आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डोळ्यांच्या निगेबाबत क्रांती घडवून आणण्यासाठी आयसीएमआरने ड्रोन-आधारित कॉर्निया वाहतुकीचा केला शुभारंभ
कॉर्निया प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी वेळेवर आणि प्रभावी पद्धतीने जैविक सामग्री पोहोचवण्यासाठी आयसीएमआरच्या आय-ड्रोन उपक्रमांतर्गत हवाई वैद्यकीय सामग्रीवाहतूकशास्त्राच्या क्षमतेच्या यशाचे वैमानिकाद्वारे प्रदर्शन
Posted On:
25 MAR 2025 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मार्च 2025
भारताला आत्मनिर्भर आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनानुसार, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मानवी कॉर्निया (डोळ्यातील पारपटल) आणि अम्नीऑटिक मेम्ब्रेन ग्राफ्टच्या हवाई वाहतुकीबाबत एक अग्रगण्य अभ्यास सुरू केला आहे.
आयसीएमआरने नवी दिल्लीतील एम्स आणि डॉ. श्रॉफ यांच्या चॅरिटी आय हॉस्पिटलच्या सहकार्याने तसेच नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने, हरियाणातील सोनीपत आणि झज्जर येथील पेरिफेरल कलेक्शन सेंटर्समधून तृतीयक रुग्णालयांमध्ये प्रत्यारोपणासाठी मानवी कॉर्निया आणि अम्नीओटिक मेम्ब्रेन ग्राफ्ट्स सारखी संवेदनशील नेत्रविषयक जैवसामग्री वाहून नेण्यासाठी ड्रोन वापरण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्याबाबतचा एक व्यवहार्यता अभ्यास केला. डॉ. श्रॉफ यांच्या चॅरिटी आय हॉस्पिटल (सोनीपत सेंटर) पासून राष्ट्रीय कर्करोग संस्था (एनसीआय), एम्स झज्जर आणि त्यानंतर एम्स नवी दिल्ली येथे ड्रोनच्या सहाय्याने कॉर्नियल टिश्यू यशस्वीरित्या वाहून नेले. दोन्ही शहरांमधील अंतर ड्रोनद्वारे सुमारे 40 मिनिटांत पार केले गेले, जे सहसा रस्त्याने पार करण्यासाठी सुमारे 2-2.5 तास लागतात. ड्रोनने नमुना अखंडतेसाठी इष्टतम परिस्थिती राखली आणि आगमनानंतर, कॉर्नियाचे मूल्यांकन केले गेले, ज्यामुळे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

गेल्या काही वर्षांत आयसीएम आर च्या आय- ड्रोन उपक्रमाने ईशान्य भारत (कोविड-19 आणि युआयपी लस, औषधे आणि शस्त्रक्रिया), हिमाचल प्रदेश (अति उंचावर आणि शून्यापेक्षा कमी तापमानात औषधे आणि नमुने), कर्नाटक (इंट्राऑपरेटिव्ह ऑन्कोसर्जिकल नमुने), तेलंगणा (क्षयरोग थुंकीचे नमुने) आणि एनसी आर (रक्त पिशव्या आणि त्याचे घटक) यासारख्या राज्यांमध्ये आवश्यक वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी ड्रोनचा यशस्वी वापर करून दाखविला आहे. हे प्रयत्न शेवटच्या मैलापर्यंत आरोग्यसेवेतील तफावत भरून काढण्यासाठी ड्रोनची वाढती क्षमता आणि आश्वासकता अधोरेखित करतात.
या अभ्यासाद्वारे ऑपरेशनल वर्कफ्लोचे दस्तऐवजीकरण करणे, तांत्रिक अडथळे ओळखणे आणि नियमित वैद्यकीय व्यवहारात ड्रोन लॉजिस्टिक्सच्या एकात्मिकतेला समर्थन देण्यासाठी पुरावे तयार करणे असे संशोधकांचे उद्दिष्ट आहे - विशेषतः मानवी कॉर्नियासारख्या वेळेच्या आणि तापमानाच्या बाबतीत संवेदनशील जैविक सामग्रीच्या वाहतुकीसाठी. हे निष्कर्ष भविष्यातील प्रोटोकॉल, धोरणे आणि आरोग्यसेवेतील हवाई वाहतुकीसाठी सर्वोत्तम पद्धतींना आकार देण्यास मदत करतील. या कार्यक्रमाला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संघटनेचे संचालक डॉ. अनिल कुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
S.Patil/N.Mathure/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2114852)
Visitor Counter : 27