संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सशस्त्र दलांनी संयुक्तपणे कार्य करत आजच्या सतत विकसित होत असलेल्या बहुक्षेत्रीय वातावरणात भविष्यासाठी सतत सज्ज राहिले पाहिजे : वेलिंग्टन येथील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयातील कार्यक्रमात, संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन


"सरकार लष्कराचे रूपांतर तांत्रिकदृष्ट्या-प्रगत चढाईसाठी सज्ज दलात करण्यासाठी वचनबद्ध"

"स्वदेशी भविष्यासाठी सज्ज संरक्षण परिसंस्था तयार करणे ही धोरणात्मक गरज"

Posted On: 10 APR 2025 3:38PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 एप्रिल 2025 

 

"सशस्त्र दलांनी संयुक्तपणे कार्य केले पाहिजे आणि आजच्या सतत विकसित होत असलेल्या बहु-क्षेत्रीय वातावरणात भविष्यासाठी सज्ज राहिले पाहिजे, जेथे सायबर, अंतराळ आणि माहिती युद्ध देखील पारंपारिक कार्यप्रणाली इतकीच शक्तिशाली झाली आहेत," असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतातील सशस्त्र दल तसेच मित्र देशांतील अधिकाऱ्यांना 10 एप्रिल 2025 रोजी, तामिळनाडू येथील वेलींग्टन कॉलेजमधील, 80 व्या केंद्रीय सेवा (सेंट्रल सर्व्हिस) दीक्षांत समारंभात संबोधित करताना सांगितले. 

आजचे जागतिक भू-राजकारण तीन प्रमुख मापदंडांद्वारे पुनर्परिभाषित केले जात आहे: राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या दिशेने एक प्रमुख बिंदू, जागतिक वातावरणात वाढणाऱ्या तांत्रिक त्सुनामीला तोंड देणे आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे, असे संरक्षण मंत्री यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. धोरणात्मक-लष्करी बदलाच्या वळणावर पुढे राहण्यासाठी या बदलांच्या बारकाव्यांचा सखोल अभ्यास करण्याचे आवाहन  त्यांनी अधिकाऱ्यांना केले. ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सशस्त्र दलांना एका तांत्रिकदृष्ट्या-प्रगत चढाईसाठी सज्ज अशा दलात बदलण्यासाठी कोणतीही कसर ठेवणार नाही.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञान विविध मार्गांनी प्रतिकार करण्यात आणि युद्ध लढण्यात क्रांती घडवत आहेत, हे अधोरेखित करून राजनाथ सिंह यांनी, लढाईच्या  क्षेत्रांमधील तांत्रिक नवकल्पनांची शक्ती चित्तथरारक असल्याचे सांगितले. "युक्रेन-रशिया संघर्षात, परिवर्तनकारी विज्ञान नसले तरी ड्रोन हे एक नवीन साधन म्हणून उदयास आले आहे. सैनिक आणि उपकरणांचे बरेचसे नुकसान हे पारंपारिक तोफखाना किंवा चिलखत यामुळे झाले नसून ड्रोन त्याला कारणीभूत आहे. त्याचप्रमाणे, लो-अर्थ ऑर्बिटमधील अंतराळ क्षमता लष्करी डावपेचांमध्ये बदल घडवून आणत आहे, संप्रेषण कौशल्ये आणि लक्ष्य प्राप्त करून घेत आहेत आणि लढायांना एका नवीन उच्च पातळीवर नेत आहेत,” असे ते यावेळी म्हणाले.

जग ग्रे झोन मध्ये आहे आणि हायब्रीड युद्धाच्या युगात आहे, जेथे सायबर-हल्ले, विपरीत माहिती (डिसइन्फॉर्मेशन) मोहिमा आणि आर्थिक युद्ध ही साधने बनली आहेत, जी एकही गोळी न चालवता राजकीय-लष्करी उद्दिष्टे साध्य करू शकतात, यावर संरक्षणमंत्र्यांनी भर दिला. भारताला आपल्या सीमेवरील प्रदेशात सततच्या धोक्यांचा सामना करावा लागतो, जे त्याच्या शेजारी निर्माण होणाऱ्या खोटे युद्ध (प्रॉक्सी वॉर) आणि दहशतवादाच्या आव्हानामुळे आणखी वाढले आहे, असे ते पुढे म्हणाले. 

राजनाथ सिंह यांनी पश्चिम आशियातील संघर्ष आणि हिंद प्रशांत (इंडो-पॅसिफिक) क्षेत्रातील  भू-राजकीय तणावाचा एकूण सुरक्षा व्यवस्थेवर होणारा परिणाम, नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदल यासारख्या अपारंपरिक सुरक्षा धोक्यांवरही भाष्य केले. भविष्यातील युद्धांसाठी सक्षम आणि सावधान राहण्यासाठी सशस्त्र दलांच्या परिवर्तनाचा जोमाने पाठपुरावा करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला, 2047 सालापर्यंत विकसित भारताविषयी पंतप्रधान मोदींचा असलेला दृष्टीकोन हा सुरक्षित भारत आणि सशक्त भारत या दोन मूलभूत स्तंभांवर दृढपणे आधारित आहे.

