संरक्षण मंत्रालय
भारत-अमेरिका संयुक्त एचएडीआर जलस्थल सराव - टायगर ट्रायम्फ उद्घाटन समारंभाचे संयुक्त निवेदन
Posted On:
02 APR 2025 6:13PM by PIB Mumbai
भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संयुक्त मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) जलस्थल सरावाच्या चौथ्या पर्वाचा उद्घाटन समारंभ - टायगर ट्रायम्फ 2025 हा 01 एप्रिल 2025 रोजी भारतीय नौदलाच्या आयएनएस जलाश्व (एल 41) वर आयोजित करण्यात आला होता. हा सराव अमेरिका-भारत दरम्यानचे घनिष्ठ धोरणात्मक सागरी हितसंबंध आणि उभय देशांमधील संरक्षण भागीदारी दर्शवितो. मोठ्या प्रमाणात एचएडीआर उपक्रमादरम्यान परस्पर सहभागाची क्षमता आणखी वाढवून विविध क्षेत्रांमध्ये संयुक्त परिचालनादरम्यान परस्पर संवाद वाढवणे हे या वेळच्या पर्वाचे उद्दिष्ट आहे.
या सरावाचा बंदर टप्पा 01-07 एप्रिल 2025 दरम्यान विशाखापट्टणम येथे आयोजित केला जात आहे. यामध्ये समुद्रात विविध प्रशिक्षण कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी नियोजन प्रक्रिया तसेच टायगर ट्रायम्फच्या याआधीच्या पर्वांमधे सुरू करण्यात आलेल्या कार्यक्रमांना अधिक परिष्कृत करणे समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, बंदर टप्प्यात विविध व्यावसायिक विषयांवरील प्रशिक्षण आणि विषय तज्ञ विनिमय (SMEE) कार्यक्रम, आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद प्रक्रिया आणि हवाई, सागरी, सायबर आणि अवकाश क्षेत्रातील सराव यासारख्या प्रमुख लष्करी क्रियाकलापांचा समावेश असेल. या देवाणघेवाण कार्यक्रमांमुळे दोन्ही देशांच्या सैन्यांना सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान करण्यास आणि मजबूत संबंध निर्माण करण्यास मदत होईल. याशिवाय, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देणे यांचा समन्वय साधून सुसंवाद वाढवला जाईल आणि वैयक्तिक संबंध विकसित केले जातील.
सागरी टप्पा 08-12 एप्रिल 2025 पर्यंत चालेल आणि या काळात दोन्ही देशांच्या सैन्य संयुक्त लष्करी कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे सागरी, जलस्थल आणि एचएडीआर परिचालनाचे प्रशिक्षण देण्यासाठी एकत्र काम करतील. काकीनाडा येथे जलस्थलीय लँडिंगनंतर संयुक्त मानवतावादी मदत आणि वैद्यकीय प्रतिसाद शिबिराच्या स्थापनेसह हा टप्पा संपेल. भारतीय नौदलाच्या सहभागी युनिट्समध्ये लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक आयएनएस जलाश्व, इंटिग्रल लँडिंग क्राफ्ट अँड हेलिकॉप्टर, दिल्ली क्लास गाईडेड मिसाइल डिस्ट्रॉयर आयएनएस मुंबई (डी62), मगर श्रेणीची जलस्थल युद्धनौका, दीपक श्रेणीचे फ्लीट टँकर आयएनएस शक्ती (ए57) आणि पीबीआय लांब पल्ल्याचे सागरी गस्ती विमान, एमएच60आर हेलिकॉप्टर आणि हॉक एअरक्राफ्ट यांचा समावेश आहे. भारतीय सैन्याचे प्रतिनिधित्व इन्फंट्री बटालियन ग्रुप, तिन्ही सेवांमधील यांत्रिक दल आणि विशेष कृती दलांसह करेल. या सरावात सायबर आणि अवकाश तज्ञ सहभागी होतील. भारतीय हवाई दल C130, Mi-17 V5 आणि एअर पोर्टेबल वैद्यकीय उपकरणांच्या क्षमतांचे प्रदर्शन करेल. या सरावात सहभागी होणाऱ्या अमेरिकी कृती दलात अमेरिकी नौदल व्हिडबे आयलंड-क्लास डॉक लँडिंग जहाज यूएसएस कॉमस्टॉक (एलएसडी 45) यांचा समावेश असेल, जे 11 व्या सागरी एक्सपिडिशनरी युनिट आणि पहिल्या लाईट आर्मर्ड रिकॉनिसन्स बटालियनमधील यूएस मरीनद्वारे चालवले जाईल, तसेच आर्ले बर्क-क्लास गाईडेड-मिसाईल डिस्ट्रॉयर यूएसएस राल्फ जॉन्सन (डीडीजी 114) आणि नेव्ही पी8ए पोसायडॉन विमान असेल. अमेरिकन अंतराळ दल आणि हवाई दल अनुक्रमे विषय तज्ञ आणि C-130J विमानांसह या सरावाला पाठिंबा देत आहेत. अमेरिकन सैन्याचे प्रतिनिधित्व एक प्लाटून, वैद्यकीय प्लाटून, नागरी-लष्करी ऑपरेशन्स सेंटर आणि मल्टी-डोमेन टास्क फोर्स जॉइंट इन्फॉर्मेशन इफेक्ट्स फ्यूजन सेल करेल.
(7)2GPA.jpeg)
(1)DFCQ.jpeg)
(2)MXR4.jpeg)
***
S.Patil/V.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2118077)
Visitor Counter : 20