इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे (एमईआयटीवाय) ‘आय ऍम सर्क्युलर’ नामक कॉफी टेबल बुक प्रकाशित
‘आय ऍम सर्क्युलर’ मध्ये भारतातील 30 चक्राकार अर्थव्यवस्थाविषयक नवोन्मेष अधोरेखित
Posted On:
23 APR 2025 9:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 एप्रिल 2025
चक्राकार अर्थव्यवस्थाविषयक आंतरराष्ट्रीय मंडळाने (आयसीसीई) संकलित केलेले ‘आय ऍम सर्क्युलर’ नामक कॉफी टेबल बुक आज केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे (एमईआयटीवाय) प्रकाशित करण्यात आले. हे पुस्तक चक्राकार अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यासाठी भारताने दाखवलेल्या अभिनव उर्जेचा चैतन्यमय उत्सव साजरा करते.

तंत्रज्ञान-प्रेरित समावेशक विकास
एमईआयटीवायचे अतिरिक्त सचिव आणि राष्ट्रीय माहिती केंद्राचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी त्यांच्या बीजभाषणात शाश्वततेसाठी नवोन्मेषाची जोपासना करणाऱ्या परिसंस्थांना सक्षम करण्याच्या महत्वावर अधिक भर दिला. “हा उपक्रम जबाबदार वृद्धी आणि समावेशक विकासासाठी तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणासाठी मंत्रालयाने स्वीकारलेल्या संकल्पनेला अनुसरून आहे. ‘आय ऍम सर्क्युलर’ हे पुस्तक म्हणजे चक्राकार अर्थव्यवस्थेच्या परिघात भारताच्या नवोन्मेषी क्षमतेचे दिसलेले अभिमानी प्रतिनिधित्व आहे,” ते म्हणाले.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीतील सुलभतेसाठी एमईआयटीवायने चक्राकार अर्थव्यवस्थाविषयक आंतरराष्ट्रीय मंडळाची (आयसीसीई) प्रशंसा केली आहे असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की ‘आय ऍम सर्क्युलर’ हे कॉफी टेबल बुक म्हणजे केवळ एक प्रकाशन नव्हे तर तो भारताच्या सर्जक क्षमतेचा पुरावा आहे, जबाबदार नवोन्मेषासाठी एक उपदेश आहे आणि शाश्वत,चक्राकार भविष्याच्या उभारणीप्रती आपल्या राष्ट्रीय बांधिलकीचे प्रतीक आहे.
एसईआरआय संस्थेचे सल्लागार डॉ.संदीप चॅटर्जी, एमईआयटीवायमध्ये कार्यरत शास्त्रज्ञ सुरेंद्र गोथेरवाल, आयसीसीईचे सल्लागार पूर्ण चंद्र पांडे, आयसीसीईचे संचालक रविंद्र दहिया आणि आयसीसीईच्या व्यवस्थापकीय संचालक शालिनी गोयल भल्ला हे मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कॉफी टेबल बुकविषयी थोडक्यात माहिती
‘आय ऍम सर्क्युलर’ नामक कॉफी टेबल बुकमध्ये भारतातील 30 सर्वाधिक आश्वासक नवकल्पनांचा समावेश आहे. चक्राकार अर्थव्यवस्थेच्या तत्वांमध्ये रुजलेल्या यशस्वी उपाययोजना शोधून काढून त्यांचा आवाका वाढवण्याच्या उद्देशाने संरचित ‘आय ऍम सर्क्युलर’ या देशव्यापी उपक्रमातून या नवकल्पना निवडण्यात आल्या होत्या. या निवडक नवकल्पना पुढील तीन महत्त्वपूर्ण कल्पनांवर आधारित आहेत: टिकण्याच्या उद्देशाने केलेली संरचना, निसर्गासोबत काम करा आणि विद्यमान स्त्रोतांचा वापर करा.
सदर पुस्तकात समाविष्ट असलेल्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या पुनर्वापरापासून आणि आयओटी आधारित चक्राकार उपाययोजनांपासून ते हरित सामग्री आणि डिजिटल दुरुस्ती मंचापर्यंतच्या विविध नाविन्यपूर्ण संकल्पनांतून एका अशा भविष्याचे दर्शन घडते जेथे स्त्रोतांचा वापर जबाबदारीने होतो, कचऱ्याचे प्रमाण किमान राखले जाते तसेच तंत्रज्ञान आणि शाश्वततेचा मिलाफ होतो.
* * *
S.Patil/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2123974)
Visitor Counter : 17