पुरवठा साखळ्या लवचिक बनवणे आणि भारतात उच्च दर्जाची रोजगार निर्मिती करणे आहे.
एक अभूतपूर्व यश म्हणून, भारताने युनायटेड किंगडममध्ये तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असलेल्या भारतीय कामगारांसाठी आणि त्यांच्या नियोक्त्यांसाठी दुहेरी योगदान कराराअंतर्गत तीन वर्षांच्या कालावधीसाठी सामाजिक सुरक्षा देयकामधून सूट मिळवली आहे. यामुळे युकेमधील भारतीय सेवा प्रदाते अधिक स्पर्धात्मक होतील.
भारत - युके मुक्त व्यापार कराराची (FTA) प्रमुख वैशिष्ट्ये:
- युकेसोबतचा हा मुक्त व्यापार करार एक आधुनिक, सर्वसमावेशक आणि महत्त्वाचा करार आहे, ज्याचा उद्देश व्यापार उदारीकरण आणि प्रतिशुल्क(टॅरिफ ) सवलतींसह सखोल आर्थिक एकत्रीकरण साधणे आहे.
- या मुक्त व्यापार करारामुळे वस्तूंच्या सर्व क्षेत्रांमध्ये भारताच्या निर्यातीच्या हिताचे संरक्षण करत व्यापक बाजारपेठ प्रवेश सुनिश्चित केला जाईल. भारत सुमारे 99% टॅरिफ लाईन्सवर प्रतिशुल्क समाप्तीचा लाभ घेईल, ज्यात जवळपास 100% व्यापार मूल्याचा समावेश आहे, ज्यामुळे भारत आणि युके यांच्यातील द्विपक्षीय व्यापारात वाढीच्या प्रचंड संधी उपलब्ध होतील.
- या मुक्त व्यापार करारामुळे सकारात्मक परिणाम होईल आणि वस्त्रोद्योग, सागरी उत्पादने, चर्मोद्योग, पादत्राणे, क्रीडा वस्तू आणि खेळणी, रत्ने आणि आभूषणे यासारख्याश्रम आणि तंत्रज्ञान-आधारित क्षेत्रांतील उत्पादन क्षेत्रावर आणि अभियांत्रिकी वस्तू, ऑटो पार्ट्स आणि इंजिन तसेच सेंद्रीय रसायने यांसारख्या इतर महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी निर्यातीच्या संधी खुल्या होतील. यामुळे यूकेमध्ये इतर देशांच्या तुलनेत भारतीय वस्तूंची स्पर्धात्मकता मोठ्या प्रमाणात सुधारेल.
- या मुक्त व्यापार करारामुळे भारतात रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ होईल.
- माहिती तंत्रज्ञान/माहिती तंत्रज्ञान-आधारित सेवा , वित्तीय सेवा, व्यावसायिक सेवा, इतर व्यवसाय सेवा आणि शैक्षणिक सेवा यांसारख्या सेवा क्षेत्रांमध्ये युकेकडून मिळालेल्या सर्वात महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार कराराच्या बांधिलकीचा भारताला लाभ होईल, ज्यामुळे नवीन संधी आणि रोजगार निर्मिती होईल.
- या मुक्त व्यापार करारामुळे कंत्राटी सेवा पुरवठादार; व्यावसायिक अभ्यागत; गुंतवणूकदार; आंतर-कंपनी बदली कर्मचारी; आंतर-कंपनी बदली कर्मचाऱ्यांचे भागीदार आणि अवलंबित मुले यांना कामाच्या अधिकारासह आणि योग शिक्षक, संगीतकार आणि शेफ यांसारख्या स्वतंत्र व्यावसायिकांसाठी दोन्ही देशांमधील ये-जा सुलभ होईल.
- प्रतिभावान आणि कुशल भारतीय तरुणांसाठी भक्कम वित्तीय आणि व्यावसायिक सेवा क्षेत्र आणि प्रगत डिजिटल पायाभूत सुविधांमुळे डिजिटल स्वरूपात वितरित सेवांसाठी एक प्रमुख जागतिक केंद्र असलेल्या युकेमध्ये प्रचंड संधी उपलब्ध होतील.
- भारताने भारतीय सेवा पुरवठादारांसाठी, विशेषत: वास्तुरचनाशास्त्र आणि अभियांत्रिकी, संगणकाशी संबंधित सेवा आणि दूरसंचार सेवा यांसारख्या व्यावसायिक सेवांमध्ये डिजिटल स्वरूपात वितरित सेवांवर महत्त्वपूर्ण वचनबद्धता निर्माण केली आहे.
- दुहेरी योगदान करारांतर्गत जे भारतीय कामगार तात्पुरत्या स्वरूपात युकेमध्ये आहेत आणि त्यांचे मालक यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी यूकेमधील सामाजिक सुरक्षा योगदान भरण्यापासून सूट मिळाल्याने भारतीय सेवा पुरवठादारांना मोठा आर्थिक लाभ होईल आणि युकेच्या बाजारपेठेत त्यांची स्पर्धात्मकता वाढेल. यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील तसेच युकेमध्ये मोठ्या संख्येने काम करणाऱ्या भारतीयांना फायदा होईल.
- वस्तू आणि सेवांचा मुक्त प्रवाह सुनिश्चित व्हावा आणि भारताच्या निर्यातीवर यामुळे अन्याय्य निर्बंध निर्माण होऊ नयेत यासाठी भारताने बिगर टॅरिफ अडथळे योग्यरित्या दूर होण्याची सुनिश्चिती केली आहे.
- भारतात व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी भारताने स्वतः केलेल्या देशांतर्गत सुधारणांवर आधारित, चांगल्या नियामक पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि पारदर्शकता वाढवणे हा या मुक्त व्यापार कराराचा उद्देश आहे
दोन प्रमुख लोकशाही राष्ट्रे आणि जागतिक नवोन्मेष केंद्र म्हणून, भारत आणि युके आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी आणि जागतिक आव्हानांना एकत्रितपणे तोंड देण्यासाठी आपल्या बांधिलकीची पुन्हा एकदा पुष्टी करत आहेत. भारत-यूके मुक्त व्यापार करार जगभरातील निष्पक्ष, महत्त्वाकांक्षी आणि आधुनिक व्यापार करारांसाठी एक नवीन मापदंड स्थापित करत आहे.
***
S.Kakade/S.Kane/G.Deoda/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2127350)
Visitor Counter : 69