संरक्षण मंत्र्यांनी आत्मनिर्भरतेद्वारे सशस्त्र दलांच्या विकास आणि आधुनिकीकरणासाठी प्रयत्न केले जात असल्याचे प्रतिपादन केले. "एक सक्षम, स्वदेशी आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण तंत्रज्ञान आणि उत्पादन परिसंस्था तयार करणे हा पर्याय नाही, तर एक धोरणात्मक गरज आहे, हे सध्या सुरू असलेल्या संघर्षांचे धडे आम्हाला शिकवतात. तसेच कमी खर्चिक, उच्च-तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले उपाय विकसित करण्याची आणि सशस्त्र दलांची लढाऊ क्षमता वाढवण्याची गरज आहे. आपल्या सैन्याने केवळ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बदल केले पाहिजेत असे नाही तर आपण त्यासाठी अग्रेसर रहायला हवे असे त्यांनी अधोरेखित केले.

राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय सुरक्षेची खात्री करण्यासाठी सर्व घटकांमध्ये सामंजस्य वाढवण्याची देखील भलामण केली. मुत्सद्देगिरी, माहिती, लष्करी, आर्थिक आणि तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रांमध्ये कृती करत असताना ‘संपूर्ण राष्ट्र’ या दृष्टीकोनाला प्रोत्साहन देणे, हे या प्रयत्नात यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

जागतिक दक्षिणेसाठी ‘महासागर’ (म्युच्युअल अँड होलिस्टिक ॲडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ ॲक्रॉस रिजन) या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीच्या मार्गदर्शनाचा संदर्भ देत संरक्षण मंत्री म्हणाले की सर्व राष्ट्रांसाठी चांगले भविष्य आणि समृद्धी प्राप्त करणे हा नेहमीच आमचा सामूहिक प्रयत्न राहील. "देश आणि लोकांमध्ये वाढती देवाणघेवाण आणि अवलंबित्व हे सूचित करते की अनेक आव्हानांना वैयक्तिकरित्या सामोरे जाण्यापेक्षा एकत्रितपणे सामोरे जाणे चांगले आहे. परस्पर हितसंबंध आणि समन्वय आम्हाला उपप्रादेशिक, प्रादेशिक आणि अगदी जागतिक स्तरावर आमचे ध्येय साध्य करण्यात मदत करतील, असेही ते पुढे म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी अधिकाऱ्यांना भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी जागरूकता, क्षमता, अनुकूलता, चपळता आणि राजदूतांचे प्रतिनिधित्व या पाच ‘A’ वर लक्ष केंद्रित करण्याचे (Awareness, Ability, Adaptability, Agility, Ambassador 5 A) आवाहन केले.  "युद्ध लढणारे आणि राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षक म्हणून तुम्हाला पर्यावरण आणि त्याचे परिणाम याबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे. तुम्हाला भविष्यातील नेत्यांसाठी आवश्यक असलेली क्षमता आणि कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. तुम्ही अनुकूलता आणि चपळता हे प्रमुख गुण आत्मसात केले पाहिजे. उद्याच्या रणांगणात अशा नेत्यांची आवश्यकता असेल जे विपरीत  परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतील, त्यांनी  तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन  आपल्या लाभासाठी अग्रदूत बनले पाहिजे. सशस्त्र सेना बदलाचे अग्रदूत व्हा आणि मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये आदर्श निर्माण करा, असे आवाहन त्यांनी केले.

नुकत्याच झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर म्यानमार आणि थायलंडप्रति भारतातील लोकांनी दाखविलेली एकता आणि दिलेला पाठिंबा याबद्दल बोलत  संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणाला प्रारंभ केला.  ते म्हणाले, “संकटाच्या वेळी भारत नेहमीच प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून आपल्या मित्रांच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि म्यानमारच्या लोकांना वेळेवर मदत देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो,”

80व्या स्टाफ कोर्समध्ये 26 मित्र देशांतील 38 कर्मचाऱ्यांसह 479 विद्यार्थी अधिकारी आहेत. या कोर्समध्ये तीन महिला अधिकारीही सहभागी आहेत.

समारंभाच्या आधी राजनाथ सिंह यांनी मद्रास रेजिमेंट हुतात्मा स्मारक (वॉर मेमोरियल) येथे पुष्पचक्र अर्पण केले आणि शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी देशासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची प्रशंसा करून ​​दिग्गजांशी संवादही साधला.  चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

1948 मध्ये स्थापित डीएसएससी (DSSC) ही एक प्रमुख तीन पदरी सेवा प्रशिक्षण संस्था आहे, जी भारतीय सशस्त्र दल आणि मित्र देशांच्या निवडक मध्यम-स्तरीय अधिकाऱ्यांना व्यावसायिक शिक्षण प्रदान करते. उच्च जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी त्यांची व्यावसायिक क्षमता विकसित करणे हे या संस्थेचे महत्वाचे उद्दिष्ट आहे.  गेल्या काही वर्षांमध्ये, 19,000 पेक्षा जास्त भारतीय अधिकारी आणि 2,000 आंतरराष्ट्रीय अधिकारी DSSC मधून पदवीधर झाले आहेत, त्यापैकी बरेच जण जगभरातील राज्यांचे आणि लष्करी दलांचे प्रमुख बनले आहेत.

 

* * *

M.Pange/S.Patgaonkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2120697) Visitor Counter : 40


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil