शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनआयटी गोवा येथे  'रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये जिओसिन्थेटिक्सचे अनुप्रयोग' यावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 15 APR 2025 5:06PM by PIB Mumbai

 

पणजी, 15.04.2025

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाचे  राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान आणि सीएसआयआर अर्थात  वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद  - केंद्रीय रस्ते संशोधन संस्था (सीआरआरआय) यांनी संयुक्तपणे गोवा येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत  (एनआयटी ) 'रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये जिओसिंथेटिक्सचे अनुप्रयोग' या विषयावर एक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेल्या या पाच दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन सीएसआयआर -सीआरआरआयचे संचालक प्रा.मनोरंजन परिदा यांनी 14 एप्रिल 2025 रोजी एनआयटी गोवा येथे केले. हा प्रशिक्षण कार्यक्रम 18 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

प्रा. परिदा यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात, भूतंत्रज्ञान अभियांत्रिकी क्षेत्रात विशेषतः जिओसिन्थेटिक्स सामग्रीचा म्हणजे प्लॅस्टिकसारख्या कृत्रिम सामग्रीच्या उपयोगावर लक्ष केंद्रित करून सीएसआयआर-सीआरआरआयने हाती घेतलेल्या विविध प्रकल्पांची रूपरेषा मांडली . त्यांनी विविध जिओसिन्थेटिक्सच्या विकासात औद्योगिक आणि कृषी कचऱ्याचा वापर करण्याच्या क्षमतेवर भर दिला आणि  रस्ते पायाभूत सुविधांचा  टिकाऊपणा, शाश्वतता आणि किफायतशीरता वाढविण्यात त्यांची भूमिका अधोरेखित केली. प्रा.परिदा यांनी विद्यार्थ्यांना उद्योगाशी संबंधित कौशल्ये प्रदान करण्यासाठी आणि वास्तविक जगातील पायाभूत सुविधांच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम  करण्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचे महत्त्व देखील सांगितले.

उद्घाटन समारंभातएनआयटी गोवाचे संचालक प्रा. ओ. आर. जयस्वाल यांनी सीएसआयआर-सीआरआरआयने आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे महत्त्व सांगितले.  या संस्थांचे अफाट कौशल्य आणि अनुभव एनआयटी गोवाच्या विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीला आकार देण्यासाठी आणि त्यांना उद्योगाच्या आवश्यकतेनुसार सक्षम  करण्यासाठी महत्त्वपूर्ण  ठरतील, असे प्रा.जयस्वाल यांनी सांगितले.  प्रदूषणमुक्त आणि शाश्वत पर्यावरण साध्य करण्यासाठी प्रभावी कचरा व्यवस्थापनाची  आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.  विशेषतः जिओसिन्थेटिक्स अनुप्रयोगांच्या संदर्भाने त्यांनी ही मांडणी केली.

सीएसआयआर-सीआरआरआयचे मुख्य शास्त्रज्ञ आणि प्रकल्प नेते डॉ. पी. एस. प्रसाद, सीएसआयआर-सीआरआरआयचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि कार्यक्रम समन्वयक डॉ. रविशंकर यांच्यासह, एनआयटी गोवा येथील कार्यक्रम समन्वयक, डॉ. हरिकुमार(विभागप्रमुख, नागरी विभाग) आणि डॉ. विनम्र मिश्रा (सहाय्यक प्राध्यापक, नागरी  विभाग) यांच्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यक्रमाकडे लक्ष पुरवत आहेत.

वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रविशंकर यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. उद्घाटन सत्रातील  व्याख्यानांमध्ये, आयएलटी विभागाचे प्रमुख आणि मुख्य शास्त्रज्ञ डॉ. के. रविंदर यांनी सीएसआयआर-सीआरआरआय अंतर्गत वाहतूक आणि रस्ते क्षेत्रातील ज्ञान वाढविण्यासाठी विविध प्रशिक्षण उपक्रम आणि कौशल्य विकास उपक्रमांचा आढावा मांडला.

या कार्यक्रमात प्रबलित मृदा संरचना, पेव्हमेंट स्टॅबिलायझेशन, ड्रेनेज सोल्युशन्स  आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये जिओसिंथेटिक्सचे व्यावहारिक अनुप्रयोग यासारखे विषय समाविष्ट आहेत. यामध्ये तांत्रिक सत्रे, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि आघाडीच्या शास्त्रज्ञ व उद्योगांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ चर्चा, विद्यार्थ्यांसोबत शंका निवारण सत्रे आणि विषय मूल्यांकन असेल.

***

S.Kane/S.Kakade/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2121908) अभ्यागत कक्ष : 52
Read this releasein: English