नागपूर, 24 मार्च 2025
भारतीय माध्यम आणि मनोरंजन संघटनेने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने मंगळवार 25 मार्च रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत हिंगणा नागपूर येथील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात वॅम ! (वेव्हज अॅनिमे आणि मंगा स्पर्धा) चे आयोजन केले आहे.

गुवाहाटी, कोलकाता, भुवनेश्वर, वाराणसी, दिल्ली आणि मुंबई येथील यशस्वी आयोजनानंतर , वॅमने क्रिएट इन इंडिया उपक्रमांतर्गत भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे आणि अॅनिमे, मंगा आणि वेबटूनमधील देशांतर्गत प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचे आपले ध्येय सुरू ठेवले आहे.

या कार्यक्रमात शेकडो प्रतिभावंत कलाकार, अॅनिमेटर आणि आशय निर्माते सहभागी होतील अशी अपेक्षा आहे जे रोमांचक कॉस्प्ले स्पर्धेसह मंगा, वेबटून आणि अॅनिमे श्रेणींमध्ये स्पर्धा करण्यास आणि आपले कौशल्य दाखवण्यास उत्सुक आहेत.

वॅम! नागपूरचे परीक्षण उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या पॅनेलद्वारे केले जाईल ज्यामध्ये भसीन समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुशील भसीन, कायरा अॅनिमेशन प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ आणि एमपी एव्हीजीसी-एक्सआर मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशनचे सह-अध्यक्ष अर्पित दुबे आणि नीलेश पटेल अॅनिमेशन स्टुडिओचे सीईओ आणि एमपी एव्हीजीसी-एक्सआर मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशनचे व्हर्टिकल डायरेक्टर नीलेश पटेल यांचा समावेश आहे.
त्यांचे कौशल्य आणि अनुभव निमेशन, गेमिंग आणि डिजिटल स्टोरीटेलिंगमधील भारतातील उदयोन्मुख कलाकारांना महत्वपूर्ण माहिती , प्रतिसाद आणि ओळख प्रदान करेल.
नागपूर
सहभागी खालील श्रेणींमध्ये स्पर्धा करतील:
• मंगा (जपानी-शैलीतील कॉमिक्स)
• वेबटून (डिजिटल कॉमिक्स)
• अॅनिमे (जपानी-शैलीतील अॅनिमेशन)
• कॉस्प्ले स्पर्धा
स्पर्धांव्यतिरिक्त, उपस्थितांना भारतातील उदयोन्मुख अॅनिमे आणि मंगा उद्योगाबद्दल विशेष माहिती मिळेल, आघाडीच्या व्यावसायिकांशी संवाद साधता येईल आणि वाढत्या AVGC-XR (अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी) क्षेत्रातील नवीन संधींचा शोध घेता येईल.
मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव अंकुर भसीन यांच्या मते, वॅम ! हे भारतातील पुढच्या पिढीतील अॅनिमे, मंगा आणि वेबटून निर्मात्यांसाठी आपले कौशल्य प्रदर्शित करण्याचे एक व्यासपीठ बनले आहे. आम्ही ज्या-ज्या शहरात भेट देतो, तिथे आम्हाला वाढता उत्साह आणि अविश्वसनीय प्रतिभा दिसून येते. नागपूरचा सर्जनशील समुदाय जोमाने प्रगती करत आहे आणि त्यांची जादू पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. हा कार्यक्रम केवळ एक स्पर्धा नाही तर भारताच्या अॅनिमेशन आणि डिजिटल कला उद्योगासाठी एक मजबूत , आत्मनिर्भर परिसंस्था उभारणे हा उद्देश आहे.”
वॅम ! हा AVGC-XR आणि माध्यम उद्योगांसाठी भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म WAVES (वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट - https://wavesindia.org/) अंतर्गत एक प्रमुख कार्यक्रम आहे.विविध शहरांमध्ये वॅम ! चे आयोजन करून भारतातील बौद्धिक संपदा निर्मिती आणि मुख्य प्रवाहातील अॅनिमे आणि मंगा संस्कृतीला उत्प्रेरित करण्याचे मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडियाचे उद्दिष्ट आहे.