श्रम आणि रोजगार मंत्रालय
ब्राझीलच्या अध्यक्षतेखालील 11 व्या ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीत भविष्यवेधी घोषणापत्राला मिळाली स्वीकृती
Posted On:
26 APR 2025 4:31PM by PIB Mumbai
ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली 25 एप्रिल 2025 रोजी ब्रासिलिया येथे झालेल्या ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. ‘अधिक समावेशक आणि शाश्वत प्रशासनासाठी ग्लोबल साउथ मधील सहकार्याला बळकटी देणे’ या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि कामाचे भविष्य’, आणि ‘हवामान बदलाचा कामाचे विश्व आणि न्याय्य संक्रमणावर होणारा परिणाम’, या दोन महत्त्वाच्या संकल्पनांना संबोधित करणाऱ्या भविष्यवेधी घोषणापत्राला स्वीकृती देण्यात आली.

'वंचित ठेवण्यासाठी नव्हे, तर सक्षमीकरणासाठी तंत्रज्ञान' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेशी सुसंगत, तांत्रिक परिवर्तनासाठी असलेल्या भारताच्या मानवकेंद्रित दृष्टिकोनावर करंदलाजे यांनी प्रकाश टाकला. त्यांनी एआय बाबतच्या भारताच्या राष्ट्रीय धोरणाची माहिती दिली, जो कृषी, आरोग्य सेवा आणि शिक्षणक्षेत्रात नैतिकतेचा अवलंब, मनुष्यबळाची कौशल्य वृद्धी आणि विभागीय अंमलबजावणीला प्राधान्य देतो. फ्यूचरस्किल्स प्राईम आणि नमो ड्रोन दीदी कार्यक्रम, यासारखे उपक्रम विशेषत: ग्रामीण महिला आणि तरुणांसाठी तंत्रज्ञान-सक्षम उपजीविका निर्माण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची प्रचीती देत असल्याचे त्या म्हणाल्या.

एआय संचालित, नॅशनल करिअर सर्व्हिस (एनसीएस) प्लॅटफॉर्म, कौशल्यातील तफावत भरून काढण्यासाठी आणि लाखो लोकांना रोजगाराच्या संधींशी जोडण्यासाठीचे मॉडेल म्हणून प्रदर्शित करण्यात आला.
हवामान विषयक उपाययोजनांबाबत, भारताने हरित विकासाचे रूपांतर समन्यायी रोजगार निर्मितीत होईल, याची खात्री देणाऱ्या आपल्या न्याय्य संक्रमणावर भर दिला. सेक्टर स्किल कौन्सिल फॉर ग्रीन जॉब्स (एसएससीजीजे) आणि मिशन LiFE (लाइफस्टाइल फॉर एन्व्हॉयर्नमेंट), लाईफ, म्हणजेच पर्यावरण पूरक जीवन पद्धती, याला कौशल्य आणि शाश्वत पद्धतींना चालना देणारे परिवर्तनकारी उपक्रम म्हणून अधोरेखित करण्यात आले.
जीएचजी (GHG) उत्सर्जन (2020–2019) आणि 2070 साला पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने मिळवलेल्या यशामुळे, भारताच्या हवामान बदलावरील नेतृत्वाला बळकटी मिळाली. या संक्रमणादरम्यान कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आयएलओबरोबर च्या एकत्रित प्रयत्नांवरही भर देण्यात आला.
ब्रिक्स घोषणा पत्राची फलनिष्पत्ती
ब्रिक्स देश पुढील मुद्द्यांवर वचनबद्ध राहतील:
1. सर्वसमावेशक एआय धोरणांना प्रोत्साहन देणे, जे कामगार संरक्षण आणि नवोन्मेशाचा समतोल साधेल.
2. न्याय्य हवामान संक्रमणाला चालना देण्यासाठी सामाजिक संवाद वाढवणे.
3. कामगार प्रशासन, डिजिटल समावेश आणि हरित रोजगार निर्मितीसाठी ग्लोबल साउथ देशांमधील सहकार्य बळकट करणे.
‘सबका साथ, सबका विकास’ हा पंतप्रधानांचा मंत्र प्रतिबिंबित करून अत्याधुनिक तांत्रिक प्रगतीला समावेशक सामाजिक कल्याणाशी जोडण्यात भारताने दिलेल्या योगदानाची प्रशंसा करण्यात आली. एआय अथवा हवामान बदलाच्या आव्हानांमुळे कोणताही कामगार मागे राहणार नाही, असे भविष्य घडवण्याच्या ब्रिक्स देशांच्या सामूहिक निर्धाराचा पुनरुच्चार या बैठकीत करण्यात आला.
***
N.Chitale/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2124611)
Visitor Counter : 28