इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
नवीन इलेक्ट्रॉनिक्स सुट्या भागांच्या उत्पादन योजनेमुळे जागतिक मूल्य साखळीत भारताची भूमिका अधिक महत्वाची होणार: अश्विनी वैष्णव
Posted On:
18 APR 2025 9:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 एप्रिल 2025
हरयाणात मानेसर इथल्या व्हीव्हीडीएन (Vision, Versatility, Deliver, and Nimbleness - VVDN) उद्योग सुविधा संकुलात आयोजित कार्यक्रमाला आज केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षांत भारताने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात केलेली प्रगती अधोरेखित केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने अलिकडेच इलेक्ट्रॉनिक्स सुट्या भागांच्या उत्पादन योजनेला (Electronics Component Manufacturing Scheme) मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे जागतिक इलेक्ट्रॉनिक्स पुरवठा साखळीत भारताचे स्थान अधिक बळकट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जारी केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

गेल्या सहा वर्षात भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन पाच पटीने वाढले असून, एकूण उत्पादन मूल्याने 11 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दशकभरात या क्षेत्रातली भारताची निर्यातही सहा पटीने वाढली असून, आता निर्यात मूल्यही 3.25 लाख कोटी रुपयांच्या पलिकडे गेले असल्याचे त्यांनी सांगितले. ही मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गतची सर्वात मोठ्या यशोगाथांपैकी एक यशोगाथा असल्याचे ते म्हणाले. सध्या या क्षेत्राअंतर्गत 25 लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळाला आहे, आणि आगामी वर्षांत त्यात प्रचंड वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अश्विनी वैष्णव यांनी स्वदेशी उत्पादन असलेल्या उपकरणांचे महत्त्वही अधोरेखित केले. भारत आता देशांतर्गत रचनात्मक आरेखनाशी अर्थात डिझाइनशी संबंधित उपकरणे आणि साधनांचे, रचनात्मक आरेखन अर्थात डिझाइन करण्यासह त्यांचे उत्पादनही घेऊ लागला आहे, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्याच्या दिशेने देशाने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे असे ते म्हणाले. व्हीव्हीडीएन द्वारे अलीकडेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानविषयक 6,000 सर्व्हर स्थापित केले असल्याचेही त्यांनी नमूद केले. ही घटना भारताची हार्डवेअर क्षेत्रातली क्षमता दर्शवणारा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे ते म्हणाले.

नवीन इलेक्ट्रॉनिक्स सुटे भाग उत्पादन योजना (Electronics Component Manufacturing Scheme) यावेळी अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या इलेक्ट्रॉनिक्स सुटे भाग उत्पादन योजनेविषयी एक महत्त्वाची घोषणाही केली. राष्ट्रीय सेमीकंडक्टर अभियानाअंतर्गत, उर्जा रुपांतर आणि नियंत्रणाशी संबंधित सुट्या भागांचा (Active Components) अंतर्भाव केलेला आहे, त्याचवेळी उर्जा साठवणुकीशी संबंधित सुट्या भागांसाठी (Passive Components) या योजनेअंतर्गत पाठबळ पुरवले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या दोन्ही योजनांकडे एकत्रित प्रभावाकडे पाहिले तर, या दोन्ही योजनांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक सुट्या भागांच्या उत्पादनाचा एक मोठ्या संचाची पूर्तता होईल, आणि या क्षेत्रात भारत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होईल असे ते म्हणाले.
* * *
S.Kane/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2122810)
Visitor Counter : 54