आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
खुपऱ्या आणि हिवताप निर्मूलनाबद्दल अद्यतनित माहिती
जागतिक आरोग्य संघटनेने भारतातून खुपऱ्या आजाराला सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून नष्ट करण्याचा घेतला निर्णय
खुपऱ्या आजाराला सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून नष्ट करणारा भारत हा आग्नेय आशियातील तिसरा देश
Posted On:
18 MAR 2025 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मार्च 2025
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय अंधत्व आणि दृष्टीदोष नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (NPCBVI) ट्रॅकोमा अर्थात खुपऱ्या या डोळ्याशी संबंधित आजाराचे निर्मूलन करण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग पथकाने सुचविल्याप्रमाणे, WHO SAFE धोरण देशभरात लागू करण्यात आले आहे. WHO SAFE म्हणजे शस्त्रक्रिया (S), प्रतिजैविक (A), चेहऱ्याची स्वच्छता (F) आणि पर्यावरणीय स्वच्छता(E) यांचा अवलंब करणे होय.
2019 पासून, राष्ट्रीय अंधत्व आणि दृष्टीदोष नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विशिष्ट डब्ल्यूएचओ सामायिक स्वरूपाद्वारे देशातील सर्व जिल्ह्यांमधून रुग्णांचे अहवाल गोळा करून खुपऱ्यांच्या प्रकरणांवर सतत देखरेख ठेवण्यासाठी व्यवस्था विकसित केली आहे. 2021-24 दरम्यान राष्ट्रीय अंधत्व आणि दृष्टीदोष नियंत्रण कार्यक्रमांतर्गत, जागतिक आरोग्य संघटनेने अनिवार्य केलेल्या आदेशाप्रमाणे हा साथीचा रोग पसरलेल्या देशातील 200 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय ट्रॅकोमॅटस ट्रायकिआसिस (केवळ टीटी) सर्वेक्षण करण्यात आले.
त्यावेळी, जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्मूलन निकषांपेक्षा या आजाराचा प्रसार खूपच कमी असल्याचे आढळून आले. 8 ऑक्टोबर 2024 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले की भारत सरकारने खुपऱ्या या आजाराचे सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून निर्मुलन केले आहे.यासोबतच, असा महत्त्वाचा सार्वजनिक आरोग्य टप्पा गाठणारा भारत हा आग्नेय आशियातील तिसरा देश बनला आहे.
भारतातील हिवताप रुग्णांचे प्रमाण कमी करण्यास आणि HBHI म्हणजेच ‘उच्च रुग्णभार ते उच्च परिणाम’ गटातून बाहेर पडण्यास सहाय्यक ठरलेल्या रणनीती:
- रोग व्यवस्थापन ज्यामध्ये सक्रिय, निष्क्रिय आणि देखरेखीसह लवकर निदान, त्यानंतर पूर्ण आणि प्रभावी उपचार, रेफरल सेवा मजबूत करणे, साथीला तोंड देण्यासाठी तयारी आणि जलद प्रतिसाद यांचा समावेश आहे.
- उच्च-जोखीम असलेल्या निवडक भागातील घरात औषध फवारणी (IRS), हिवतापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडणाऱ्या विशिष्ट भागात दीर्घकाळ टिकणारे कीटकनाशक जाळ्याचा वापर (LLINs), डासांच्या अळ्या खाणाऱ्या माशांचा वापर, शहरी भागात डासांच्या अळ्यांचा नायनाट करणारी जैविक औषधे वापरणे, अळ्याविरोधी उपाय आणि त्यांचे प्रजनन रोखण्यासाठी किरकोळ पर्यावरणीय अभियांत्रिकी प्रयोग आणि त्यांचा स्रोत कमी करणे, अशा उपायांचा समावेश आहे.
- क्षमता बांधणीद्वारे वर्तणूक बदल संवाद (BCC), आंतर-क्षेत्रीय अभिसरण आणि मानव संसाधन विकास या उद्देशाने सहाय्यक उपाययोजना
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
(Release ID: 2112587)
Visitor Counter : 45