शिक्षण मंत्रालय
एएनआरएफच्या पेअर कार्यक्रमांतर्गत एनआयटी गोवा या संस्थेला आयआयटी बॉम्बेच्या सहयोगाने 19.53 कोटी रुपयांचे संशोधन अनुदान
Posted On:
22 APR 2025 5:40PM by PIB Mumbai
गोवा, 22 एप्रिल 2025
अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (एएनआरएफ) द्वारे,नवोन्मेश आणि संशोधनाला वेग देण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या (Partnerships for Accelerated Innovation and Research (PAIR) पेअर कार्यक्रमांतर्गत गोव्यातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेला (एनआयटी गोवा) 19.53 कोटींचे महत्त्वपूर्ण संशोधन अनुदान देण्यात आले आहे. एनआयटी गोवा, सात स्पोक (SPOKE) संस्थांपैकी एक म्हणून, उद्योग 4.0 तसेच उर्जा आणि शाश्वतता या क्षेत्रात प्रगत संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी केंद्रीय हब संस्था असणाऱ्या मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी बॉम्बे) सोबत भागीदारी करत आहे.
पेअर कार्यक्रम हा एएनआरएफचा एक धोरणात्मक उपक्रम असून प्रमुख संस्थांमध्ये सहकार्य वाढवून भारताच्या उच्च शिक्षण परिसंस्थेत संशोधन क्षमता वाढविणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमांतर्गत पुढील पाच वर्षांत एकूण 144 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. हा निधी आयआयटी बॉम्बे आणि तिच्या सात स्पोक संस्था - एनआयटी गोवा, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, मुंबई विद्यापीठ, आयआयआयटी पुणे, आयआयटी नागपूर, एमएस युनिव्हर्सिटी बडोदा आणि शेर-ए-काश्मीर युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रिकल्चरल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी - यांच्या द्वारे वापरला जाईल.
एनआयटी गोवा येथे, या उपक्रमाचे नेतृत्व अधिष्ठाता (संशोधन आणि सल्लागार) तसेच संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक डॉ. चिराग मोदी करत आहेत. त्यांच्यासोबत डॉ. दामोदर रेड्डी एडला, डॉ. प्रवती स्वैन, डॉ. नितीन कुमार वाय. बी., डॉ. सुरेश मिक्किली, डॉ. सी. वैजयंती, डॉ. श्रीराज ई. एस., डॉ. सौमित्र दास, डॉ. हरिकुमार एम आणि डॉ. रवी प्रसाद के. जे. या आंतरविद्याशाखीय प्राध्यापकांच्या चमूचा समावेश आहे. हा चमू संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि अप्लाइड सायन्सेस या विभागांचे प्रतिनिधित्व करतो.
या ऐतिहासिक सहकार्यामुळे एनआयटी गोव्याची संशोधन प्रणाली मजबूत होईल, क्षमता बांधणीला चालना मिळेल, संशोधन पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण होईल तसेच मार्गदर्शन आणि नवोपक्रमाला चालना मिळेल. यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, इलेक्ट्रिक वाहने, सायबरसुरक्षा, डेटा सेंटर्स, सिग्नल प्रोसेसिंग, शाश्वतता आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासाद्वारे प्रादेशिक समस्यांचे निराकरण या क्षेत्रात प्रभावी संशोधनासाठी नवीन मार्ग खुले होतील.
एनआयटी गोव्याचे संचालक प्राध्यापक ओ. आर. जयस्वाल यांनी या उपक्रमाबद्दल अभिमान आणि आशावाद व्यक्त केला. "एनआयटी गोव्यासाठी ही एक महत्त्वाची कामगिरी आहे. मी संपूर्ण संशोधन पथकाचे मनापासून अभिनंदन करतो. हे सहकार्य एनआयटी गोव्यातील संशोधन संस्कृतीला मोठी चालना देईल तसेच आम्हाला प्रादेशिक आणि राष्ट्रीय नवोपक्रम प्रणालीमध्ये अर्थपूर्ण योगदान देण्यास मदत करेल," असे ते म्हणाले.
या नवीन भागीदारीसह, एनआयटी गोवा, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवोन्मेष-प्रणीत वाढीसाठी भारताच्या दृष्टिकोनात महत्त्वपूर्ण योगदान देणारी संस्था बनण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे.
* * *
PIB Panaji | N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 2123523)
अभ्यागत कक्ष : 61