सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील 'स्त्री महोत्सवाची' समृद्ध कलाविष्कारांनी सांगता


कला आणि संगीताचा वारसा जपणारा महिला सांस्कृतिक महोत्सव स्त्री महोत्सव नागपूरात साजरा

Posted On: 11 MAR 2025 7:04PM by PIB Mumbai

नागपूर, 11 मार्च 2025

 

सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात (SCZCC), नागपूर येथे 8 मार्च ते 10 मार्च या कालावधीत(SCZCC) आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तीन दिवस सांस्कृतिक महोत्सव, 'स्त्री महोत्सव' या नावाने आयोजित केला होता. या महोत्सवात भारताच्या समृद्ध कलात्मक परंपरांवर प्रकाश टाकणाऱ्या महिला कलाकारांच्या मंत्रमुग्ध सादरीकरणांचा समावेश होता.

यावेळी झालेल्या समारोप समारंभाचे प्रमुख अतिथी मध्यप्रदेशातील निवृत्त संशोधन आणि प्रकाशन अधिकारी, डॉ. महेशचंद्र शांडिल्य होते. महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाचा आरंभ राम शेवाळकर प्रतिष्ठान, नागपूर यांनी सादर केलेल्या "होय, मी सावित्री बोलतेय" या वैशिष्ट्यपूर्ण नाटकाने झाला. या नाटकात भारतातील महिला शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षांचे आणि कामगिरीचे चित्रण करण्यात आले आहे.सावित्रीबाईंच्या प्रवासाचे सार आपल्या आविष्काराने अक्षरशः जिवंत करत  पूजा पिंपळकर यांनी यावेळी एक आकर्षक सादरीकरण केले. हे नाटक सुषमा देशपांडे यांनी लिहिले असून शंकर शंखपाळे यांनी दिग्दर्शित केले होते.

यानंतर, प्रसिद्ध नृत्यांगना तनुश्री चौहान यांनी एक उत्कृष्ट कथक  नृत्य सादर केले. त्यांनी देवीच्या भक्तीपर आवाहनाने आपल्या सादरीकरणाची सुरुवात केली, त्यात त्यांनी  शुद्ध कथक, ठुमरीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि द्रौपदी  वस्त्रहरणाच्या नाट्यपूर्ण चित्रणाने आपल्या सादरीकरणाचा समारोप केला.त्यांना शफीक हुसेन यांनी सारंगी,रोशन कुमार यांनी गायन, बी. शरत यांनी तबल्यावर तसेच लिली चौहान यांनी स्तोत्र पठण करत एकत्रित साथ दिली.

यासोबतच 10 मार्च रोजी, यानिमित्ताने तीन दिवस आयोजित केलेल्या “विन्यास” या कार्यशाळेचा प्रसिद्ध मृदंगम कलाकार मन्नारकोली  जे बालाजी यांनी मार्गदर्शन केलेल्या समृद्ध सत्राने यावेळी समारोप झाला. रंगमंचावरील सादरीकरणांव्यतिरिक्त, महोत्सवात विविध हस्तकला आणि पाककौशल्य कृतींचाही समावेश होता, ज्यामुळे तो एक समग्र सांस्कृतिक अनुभव बनला.या कार्यक्रमांची आणि उपक्रमांची प्रेक्षकांनी खूप प्रशंसा केली, ज्यामुळे महोत्सव अधिक  यशस्वी  झाला.

प्रयागराज येथे 9 ते 13 मार्च दरम्यान आयोजित 'रंग से कुंभ' या राष्ट्रीय स्तरावरील निसर्ग चित्रकला शिबिरात तयार केलेल्या चित्रांचे प्रदर्शन एससीझेडसीसी परिसरात सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जनतेसाठी खुले असेल,जे या कलात्मक वातावरणाच्या उत्साहात आणखी भर घालेल.सर्व कलाप्रेमींना हे प्रदर्शन पाहण्यासाठी  निमंत्रित करण्यात येत  आहे.

 

* * *

PIB Mumbai | S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2110449) अभ्यागत कक्ष : 38
Read this releasein: English